Bhartiyans

Menu

भारताचा मेस्सी - ‘चंदन नायक'

Date : 11 Feb 2017

Total View : 557

भारताचा मेस्सी - ‘चंदन नायक'


सारांश

केवळ ११ वर्षांचा, ओरीसातल्या झोपडपट्टीत राहणारा आणि निव्वळ आपल्या कोच’वर विलक्षण भक्ती तसच कठोर अंग-मेहेनतीमुळे जर्मनीतल्या प्रगत फुटबॉल प्रशिक्षणासाठी निवडला गेलेला विलक्षण प्रतिभावान ‘चंदन नायक'सविस्तर बातमी

आपल्या भारत देशात अनेक रत्ने दडलेली आहेत. नुकत्याच झालेल्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सगळ्या प्रतिकूल परिस्थितूनही घरच्यांचेच नव्हे तर भारताचे सुद्धा नाव उंचावणाऱ्या खेळाडूंनी हे सिद्ध केलय .

असाच एक हिरा सापडलाय ओरीसामधल्या भुवनेश्वर इथल्या साबार-सही ह्या झोपडपट्टीत.

हिरे नेहेमीच कोळश्याच्या खाणीतच सापडतात ना ?

११ वर्षाच्या फुटबॉल खेळाडू चंदनची निवड ‘ऑल एक्सपेन्सेस पेड जुनियर फुटबॉल कॅम्प’ तर्फे अकॅडमीचा प्लेअर म्हणून झाली आणि आता तो या प्रगत प्रशिक्षणासाठी जर्मनीला रवाना देखील झाला.

ह्या कॅम्पतर्फे जर्मनीतल्या म्युनीच येथे फुटबॉल ट्रेनींगसाठी जाण्याची संधी मिळणाऱ्या खूप थोड्या खेळाडूंमध्ये आता चंदनचे नाव सामील झाले आहे.

‘बायर्न म्युनिच’ जर्मनीतला सर्वात मोठा स्पोर्ट्स क्लब आणि जगातला तिसरा सर्वात मोठा फुटबॉल क्लब आहे.
Union of European Football Associationsच्या जागतिक रँकिंग मध्ये हा स्पोर्ट्स क्लब दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चंदन अगदी लहान असतानाच त्याच्या अंगातली एक प्रतिभावान फुटबॉल खेळाडू होण्याची ही प्रतिभा ओळखली ती त्याचे कोच श्री जयदेव महापात्रा यांनी.
ते गेले चार पाच वर्ष त्याला प्रशिक्षण देत आहेत.

म्हणतात ना,
“गुरुविण कोण दाखवील वाट l
आयष्याचा हा पाठ दुर्गम , अवघड डोंगर घाट”

लहानपणीच सोडून गेल्याने वडिलांचे छत्र नसलेला, चंदन हा एका झोपडपट्टीत राहणारा मुलगा.
आई घरोघरी धुणी-भांडी करते आणि खूप कष्ट करून आपल्या कुटुंबाचे चरितार्थ कसेबसे चालवते.
त्याही परिस्थितीत आपल्या मुलांवर ती जाणीवपूर्वक चांगले संस्कार करते.

अत्यंत गरीब घरातल्या चंदनचे हे यश अक्षरशः विशेष कौतुकास्पद आहे कारण गरिबीमुळे उभ्या थकलेल्या सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देत देत चंदन इथवर पोचला आहे.

महापात्रा यांनी चंदन मधील ही प्रतिभा ओळखून त्याला फक्त प्रशिक्षणच दिले नाही तर सर्वतोपरी प्रयत्न करून ते त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
चंदनने सुद्धा त्यांना कधीच निराश केले नाही.

महापात्रा सांगतात मागच्या वर्षी त्यांनी चंदन कडून अतिशय कठिण आणि जागतिक स्तरांवरील क्लबचे मापदंड असलेला सराव करून घेतला आणि त्याचा खूप मोठा मोबदला म्हणजे चंदनला ओरीसा राज्याकडून वयोगट १४ ते १६ मध्ये खेळण्यासाठी निवडण्यात आले.

