Bhartiyans

Menu

'भारताच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेच्या यशामागे अनेक स्त्री शास्त्रज्ञ असतात'....

Date : 18 Feb 2017

Total View : 1288

'स्त्रिचा जन्म म्हणजे फक्तं चूल आणि मूल' हा समज खोटा ठरवत भारतातल्या निरनिराळ्या राज्यांतून आलेल्या हजारो स्त्री शास्त्रज्ञ आज इस्रोच्या अनेक मोहिमा समर्थपणे सांभाळत आहेत.


सारांश

'स्त्रिचा जन्म म्हणजे फक्तं चूल आणि मूल' हा समज खोटा ठरवत भारतातल्या निरनिराळ्या राज्यांतून आलेल्या हजारो स्त्री शास्त्रज्ञ आज इस्रोच्या अनेक मोहिमा समर्थपणे सांभाळत आहेत. आणि ह्यात महत्वाची गोष्टं म्हणजे 'संसाराऐवजी’ त्या हे काम करत नसून, घर, संसार, स्वत:च्या मुलांची शिक्षणं सांभाळून त्या देशाच्या मोठ्या आणि अत्यंत महत्वाच्या अशा अंतराळ मोहिमांचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत.सविस्तर बातमी

'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते' हे खरेच आहे.
पण आता, 'भारताच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेच्या यशामागे अनेक स्त्री शास्त्रज्ञ असतात' असं म्हणायला हवं! 

'स्त्रिचा जन्म म्हणजे फक्तं चूल आणि मूल' हा समज खोटा ठरवत भारतातल्या निरनिराळ्या राज्यांतून आलेल्या हजारो स्त्री शास्त्रज्ञ आज इस्रोच्या अनेक मोहिमा समर्थपणे सांभाळत आहेत.

आणि ह्यात महत्वाची गोष्टं म्हणजे 'संसाराऐवजी’ त्या हे काम करत नसून, घर, संसार, स्वत:च्या मुलांची शिक्षणं सांभाळून त्या देशाच्या मोठ्या आणि अत्यंत महत्वाच्या अशा अंतराळ मोहिमांचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत.

'मंगळ मोहिमेतील सखोल विषयांत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी २०% शास्त्रज्ञ ह्या स्त्रिया आहेत.' त्यातीलच काही स्त्रियांविषयी-

रितू कारिढाल 

लहानपणापासून चंद्राच्या बदलणा-या कलांबद्दल आकर्षण होतं हिला! आणि घरी नेहमी प्रश्नं विचारायची, 'चंद्राच्या त्या पलीकडच्या अंधाऱ्या बाजूवर काय आहे?'

काही दशकानंतर दोन लहानग्यांची आई झाली.
बास इतकंच? 

नाही!
मार्स ऑर्बिटर मिशनची डेप्युटी ऑपरेशन्स डिरेक्टर या पदावर आहे इस्रोमधे!

इस्रोच्या एका मोठ्या आणि महत्वाच्या मोहिमेचं नेतृत्व करते!

मौमिता दत्त

चांद्रयान मोहिमेबद्दलच्या बातम्या वाचण्यात हिचं बालपण गेलं.
कोलकत्ता विद्यापीठातून अप्लाइड फिजिक्समधे एम्. टेक. करून आता इस्रोच्या मार्स मिशनची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते!
'ऑप्टिकल सायन्सचा पायाभूत नैसर्गिक विकास कसा होऊ शकतो' या  संदर्भात 'मेक इन इंडिया' मोहिमेअंतर्गत काम करणाऱ्या टिमचे नेतृत्व करते! 

नंदिनी हरिनाथ 

शिक्षकी पेशा आणि इंजिनिअर्स असणाऱ्या कुटुंबातली ही स्त्री, एक आई असूनही कामासाठी गेले कित्येक महिने दुपारचं जेवण स्वत:च्या घरी जेवली नाहीये!

