Bhartiyans

Menu

मरीना बीचवरील चहावाली ते चेन्नईमधील ‘संदीपा’ या साखळी हॉटेल्सची मालकीण!

Date : 17 Feb 2017

Total View : 5486

चेन्नईच्या मरीना बीचवर चहा-कॉफीची विकणारी महिला ते ‘संदीपा’ या साखळी हॉटेल्सची मालकीण. पॅट्रिशिआ थॉमसच्या प्रवासाची दखल FICCI ने २०१० मध्ये घेतली आणि तिला यशस्वी महिला उद्योजक म्हणून गौरवण्यात आले.


सारांश

पॅट्रिशिआ थॉमस ही एक ख्रिश्चन मुलगी वयाच्या १७ व्या वर्षी तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते. कोर्टात जाऊन लग्नही करते. जुळी मुले होतात; पण अचानक तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा नंतर व्यसनांच्या प्रचंड आहारी जातो. घराला आधार देण्यासाठी ती मरीना बीचवर चहा विकते. तिचा प्रवास थेट चेन्नईमधील ‘संदीपा’ या साखळी हॉटेल्सची ती मालकीण होते येथे थांबतो.सविस्तर बातमी

चेन्नईच्या मरीना बीचवर चहा-कॉफीची छोटी हातगाडी लावणारी महिला ते चेन्नईमधील ‘संदीपा’ या साखळी हॉटेल्सची मालकीण हा पॅट्रिशिआ थॉमसचाप्रवास शब्दशः खडतर, उदासीनता आणि नैराश्याने ग्रासलेला होता.

मात्र, या नैराश्याने ती खचली नाही. तर, राखेतून पुन्हा नव्या उमेदीने उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तिने संधींच्या अवकाशात झेप घेतली आणि तिच्यासारख्या परिस्थितीने गांजलेल्या महिलांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला.

तिच्या जिद्दीची आणि मेहनतीची दखल FICCI (Federation of India Chamber of Commerce and Industry) ने २०१०मध्ये घेतली आणि तिला यशस्वी महिला उद्योजक म्हणून गौरवण्यात आले.

चला, तर आज पाहुया या पॅट्रिशिआ थॉमस-नारायणची यशोगाथा..!

एक ख्रिश्चन मुलगी वयाच्या १७ व्या वर्षी तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते. कळत्या-नकळत्या वयात प्रेमाच्या धुंदीत त्या मुलाशी कोर्टात जाऊन लग्नही करते. संसार सुरू होतो. जुळी मुले होतात; पण अचानक तिच्या स्वप्नातल्या त्या राजकुमाराचं वागणं भयानक बदलतं..! आधीचा तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तो नंतर तिला हाडतुड करू लागतो. व्यसनांच्या प्रचंड आहारी जातो.

घराची परिस्थिती अधिकाधिक रसातळाला जाऊ लागते. त्या वेळी घराला आधार देण्यासाठी ही महिला घराबाहेर पडते. मरीना बीचवर चहा-कॉफी विकणारी हातगाडी सुरू करते. येथून सुरू झालेला तिचा प्रवास थेट चेन्नईमधील ‘संदीपा’ या साखळी हॉटेल्सची ती मालकीण होते येथे थांबतो.

एखाद्या चित्रपटाला शोभेल असे हे कथानक काल्पनिक नाही तर ते पॅट्रिशिआ थॉमसचे वास्तवातील जीवन आहे.

पॅट्रिशिआ यांचे अगदी १७ व्या वर्षीच एका हिंदू मुलाशी लग्न झाले. एका कट्टर ख्रिस्ती कुटुंबातून ती हिंदू घरात आली. त्यामुळे तिच्या वडिलांचं मन दुखावलं आणि तिला माहेरही दुरावलं. स्वतःच्या इच्छेने केलेलं हे लग्न मात्र तिला सुख देऊ शकलं नाही. नव्याचे नऊ दिवस संपले आणि नवरा पूर्णत: दारूच्या आणि इतर व्यसनाच्या आहारी गेला होता. पदरात २ मुले होती; पण घरात खायला काही नाही अशी परिस्थिती!

