Bhartiyans

Menu

अत्याधुनिक बाईकवर स्वार होऊन रोडरोमिओना वचक बसवणाऱ्या राजस्थानच्या ‘लेडी दबंग’

Date : 14 Feb 2017

Total View : 852

रोडरोमिओंना जरब बसावा यासाठी राजस्थान सरकारने सिंगापूरच्या धर्तीवर २३ महिला पोलिसांची पेट्रोलिंग टीम तयार केली आहे. या महिलांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे.


सारांश

रोडरोमिओंना जरब बसावा यासाठी राजस्थान सरकारने महिला पोलिसांची विशेष पेट्रोलिंग टीम (गस्त घालणारे पथक) तयार करून तेथील महिला पोलिसांचा जणू सन्मानच केला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर तयार केलेल्या या टीमसाठी वेगळा गणवेश आहे. त्यांना सायरन, स्पीकर, प्रथमोपाचार पेटी आदी सुविधांनीयुक्त अशा बाईक्स देण्यात आल्या आहेत. २३ महिलांची ही टीम स्त्री-संरक्षणासाठी सदैव सतर्क असणार आहे.सविस्तर बातमी

‘जंजीर’पासून अगदी अलीकडच्या ‘दबंग’, ‘सिंघम’पर्यंत अनेक ‘पोलीस’ हिरोंनी आपल्या मनावर गारूड घातलं आहे. तसंच, ‘तेजस्विनी’पासून ‘मर्दानी’पर्यंत विविध चित्रपटातून दाखवलेल्या बॉलीवूडमधील महिला पोलीस अधिकारीही त्यांच्या व्यक्तिमत्वाने आपल्याला भारावून टाकतात. त्यांचा रणरागिणीचा अवतार त्यांच्यातील आत्मविश्वास आणि अन्यायाविरूद्धची चीड प्रकट करत असतो.

मात्र, अशा रणरागिणी केवळ चित्रपटातच असतात का?
नाही.. अजिबात नाही! प्रत्यक्षातसुद्धा असतात.

‘खाकी’ जेवढी पुरूषांनी गाजवली आहे, तेवढीच ती महिलांनी देखील गाजवली आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे कर्तव्य बजावताना लिंग, जात, वर्ण असे कोणतीही भेद पाळायचे नसतात, हे पुन्हा एकदा उदयपूरच्या सर्व ‘लेडी दबंग’ने दाखवून दिलं आहे..!

राजस्थान सरकारने तेथील महिला पोलिसांवर अधिक मोलाची व जोखीम असलेली जबाबदारी देऊन त्यांचा जणू सन्मानच केला आहे.

महिला पोलिसांची पेट्रोलिंग टीम (गस्त घालणारे पथक) राजस्थान सरकारने तयार केली आहे. सिंगापूरच्या धर्तीवर ही संकल्पना त्यांनी राबवली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया आणि गृह्मंत्री गुलाबचंद यांनी या टीमचे मनःपूर्वक स्वागत केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या टीमसाठी वेगळा गणवेश तयार करण्यात आला आहे. त्यांना सायरन, स्पीकर, प्रथमोपाचार पेटी आदी आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बाईक्स देण्यात आल्या आहेत. ‘महिला पेट्रोलिंग टीम’ मुख्यत्वे करून मुली वा महिलांची छेड काढणारे टवाळखोर आणि ‘रोडरोमिओ’ यांना जरब बसावा यासाठी काम करणार आहे.

उदयपूरचे पोलीस अधीक्षक गोयल यांनी या टीम बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. २३ महिलांच्या या टीमला ३-४ महिने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या टीम मधील प्रियंका आणि तुलसी या महिला पोलीस सांगतात, की तीन ते चार महिने आम्ही खूप मेहनत केली. जीममध्ये विविध प्रकारचे व्यायाम आमच्याकडून करवून घेतले जायचे. आम्हाला कराटे शिकवले. आम्ही देखील स्वत:च्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. आम्हाला बाईक चालवता येत नव्हती; त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. पिस्तुल चालवायला शिकवलं. पोलीस कारवाईचे नियम, कायद्यातील कलमे यांची ही माहिती दिली गेली.

राजस्थानचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक राज्याने जर असा उपक्रम राबवला, तर नक्कीच आपल्या घरातील सर्व माता-भगिनी सुरक्षित राहतील आणि इतकंच नव्हे तर कदाचित त्यांनाही महिला पोलीस होण्याची प्रेरणा मिळेल आणि पुन्हा एखादी नवी किरण बेदी होईल !


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

आज तक लाईट