अवघ्या ११ वर्षाच्या चंदनने खेळच इतका बहारदार केला की या खेळाच्या प्रदर्शनाने निवड समिती पुढे त्याला निवडण्याशीवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

असेच एकदा जेव्हा फुटबॉलच्या एका सामन्यासाठी चंदन पुण्याला खेळायला गेला होता तेव्हा सुद्धा त्याच्या मैदानातील विद्युतगतीच्या चपळाईने त्याने तिथल्या सर्वानाच अक्षरशः चकित करून सोडले.

त्याची ही गुणवत्ता तिथे उपस्थित असलेले निवड समितीचे प्रमुख श्री सुनील छेत्री, जे स्वतः एक उत्तम खेळाडू आणि इंडिया नॅशनल टीमचे कॅप्टन देखील आहेत त्यांना देखील प्रभावीत करून गेली.

महापात्राच्या चेहऱ्यावर चंदन बद्दलचा अभिमान आणि वाटणारे कौतुक सध्या स्वच्छच दिसतेय. आजवर दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून असलेला चंदन आज आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि बहारदार खेळाच्या जोरावर जर्मनीला पोचला आहे.

महापात्रा सांगतात ह्या सर्व प्रयत्नात केंद्र आणि राज्य सरकार यांनी खूप मदत केली. चंदनची काही कागदपत्रे, मुख्य म्हणजे जन्म नोंदणीचे प्रमाणपत्रच नव्हते. पण सरकारी कर्मचाऱ्यांनी सर्व कागदपत्रे वेळेत तयार करून दिली आणि म्हणूनच आज चंदन इतक्या सहजपणे ट्रेनिंग साठी जर्मनीला जाऊ शकला.

जागतिक धर्तीचा गाजलेला फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा चंदनचे प्रेरणास्थान आहे.
मेस्सी मुळे लोकप्रिय झालेली १० आकडा असलेली जर्सी ही तर चंदनची विशेष प्रिय.
विशेष म्हणजे जागतीकदृष्ट्या यशस्वी असलेल्या धडाकेबाज फुटबॉल खेळाडू मेस्सी आणि आपल्या भारतीय चंदनची कहाणी सुद्धा जवळपास सारखीच आहे.
अत्यंत गरीब घरातला असलेल्या मेस्सीला सुद्धा वयाच्या सातव्या वर्षी बार्सिलोना क्लबने असेच प्रशिक्षणासाठी निवडले होते.

अर्जेन्टिनातल्या अतिशय गरीब वस्तीत वाढलेल्या मेस्सीचा आज स्वतःचा असा एक मोठा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे.

चंदन म्हणतो मला खूप आनंद होतोय की मी एक दिवस भारताच्या टीम मध्ये खेळेन. चंदन आपल्या या प्रगतीचे, जडणघडणीचे आणि यशाचे सर्व श्रेय आपल्या गुरूला म्हणजेच कोचला देतो आणि त्यांचे कृतज्ञतेने आभारही मानतो.

गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर, म्हणजेच २५ ऑगस्ट भारताचा हा मेस्सी, चंदन, जर्मनीच्या म्युनिच मधल्या शिबिरासाठी रवाना झाला.

भारतात जेव्हा सगळे दहीहंडी’चा उत्सव साजरा करत होते तेव्हा हा चिमुरडा आपले आणि देशाचे नाव उंचावण्याच्या मोहिमेवर निघाला.

फिलिप्स लेहम सारखे जागतिक दर्जाचे कोच आता चंदनला तिथे शिकवणार आहेत.
जगभरातून निवडक १२० दर्जेदार युवा गुणी खेळाडू या शिबिरासाठी निवडले गेले आहेत.
चंदनला अश्या प्रकारचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण जर्मनीला मिळते आहे जे आपण कदाचीत त्याच्या वयाच्या मुलाला भारतात देऊ शकत नाही.

चंदनच्या आईला आणि त्याच्या गुरूला ‘टीम भारतीयन्स’चे मन:पूर्वक वंदन आणि भारताच्या या भावी मेस्सीला ‘टीम भारतीयन्स’ कडून खूप खूप शुभेच्छा !

 


 

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिअन एक्स्प्रेस