पॅट्रिशिआची माहेरची परिस्थिती चांगली होती. आई-वडील दोघांनाही सरकारी नोकरी होती. वडील टपाल खात्यात तर आई टेलिफोनमध्ये. आई वडिलांना न कळवता तिने लग्न केलं आणि पदवीचं शिक्षण पूर्ण करून मग घरात सांगू असं दोघांनी ठरवलं. मात्र, लग्नानंतर नवऱ्याने रंग दाखवायला सुरुवात केली. तीनच महिन्यांनी धमकी देऊन त्याने तिला तिच्या घरच्यांना सगळं सांगण्यास भाग पाडलं.

सत्य कळाल्यावर वडिलांना खूप वाईट वाटलं; पण समाजासाठी त्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं. नंतर वडिलांनी त्यांच्याच घरात रहायला जागा दिली. तिचं नशीब त्यातल्या त्यात चांगलं असं होतं की, दिवसा नवरा व्यसन करत नसे आणि रात्री वडील रात्रपाळीला कामावर जात. त्यामुळे ही गोष्ट कोणाला कळाली नाही. मात्र, कितीही लपवलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही.

आईला तिची परिस्थिती पाहवत नव्हती. शेवटी, आईने एक दिवस थोडे पैसे तिच्या हातात ठेवले आणि सांगितलं की यातून काही होतंय का ते बघ..! आईच्या बोलण्यातून तिला नवा मार्ग दिसला. त्यांनी बाजारातून विविध लोणचे व इतर पदार्थ तयार करण्याचं साहित्य आणलं. तिच्या हाताला चव होतीच,एका दिवसातच बनवलेला सर्व माल आईच्या ऑफिसमध्ये विकला गेला. तिचा हुरूप वाढला. हा उद्योग तिने खूप दिवस केला.

त्यांच्या वडीलांच्या ओळखीत अपंग मुलांची शाळा घेणारे एक मित्र होते. अपंग मुलांना घेऊन व्यवसाय करणार असाल तर फिरती गाडी मिळत होती.पॅट्रिशिआ यांनी ही संधी घेतली. त्यानंतर मरीना बीचवर व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळवण्यासाठी १ महिना गेला. शेवटी व्यवसाय सुरु झाला. त्यांनी अपंग मुलांना प्रशिक्षण दिलं व कॉफीसोबत कटलेट्स, सामोसा, भाजी, फ्रेश ज्यूस आणि चहा असे पदार्थ विकण्यास सुरवात केली. तो दिवस होता २१ जुन १९८२.

पहिल्या दिवशीची विक्री केवळ १ कप कॉफी एवढीच. त्या पूर्ण निराश झाल्या; पण आईने धीर दिला. आई म्हणाली “ अग, एक कॉफी तर विकली गेली. उद्या अजून विक्री होईल.” केवढी ताकद होती त्या शब्दात. दुसऱ्या दिवशी रु ६०० ची विक्री झाली. १९८२ ते  २००३ ह्या दरम्यान त्यांनी हा व्यासाय चालू ठेवला. पहाटे ५ ते दुपारी ११ पर्यंत चहा-कॉफी विकण्याच्या व्यवसायातून त्यांची रोजची कमाई रुपये २५००० पर्यंत गेली.

हे सर्व अंगावर झेलण्यासाठी जणू काही त्यांच्यात एक शक्ती संचारली होती. पॅट्रिशिआची धडपड पाहून एका गृहस्थांनी तिला कॅन्टीन चालवण्याची ऑफर दिली. ते झोपडपट्टी निर्मूलन कार्यालयाचे अधिकारी होते. पॅट्रिशिआने हेही आव्हान स्वीकारले.

