Bhartiyans

Menu

अब्दुल कलामांकडून प्रेरणा घेऊन ‘Wings for Eeducation’ संस्थेद्वारे मुलांना शिक्षणाचे ‘धीरज’ देणारा शिक्षक..!

Date : 22 Feb 2017

Total View : 686

धीरज डोंगरे या शहापुर जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने सुमारे १०० मुले दत्तक घेतली आहेत. ‘Wings for Education’ या संस्थेद्वारे १५०० मुलांच्या शिक्षणासाठी निधी संकलनाचे काम तो करतो आहे.


सारांश

‘तो’ एका रात्री भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र ‘Wings of fire’ अर्थात ‘अग्निपंख’ वाचत होता. प्रस्तावना वाचून झाली आणि त्याला झोप लागली..... आश्चर्य म्हणजे, त्याच्या स्वप्त्नात दस्तुरखुद्द अब्दुल कलाम आले आणि पुढे काय झालं...? ते त्याला काय म्हणाले..? हा ‘तो’ आहे तरी कोण...? जाणून घेण्यासाठी वाचा..!सविस्तर बातमी

तो एका रात्री भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र ‘Wings of fire’ अर्थात ‘अग्निपंख’ वाचत होता.
प्रस्तावना वाचून झाली आणि त्याला झोप लागली.....
आश्चर्य म्हणजे, त्याच्या स्वप्त्नात दस्तुरखुद्द अब्दुल कलाम आले आणि पुढे काय झालं...? ते त्याला काय म्हणाले..? हा ‘तो’ आहे तरी कोण...? जाणून घेण्यासाठी वाचा..!

आज सोशल मीडियामुळे जग जोडलं गेलं आहे. केवळ एका क्लिकवरून आपण कोणाशीही संपर्क साधू शकतो.

नवे मित्र जोडले जातात. एकूणच, तुमचं अवकाश विस्तारतं. ‘फेसबुक’ हे असंच एक माध्यम. ज्याद्वारे तुमचे अनेक मित्र-मैत्रिणी होतात आणि त्यांच्याशी अनेकदा अगदी घट्ट मैत्री देखील होते.

धीरज डोंगरे हा असाच माझा एक ‘फेसबुक मित्र’. धीरजचे एकंदरीत काम आणि त्याचे फोटो फेसबुकवर पाहिले आणि त्याच्याशी संपर्क साधावा असं वाटलं. त्याचा स्वप्नील जोशीसोबतचा फोटो पाहिला. त्याचं कौतुक केलं आणि नंबर घेतला. मी स्वतः एक संस्था सुरु करू इच्छिते; पण धाडस होत नाही. मला अजून तसा अनुभव नाही. त्याविषयी मला धीरजशी बोलायचे होते. आम्ही whats app वरही खूप गप्पा मारल्या.

धीरजच्या कामाचा आवाका पाहून मी थक्क झाले आणि जाणवलं की हे व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्याला भेटायचं असं मी ठरवलं. लवकरच तसा योग आला. पुण्याजवळील नारायणगाव येथे आम्ही भेटलो. अगदी प्रथमच भेटत होतो तरी खूप जुने मित्र आहोत, असं वाटत होतं. मी तर अक्षरशः त्याची मुलाखतच घेतली.

तो जे बोलत होता त्यातून अनेक समज-गैरसमज गळून पडत होते. त्याची समाजकार्याविषयीची ओढ जाणवत होती.

दहावी-बारावीला चांगले गुण, मग उत्तम कॉलेज, नंतर तगड्या पगाराची नोकरी, मग छोकरी आणि लग्न. ही सध्याच्या तरुणांची असलेली मानसिकता आणि ध्येय किती तात्पुरत्या स्वरूपाचं वा उथळ आहे, हे धीरजशी बोलताना जाणवलं. त्याच्या डोळ्यातलं समाधन पहिल्यावर हे सगळं खोटं आहे हे पटलं.

धीरज हा बारावीपर्यंत अतिशय खोडकर आणि मस्तीखोर मुलगा होता. आई शिक्षिका, वडिलांची उत्तम नोकरी, धाकटा भाऊ हुशार. तो उत्तम गुण मिळवत होता. मात्र, धीरज आपल्याच धुंदीत होता. मस्तपैकी मजा-मस्ती करावी आणि जमेल तेवढाच अभ्यास करावा. पास होण्यापुरतं मार्क्स मिळवणं हे त्याचं ध्येय. दहावी त्याला ७०% पडले. आईने शास्त्र शाखेत प्रवेश घ्यायला लावला. बारावीला मात्र धीरजची ४७% वरच थांबली. पुढे काय? सगळ्यांनाच चिंता वाटू लागली.

