Bhartiyans

Menu

४२०० हून अधिक जलसंवर्धन प्रकल्प, ५०० हून अधिक तलाव व २००० पेक्षा जास्त बोअरवेल्स बांधणारे ‘जलजगद्गुरु’ अय्यपा मसागी !

Date : 10 Feb 2017

Total View : 585

४२०० हून अधिक जलसंवर्धन प्रकल्प, ५०० हून अधिक तलाव, २००० पेक्षा जास्त बोअरवेल्स बांधणारे कर्नाटकातील ५९ वर्षीय अय्यपा मसागी यांच्या समाजोपयोगी कामाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.


सारांश

बंगळूरपासून ४७० किमीवरील ‘गदग’ या दुष्काळी प्रदेशात अय्यपा मसागी यांचा जन्म झाला. पहाटे ३ वाजता उठून आईबरोबर कित्येक मैल पिण्याच्या पाण्यासाठी केलेली पायपीट महिना ५५,००० रुपये कमावणारे प्रोजेक्ट मेनेजर झाल्यावरही ते विसरले नव्हते. पूर्ण वेळ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काम करायचं त्यांनी ठरवलं. ४२०० हून अधिक जलसंवर्धन प्रकल्प, ५०० हून अधिक तलाव, २००० पेक्षा जास्त बोअरवेल्स त्यांनी बांधले आहेत.सविस्तर बातमी

पृथ्वीचा ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि उर्वरित २९% भाग जमिनीचा आहे. या ७१% पाण्यापैकी सांडपाणी, वापरायचं पाणी, समुद्राचं खारे पाणी, हिमालयात बर्फ स्वरूपात गोठलेलं पाणी वगळता मानवाला पिण्यासाठी उपयुक्त असलेल्या पाण्याचं प्रमाण केवळ ०.०१% एवढं आहे. म्हणूनच आता तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, असं म्हणतात. 

पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण हे केवळ ०.०१% असलं तरी मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण साधारण ६० % आहे, यावरून पाण्याची किती गरज आहे आणि उपलब्ध पाण्याचं प्रमाण किती हे आहे हे लक्षात येतं आणि आपण ते किती काळजीपूर्वक वापरायला हवं, हे जाणवतं. पृथ्वीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जर योग्य पद्धतीने साठवला गेला, तर नक्कीच जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होईल.

पाण्याचं महत्त्व कर्नाटकातील ५९ वर्षीय अय्यपा मसागी यांनी वेळीच ओळखलं. कल्पकता, नवनवीन उपक्रम राबवण्याची इच्छाशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य प्रकारे सांगड घालून अय्यपांनी आतापर्यंत तब्बल ४२०० हून अधिक जलसंवर्धन प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. सुमारे ५०० हून अधिक तलाव आणि २००० पेक्षा जास्त बोअरवेल्स त्यांनी बांधल्या आहेत. ७० पेक्षा जास्त कारखाने, २०० हून अधिक अपार्टमेंट, ३००० हून अधिक घरे आणि ५० हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी जलसंवर्धन प्रकल्प राबवले आहेत.

अय्यपांच्या या भव्य-दिव्य, ‘विक्रमी’ आणि समाजोपयोगी कामाची दाखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. अय्यप्पा मसागी यांना Water Doctor, Water Warrior, Water Magician, जलजगद्गुरु आणि ‘Doctor of Dry Borewells’  अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.

बंगळूरपासून ४७० किमीवरील ‘गदग’ या गावी अय्यपांचा जन्म झाला. गदग हा दुष्काळी प्रदेश आहे. तिथे बाराही महिने पाण्याची कमतरता असते. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. आई दिवसभर शेतात राबायची. ४ वर्षांचे अयप्पा पहाटे ३ वाजता उठून आईबरोबर कित्येक मैल पिण्याच्या पाणी आणण्यासाठी पायपीट करत असत. परिस्थिती इतकी हलाकीची होती, की एक दिवस अभ्यासासाठी केरोसीनचा दिवा जास्त वेळ सुरू ठेवला म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना मारलं आणि ही तीख डोक्यात घेऊन सहावीत शिकणारे अय्यप्पा घरातून पळून गेले.

पुढे मिळेल ते काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. तिथे ते ‘फिटर’ झाले. १९८१ मध्ये BEML (Bharat Earth Movers Limited) मध्ये नोकरीला लागले. त्यानंतर L & T Komatsu मध्ये १९८३ साली रुजू झाले. दरम्यानच्या काळात Mechanical चा डिप्लोमा आणि Statistical Quality Control Course केल्यामुळे त्यांना नोकरीत बढती मिळाली. २००२ मध्ये ते प्रोजेक्ट मेनेजर झाले आणि महिना ५५,००० रु कमावू लागले.