तिला पहिली नोकरी लागली ती इस्रोत.
त्यानंतर वीस वर्ष ती निष्ठेने काम करतं आहे.
भारत सरकारने आणलेल्या नव्या दोन हजारच्या नोटेवर मार्स मिशनचे चित्र बघून तिला खूप अभिमान वाटला.
का नाही वाटणार?

आपल्यालाच इतका अभिमान वाटतो, तर त्याच मिशनची डेप्युटी डिरेक्टर म्हणून काम पाहणाऱ्या नंदिनीला काय वाटत असेल!

अनुराधा टि. के.

जिओसॅट प्रोग्राम डिरेक्टर म्हणून काम पाहणाऱ्या ह्या इस्रोमधली सर्वांत ज्येष्ठ स्त्री अधिकारी आहेत.
नील आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा ह्या नऊ वर्षांच्या होत्या.
आणि तेव्हापासूनच अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्नं उराशी बाळगलं.

एक ज्येष्ठ अधिकारी म्हणून इस्रोमधल्या बाकी सगळ्या स्त्री शास्त्रज्ञांसाठी त्या एक प्रेरणास्थान आहेत.

त्या म्हणतात की इस्रोमधे स्त्री आणि पुरुष हे वेगळे मानलेच जात नाहीत. शास्त्रज्ञांना कुठलीच जात नसते.
त्यामुळे स्त्री म्हणून वेगळं असं काही वाटतंच नाही. 

एन्. वलरमथी 

अनुराधा टि. के. यांच्यानंतर एखादं मिशनचे नेतृत्व करणारी इस्रोमधली ही दुसरी महिला!

'दि रडार इमेजिंग सॅटेलाईट-१' (RISAT-1) ह्या भारताच्या पहिल्या स्वतंत्र मोहिमेचे ह्यांनी नेतृत्व केले.

मुळच्या तामिळनाडूच्या असणाऱ्या ह्या स्त्रिने वयाच्या बावन्नाव्या वर्षी ही मोहीम पूर्ण केली आणि रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट असणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व करणारी ही पहिली भारतीय महिला ठरली. 

मिनल संपथ

मार्स मोहिम फत्ते व्हावी यासाठी दिवसातले अठरा तास काम करणारी ही स्त्री!

हिने दोन वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतली नाही. इतकेच नाही तर रविवार आणि हक्काच्या इतर सुट्ट्यांनाच हिने सुट्टी देऊन टाकली आणि सिस्टीम इंजिनिअर म्हणून ५०० शास्त्रज्ञांची टिम सलग दोन वर्ष लीड केली. 'नॅशनल स्पेस एजन्सी'ची पहिली स्त्री हेड होण्याचं तिचं स्वप्न आहे. 

किर्ती फौजदार

संगणक शास्त्रज्ञ असणारी ही स्त्री, इस्रोच्या  मास्टर कंट्रोल फॅसिलीटीची हेड म्हणून काम पाहते. आपण सोडलेले उपग्रह त्यांच्याच कक्षेत फिरत आहेत का याकडे लक्ष ठेवण्याचं अत्यंत महत्वाचं असं तिचं काम आहे.

दिवस रात्र काम करणारी ही स्त्री, आपल्या उपग्रहांच्या कक्षेत काही चुकीचे झाले तर ते सुधारण्याचे काम करते.

इस्रोचे काम आणखी मोठे व्हावे यासाठी एम्. टेक. करण्याचा तिचा मानस आहे. 

इस्रोमधे आत्ताच्या घडीला सोळा हजाराहून जास्तं महिला शास्त्रज्ञ आहेत!

"For them even sky is not the limit!"

घरात, देशात आणि अंतराळ क्षेत्रात तिन्हीकडे आघाडीवर असणाऱ्या ह्या इस्रोच्या सर्व महिला शास्त्रज्ञांना टिम भारतीयन्सचा मानाचा मुजरा!

श्रुती आगाशे,

टिम भारतीयन्स


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’.

श्रुती आगाशे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

स्टोरी पिक