आईचे गुरु म्हणाले याला शिक्षणाचं महत्व कळावं असं वाटत असेल तर त्याला डी.एड.ला घाला. तिथून मात्र, धीरजच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. त्याने मन लावून अभ्यास केला आणि शिक्षक झाला. शहापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी लागली.  

धीरज शाळेत रुजू झाला खरा, पण २ दिवसात स्वारी घरी पळून जायला निघाली. तेव्हा, गावकरी म्हणाले सर, जरा ८ दिवस रहा तरी. आमच्या गावात शिक्षक टिकतच नाही. त्यांच्या विनंतीखातर धीरज ८ दिवस राहिला.

या काळात त्याने पाहिलं अनवाणी शाळेत येणारी मुले, सोयी सुविधांचे नामोनिशाण नाही, डबा मिळाला तर नाही तर तसंच शाळेत येणारी मुलं, अशी विदारक अवस्था. ते दृश्य आणि गावकऱ्यांचं प्रेम पाहून धीरजचं मन गलबलून गेलं. त्याने या गावासाठी आणि मुलांसाठी काहीतरी करायचं असं ठरवलं. सर्वप्रथम त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून मदत गोळा केली. शालेय साहित्य गोळा केलं आणि ते मुलांना वाटलं.

याच काळात त्याच्या वाचनात अब्दुल कलाम यांचं अग्निपंख आलं. त्या पुस्तकाची केवळ प्रस्तावना त्याने वाचली आणि आश्चर्य म्हणजे, त्याला रात्री स्वप्नात अब्दुल कलामच दिसले. ते धीरजला म्हणाले, ‘अरे, तू हे काय करतोय? तू जरा विचार कर. तू अनेकांना मार्गदर्शन करू शकतोस. इतरांना शिक्षणात रस वाटावा असं कार्य करू शकतोस!’

या स्वप्नामुळे धीरजमध्ये अमुलाग्र बदल झाला. शाळेतील मुलांना पुस्तक भेट, शालेय वस्तू भेट असे उपक्रम राबवत तो ५००० लोकांपर्यंत पोहोचला. धीरजला गड किल्ल्यांची अतिशय आवड आहे. तशाच एका ग्रुपने धीरजच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. धीरजचे कुटुंबीय, नातेवाईक,मित्रमंडळ असे अनेक जण या कार्याशी जोडले गेले आहेत.

धीरज एवढ्यावरच थांबला नाही. आदिवासी पाड्यात मुलीला फार तर दहावीपर्यंत शिकवतात आणि नंतर लग्न लावून देतात. धीरजने अशीच एक मुलगी दत्तक घेऊन तिला बारावीपर्यंत शिकवलं. तिचे पुढील शिक्षण आजही सुरू आहे. पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांनी त्यांच्या मुलांना शालेय साहित्य द्यावं यासाठी धीरज धडपडत असतो. धीरजने अशी सुमारे १०० मुले दत्तक घेतली आहेत. शहापुरात ‘शांतीवन’सारखे गुरुकुल उभे करण्याची त्याची इच्छा आहे. त्यामुळे विविध खेळ, नाट्य, नृत्य, संगीत आणि अभ्यास एकाच छताखाली येतील.

यासाठीचे पहिले पाऊल म्हणून धीरजने एका संस्थेची नोंदणी केली आहे. संस्थेचे नाव आहे ‘wings for Education’. गेली १० वर्षे तो फक्त काम करत होता, आता त्याला या कामाला संस्थेच्या माध्यमातून निश्चित आकार द्यायचा आहे.

या सगळ्या कार्यातून मिळणारं समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. त्याच्या बोलण्यात एक आत्मविश्वास जाणवतो. सध्या तो शहापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि विविध छोट्या गावातील १५०० मुलांच्या शिक्षणासाठी निधी संकलनाचे काम करतो आहे. धीरजचे आता लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. त्याची पत्नी सुशिक्षित आणि त्याच्या कार्यात मनापसून मदत करणारी आहे.

धीरज मला म्हणाला, “आज माझ्याकडे घर, गाडी, बायको, मुलगी आणि या कार्यातून मिळणारं आत्मिक समाधान असं सगळं आहे. अजून काय हवं असतं माणसाला?’’ त्याच्या या बोलण्याने मलाच प्रश्न पडला खरंच काय हवं असतं आपल्याला? पैशाच्या मागे धावण्याच्या नादात एसी ऑफिसमध्ये बसूनही जे मिळत नाही, ते चेहऱ्यावरचे निर्मळ हसू आणि समाधान धीरजच्या चेहऱ्यावर दिसतं. हीच त्याची कमाई आहे..!

 धीरज डोंगरेला त्याच्या कार्यात जर तुम्हाला मदत करायची असेल तर ९८६०२९६९१९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा...!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य