आयुष्य सुखात जात होतं. सगळी सुखं हात जोडून उभी होती; पण लहानपणीचे दिवस ते विसरले नव्हते. तेव्हाचं पाण्याच्या दुर्भिक्षाचं भीषण वास्तव त्यांना गप्प बसू देत नव्हतं. शेवटी अचानक एक दिवशी त्यांनी सुखासीन नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काम करायचं त्यांनी ठरवलं. ते जलसंवर्धन प्रकल्पांकडे वळले. लोकांनी, अगदी घराच्या माणसांनीसुद्धा त्यांना वेड्यात काढलं. ४ मुलांचं पालनपोषण कसं करणार, असा प्रश्न बायको विचारू लागली.

तुमचा निर्धार पक्का असेल तर मार्ग आपोआप दिसतो. प्रश्न परस्पर सुटतात, तसंच झालं. अय्यपांना ‘अशोका’ फेलोशिप मिळाली. त्यामुळे त्यांच्या संशोधन आणि प्रकल्पांना आर्थिक मदत मिळाली. यातूनच पुढे २००५ मध्ये त्यांनी Water Literacy Foundation (WLF) आणि २००८ मध्ये Rain Water Concepts (I) Pvt. Ltd. (RWC) ची स्थापना केली. या दोन्ही संस्था cross-subsidy तत्वावर काम करतात. RWC अपार्टमेंट, कारखाने आणि बंगले यासाठी काम करते आणि त्यातून मिळालेल्या नफ्यावर WLF चे काम चालते.

अय्यप्पांनी केवळ कर्नाटक नाही तर आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब आणि गोव्यापर्यंतच्या नागरिकांसाठी काम केलं आहे. WIPRO Technologies Ltd, Tata Elxsi Ltd, Radel Electronics Ltd, Larsen and Toubro, L&T Komatsu Ltd, The Pepsi Company, Nestle India Ltd, as well as MTR Food Limited, Jindal Steel Industries and ACC Cements Pvt Ltd यांसारख्या अनेक कंपन्यांसाठी त्यांनी काम केलं आहे.

बंगळूरपासून ७० किमी अंतरावर अय्यप्पा याचं चीलामाथूर नावाचं फार्म आहे. जिथे त्यांनी जलसंवर्धनाचे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. सुमारे १ वर्षापूर्वी ही २०० एकर खडकाळ, ओसाड जमीन अय्यपांनी विकत घेतली. आता त्यापैकी ८४ एकर जमीन हिरवीगार झाली आहे. विविध रोपांची लागवड तिथे केली आहे. नाचणी, बाजरी, टोमाटो, बिन्स, कांदे, हिरव्या मिरच्या अशा विविध भाज्या येथे पिकतात. या शेतीसाठी अयप्पा कुठल्याही बाहेरच्या पाण्यावर अवलंबून नाहीत. त्यांनी तिथेच ४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. ५ बोअरवेल्सही खोदल्या आहेत. अनेक चर खोदून त्यात पाणी साठवले आहे. या शेतावर काम करणारे शेतकरी तिथेच राहतात आणि त्यांनी पिकवलेलं खातात. त्यांना महिना १६००० रुपये पगारही दिला जातो. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे लोक तिथे नेमले आहेत त्यांना water warriors म्हणतात.

अय्यप्पा म्हणतात, “पुढचं जागतिक युद्ध कदाचित पाण्यासाठीच होईल. त्या वेळी आमचे हे शेतकरी अर्थात Water Warriors युद्ध टाळण्यासाठी काम करतील.” शेतकऱ्यांनी शेतीसाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून न राहता, पावसाच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन केलं पाहिजे. ज्याप्रकारे एखादा कारखाना चालवण्यासाठी धोरणात्मक नियोजन केलं जातं त्याप्रकारेच शेतीचा नियोजन केलं पाहिजे, असं अय्यप्पा यांचं मत आहे.             

अय्यप्पांनी जलनियोजनाचा प्रचंड अभ्यास केला आहे. अण्णा हजारे, बाबू राजेंद्र सिंग यांसारख्या तज्ञांशी बोलून त्यांनी स्वतःची ‘बोअरवेल रिचार्ज’ पद्धत विकसित केली. गेली अनेक दशके लोकांमध्ये पाण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विविध कार्यशाळा, वर्तमानपत्रातील लेख, पुस्तके, पथनाट्ये, नाटके याद्वारे ते लोकांचे प्रबोधन करत आहेत. त्यांनी त्यासंबंधी काही छोट्या कविता देखील लिहिल्या आहेत. ‘भगीरथ’ नावाची एक टेलिफिल्मही त्यांनी बनवली आहे. तसेच, ‘नील जल जन’ नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.

त्यांच्या या कामाला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं गेलं. यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. २००९ साली त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला. कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार देखील त्यांना त्याच वर्षी मिळाला. द ऑक्सफेम फेलोशिपही त्यांना मिळाली आहे.

विविध राज्यातील सरकारने अय्यपा यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या ज्ञानाचा आणि उपक्रमांचा फायदा करून घेण्याचं ठरवलं तर दुष्काळी परिस्थिती उद्भवणार नाही व पाण्याअभावी कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही.


 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य