त्यांनतर त्यांना वेळ कमी पडू लागला. सकाळी ५ ते ९ मरीना बीच, दुपारी ९ ते ३ कॅन्टीन आणि ३ ते रात्री ११ पुन्हा मरीना बीच. त्यांच्याकडे तोपर्यंत स्वयंपाक, साफसफाई यासाठी लोकांची नेमणूक झाली होती. त्यानंतर त्यांना बँक ऑफ मदुराई येथी कॅन्टीन चालवण्याची ऑफर आली. तिथे जवळ जवळ ३०० लोकांना जेवण देण्यासाठी त्या काम करू लागल्या.

वाईटातून चांगलं घडतं. ही म्हण पॅट्रिशिआ यांच्याबद्दल लागू पडते. एक दिवस नवऱ्याशी भांडण झालं म्हणून त्या घराबाहेर पडल्या आणि अगदी शेवटचा बस-थांबा येईपर्यंत बसने गेल्या. त्या जिथे उतरल्या ते ऑफिस राष्ट्रीय पोर्ट प्रशिक्षणाचे होते. तिथे त्यांनी स्वतः बद्दल सांगितले. योगायोग असा, की त्याचवेळेस तिथला कॅन्टीन कंत्राटदार सोडून गेला होता आणि ते नवीन माणसाच्या शोधात होते. लगेच तिथही पॅट्रिशिआ यांना काम मिळाले.

‘मरीना बीच म्हणजे माझे MBA चे प्रशिक्षण केंद्र होते.’ असं पॅट्रिशिआ म्हणतात ते खरंच आहे. 

१९९८ मध्ये त्यांना एका साखळी हॉटेलची भागीदारी मिळाली. परंतु त्यांचा मुलगा याने स्वतःचे रेस्टॉरंट सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व घडत असताना त्यांच्यावर अनेक मानसिक आघातही झाले. त्यांची मुलगी आणि जावई यांचे कार अपघातात निधन झाले. हा आघात त्यांना सहन करणे केवळ अशक्य होते त्या खचून गेल्या.

या सगळ्यात नवरा मात्र तसाच होता. व्यसनाधीन, साधे दारूला पैसे नाकारले, की सिगारेटचे चटके देणारा. मध्येच तो महिनोनमहिने गायब होत असे. असाच एकदा तो कुठेतरी गेला असताना त्याचे तिकडेच निधन झाले.

मुलीच्या आणि जावयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ पॅट्रिशिआ यांनी २००६ मध्ये मुलाबरोबर ‘संदीपा’ नावाचे हॉटेल सुरु केले. मुलीप्रमाणे त्या हॉटेलला जपतात.

पॅट्रिशिआ सांगतात, “माझा व्यवसाय मी २ व्यक्तींबरोबर सुरु केला. आज माझ्याकडे २०० पेक्षा जास्त लोक कामाला आहेत. माझी जगण्याची पद्धती बदलून गेली, सायकल रिक्षा ते महागड्या कार्स. प्रतिदिन ५० पैसे ते रु २,००,००० विक्री”

प्रचंड कष्ट आणि मेहनतीने आपले जीवन बदलवणाऱ्या पॅट्रिशिआ यांनी काही यशस्वी सूत्रे मांडली आहेत. त्या म्हणतात-

 • आपल्याला काय आवडते, काय येते यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःवर आणि स्वतःच्या उत्पादनावर विश्वास ठेवा.
 • गुणवत्तेमध्ये तडजोड नको.
 • कर्मचाऱ्याना जे काम काम सांगत आहात ते तुम्हालाही आलं पाहिजे
 • संकटे अधिक प्रगल्भ बनवतात आणि दीर्घकाळ टिकणारे यश देतात.
 • यश सतत मिळवत राहण्याकडे लक्ष द्या.
 • संकटाला न घाबरता ‘पुढे जात राहणे’ हा मंत्र लक्षात ठेवता.
 • यशस्वी उद्योजक होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. तुमच्याकडे तुम्हाला यशाकडे नेणारी उर्मी असायला हवी.

  #Bharatiyans

  Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’.

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य