Bhartiyans

Menu

केरळच्या बेटाला नॅशनल जिऑग्राफीच्या सर्वोत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत नेणाऱ्या मनीषा पणिकार

Date : 08 Feb 2017

Total View : 971

उद्योजिका मनीषा पणिकार यांनी कक्काथुरूथु या बेटावर साकारलेल्या ‘कयाल’ प्रकल्पामुळे या बेटाचा समावेश नॅशनल जिऑग्राफी वाहिनीच्या ‘अराऊंड द वर्ल्ड इन २४ हवर्स’ या मासिकातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत करण्यात आला.


सारांश

उद्योजिका मनीषा पणिकार यांनी कक्काथुरूथु या बेटावर साकारलेल्या ‘कयाल’ प्रकल्पामुळे या बेटाचा समावेश नॅशनल जिऑग्राफी वाहिनीच्या ‘अराऊंड द वर्ल्ड इन २४ हवर्स’ या मासिकातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत करण्यात आला. ‘कक्काथुरूथु’ला त्यांनी हा निवासी प्रकल्प सुरू केला. ‘कयाल’ला ‘कोंडे नेस्ट ट्रॅव्हलर’चा बेस्ट लेकसाईड लॉज पुरस्कार मिळाला आहे. सुप्रसिद्ध शेफ डेव्हिड रॉको यांच्या पाककृतीच्या कार्यक्रमात देखील ‘कयाल’चा समावेश करण्यात आला आहे.सविस्तर बातमी

केरळ.....निसर्गाचा सुंदर अविष्कार. बहुतांश भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ केरळ. सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांची यादी केली तर केरळ नक्कीच पहिल्या पाचमध्ये असेल. समुद्रकिनारा, नारळाची झाडी, विविध बेटे, उत्तम तांदूळ आणि अतिशय सुशिक्षित व प्रेमळ लोक, अशी केरळची वैशिष्ट्ये सांगता येतील. 

केरळच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला तो उद्योजिका मनीषा पणिकार यांनी.

मनीषा यांनी वेम्बनद तळ्यावर असलेल्या कक्काथुरूथु या बेटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे व कक्काथुरूथु या बेटावर केलेल्या कामामुळे या बेटाचा समावेश National geography या वाहिनीने तयार केलेल्या सर्वोत्तम पर्यटनस्थळांच्या यादीत करण्यात आला.

National Geography या वाहिनीतर्फे ‘Around the world in 24 hours’ हे मासिक निघतं. या मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवर्जून पाहावी अशा पर्यटनस्थळांमध्ये कक्काथुरूथु या बेटाचा समावेश केला.

‘कक्काथुरूथु’ला ‘आयलँड ऑफ क्रोज’ (कावळ्यांचे बेट) असेही म्हणतात. दोन वर्षांपूर्वी उद्योजिका मनीषा यांनी जेव्हा या बेटाला भेट दिली, तेव्हा तिथे फार काही प्रगती झालेली नव्हती. अंतर्गत वाहतुकीसाठी देखील केवळ पारंपरिक छोट्या होड्याच वापरल्या जायच्या. मनीषा यांनी अक्षरशः दोन वर्षात या बेटाचा कायापालट केला.

प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी बेटावर विविध सोयीसुविधा तर निर्माण केल्याच पण बेटावर ‘कयाल’ हा निवासी प्रकल्प सुरू केला. तुम्ही त्याला हॉटेल म्हणू शकता.

आधुनिकता आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ असलेले हे हॉटेल एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा नक्कीच कमी नाही.

मनीषा यांच्या कल्पकतेला खरी पावती देणारी बाब म्हणजे ‘कयाल’ला Conde Nast Traveller चा Best lakeside lodge पुरस्कार मिळाला ही गोष्ट. एवढच नाही तर सुप्रसिद्ध शेफ डेव्हिड रॉको यांच्या पाककृतीच्या कार्यक्रमात देखील ‘कयाल’ समावेश करण्यात आला आहे. निसर्गावर थोडेही आक्रमण न करता तयार केलेल्या ‘कयाल’मुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला. लघुउद्योग, छोटे व्यावसाय यांना चालना मिळाली. 

मनीषा सांगतात, “निळसर रंगाचा अथांग समुद्र, त्यावर तेवढेच अथांग आणि विविध रंगांनी भारावून टाकणारे आकाश आणि त्या आकाशात विधात्याने भरलेले असंख्य रंग हे कदाचित एखाद्या निष्णात कलाकाराला लाजवतील असे असतात, हे पाहून मी थक्क झाले.”

पर्यटनात जसं स्थळांना महत्त्व आहे, तसंच कोणत्या स्थळी कोणत्या वेळेला जावं, याला देखील तेवढच महत्त्व आहे. ‘Around the world in 24 hours’ या मासिकात कक्काथुरूथु या बेटाचा समावेश करण्यामागचं हे देखील एका कारण आहे. जसं नॉर्वे रात्री १२ वाजता पहावं, पॅरिस सकाळी ६ वाजता, न्युयॉर्क रात्री ८ वाजता अगदी तसंच कक्काथुरूथुला संध्याकाळी ६ वाजता जावं..! 

दिवसभर तेजाने तळपणारा आणि आता हळूहळू शांत होत जाणारा लालबूंद सूर्य निळ-पांढरं आकाश आपल्यात सामावून घेत असतं... त्याच वेळी पक्षी आणि कोळी बांधव दोघेही विशाल समुद्रावरून घरी परतत असतात. हा क्षण ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात.

हाच सूर्यास्त आणि हाच क्षण मनीषा यांना भावला..!
आणि याच सूर्यास्तामुळे त्यांच्यातील उद्योजकाचा ‘सूर्योदय’ झाला हे नक्की..! 


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

राखी कुलकर्णी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया