Bhartiyans

Menu

वाहतूक कोंडीतूनही मार्ग काढून अपघातग्रस्त रुग्णाला तत्काळ रूग्णालयापर्यंत नेणारी आगळी-वेगळी ‘बाईक अँब्युलन्स’

Date : 13 Feb 2017

Total View : 459

भारतात ‘बाईक एम्ब्युलन्स’ अर्थात दुचाकी रुग्णवाहिकेची सुरुवात २०१५ साली कर्नाटकमधील बंगळूर येथे झाली. त्यानंतर ही संकल्पना श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशन, केरळ यांच्यातर्फे राबवण्यात आली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, रुग्णवाहिकांची अपुरी संख्या अशा अनेक अडचणींवर मात करणारा ‘बाईक अँब्युलन्स’ हा प्रभावी पर्याय आहे.


सारांश

चारचाकी अँब्युलन्सला अपघातस्थळी पोहोचण्यास अनेकदा उशीर होतो. हा उशीर अपघातग्रस्त व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतो. यावर उपाय म्हणून दुचाकी रुग्णवाहिकेचा पर्याय वापरला जातो. भारतात दुचाकी रुग्णवाहिकेची सुरुवात २०१५ साली बंगळूर येथे झाली. त्यानंतर ही संकल्पना श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशन, केरळ यांच्यातर्फे राबवण्यात आली. लवकरच अशा ५० ‘बाईक अँब्युलन्स’ केरळमधील तिरुअनन्तपुरम ते अलाप्पुझा या महामार्गावर उपलब्ध करून देण्यात येतील.सविस्तर बातमी

आपल्या देशात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण व त्यामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. 

मात्र, थोडा बारकाईने या विषयाचा अभ्यास केला तर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर रुग्णालयात पोहचवले जात नाही; त्यांच्यावर वेळेवर औषधोपचार सुरु होत नाहीत, असं जाणवतं.
आणि खरतरं हेच अपघाताने होणाऱ्या मृत्यूंच मुख्य कारण आहे.

सरकार, विविध सेवाभावी संस्था व व्यक्ती या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी तत्पर असतात.
मात्र, रुग्णवाहिका न मिळणं, मिळाली तर वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, रुग्णवाहिकांची अपुरी संख्या अशा अनेक अडचणी अदयापही आहेत.

चारचाकी अँब्युलन्सला  अपघातस्थळी पोहोचण्यास अनेकदा उशीर होतो. हा उशीर अपघातग्रस्त व्यक्तीच्या जीवावर देखील बेतू शकतो. यावर उपाय म्हणून दुचाकी रुग्णवाहिका तयार करून वापरता येईल का? परदेशात ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली जाते आहे.

भारतात ‘बाईक एम्ब्युलन्स’ अर्थात दुचाकी रुग्णवाहिकेची सुरुवात २०१५ साली कर्नाटकमधील बंगळूर येथे झाली. प्रचंड वाहतुकीतून वाट काढत १० मिनिटात अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीचे प्रथमोपचार उपलब्ध करून देणाऱ्या या सेवेला दिवसाला एक डझनपेक्षा जास्त अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी बोलावलं जातं.
अशाच प्रकारची सेवा उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि आता केरळमध्ये विविध संस्थांमार्फत सुरु झाली आहे.

भारताच्या अनेक दुर्गम भागांमध्ये चारचाकी रुग्णवाहिका पोहोचणे अवघड असल्याने तेथे दुचाकी रुग्णवाहिका हा पर्याय प्रभावी ठरतो. सरकारी मदतीची वाट न पाहता काही समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती स्वखर्चाने ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प. बंगाल येथील करीमुल हक यांना त्यांच्या वैयक्तिक दुचाकी रुग्णवाहिका सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

करीमुल हक हे चहाच्या मळ्यातील कामगार असून जलपाईगुडी येथील अतिशय दुर्गम भागात रुग्णांना ते आपल्या दुचाकी रुग्णवाहिकेने रुग्णालयापर्यंत घेऊन जातात. त्यांनी आता पर्यंत ३०० रुग्णांना मदत केली असून, त्यांना प्रेमाने व आदराने लोक ‘अँब्युलन्स दादा’ असे म्हणतात.

भारतात केरळ राज्याचा अपघातांमध्ये ४था क्रमांक लागतो. येथे वर्षाला ४०००० अपघात होतात. अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील सुमारे ४००० आहे. अपघाती मृत्यूचे इतके भयानक प्रमाण असणाऱ्या केरळमध्ये रुग्णवाहिका आणि दवाखाने यांची संख्या मात्र अपुरी आहे. यासाठी केरळमध्ये गेल्या वर्षी ‘बाईक अँब्युलन्स’ ही सेवा सुरु करण्यात आली.

श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशन (SSSO) यांच्या वतीने ‘साई–एड–ऑन–व्हील्स’ हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला. या संस्थेचे अखिल भारतीय प्रमुख, निमेश पंड्या यांच्या मते, हळूहळू ही सेवा देशाच्या इतर भागातील हायवेवर देखील सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. अपघातातग्रस्त लोकांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हेतू आहे.

या प्रकल्पाच्या सुरुवातीला ५० ‘बाईक अँब्युलन्स केरळमधील तिरुअनन्तपुरम ते अलाप्पुझा या महामार्गावर उपलब्ध करून देण्यात येतील. SSSO चे प्रशिक्षित तरुण कार्यकर्ते त्या चालवतील, ज्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची मोफत वैद्यकीय सेवा मिळेल. SSSO चे राज्याध्यक्ष इ. मुकुंदन यांच्या मते, या ‘बाईक अँब्युलन्स’ अपघाताच्या ठिकाणी १० मिनिटांत पोहोचतात. त्यामुळे चारचाकी रुग्णवाहिकेच्या तुलनेत भरपूर वेळ वाचतो. गंभीर परीस्थिती असल्यास चारचाकी रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत रुग्णावर प्रथमोपचार सुरू होतात.

SSSO मार्फत इतरही अनेक सेवाभावी प्रकल्प चालविले जातात, त्यामध्ये ९०० ग्रामीण विद्यालये दत्तक घेण्याचा प्रकल्प आहे. यांपैकी ६७२ शाळा दत्तक घेण्यात आल्या असून उर्वरित शाळांबाबतची प्रक्रिया येत्या काही महिन्यात पूर्ण होईल.

पुढील ५ वर्षात, संपूर्ण भारतातील १०० शाळा सत्य साई विलेज इंटिग्रेटेड प्रोग्राममध्ये समाविष्ट केल्या जातील. या गावातील नागरिकांना शिक्षणासोबतच, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वृद्धसेवा केंद्र, शौचालये, तसेच आपत्तीनिवारण सेवा इ पुरवल्या जातील.

काळाची गरज ओळखून त्याप्रमाणे सेवांचे स्वरूप कालानुरूप करणे हे अत्यंत आवश्यक आहे. असे अतिशय समाजोपयोगी उपक्रम करणाऱ्या पद्मश्री करीमुल हक व श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशन (SSSO) व इतर संस्थाना ‘टीम भारतीयन्स’ च्या खूप शुभेच्छा !!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .


 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य