Bhartiyans

Menu

एमबीएनंतर उत्तम नोकरी नाकारून डोश्याची गाडी ते हॉटेल ‘डोसा हाऊस’चा मालक असा यशस्वी प्रवास करणारा उद्योजक!

Date : 23 Feb 2017

Total View : 1408

एका इडली-डोसा विक्रेत्याचा मुलगा एमबीए होतो. त्यानंतर नोकरीची उत्तम संधी नाकारून वडिलांना त्यांच्या व्यवसायात पूर्णवेळ मदत करायची असे ठरवतो. पुढे हाच मुलगा हैद्राबादमधील सुप्रसिद्ध हॉटेल ‘डोसा हाऊस’चा मालक होतो.


सारांश

हैद्राबादचा रामकुमार शिंदे एम.बी.ए. झाल्यावर उत्तम नोकरी नाकारून वडिलांना त्यांच्या व्यवसायात पूर्णवेळ मदत करून यशस्वी उद्योजक होण्याचे ठरवतो. कारण, तो ८-९ वर्षांचा असल्यापासून वडिलांचे इडली-डोसा बनवून विकण्याचे कष्ट पाहत होता. तो नामपल्लीमध्ये ‘राम की बंडी’ नावाची डोश्याची गाडी सुरू करतो. चविष्ट पदार्थ आणि गुणवत्ता यामुळे त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. तो पुढे ‘डोसा हाऊस’ नावाचे सुप्रसिद्ध हॉटेल सुरू करतो.सविस्तर बातमी

नाव : रामकुमार शिंदे

वय : साधारण ३० वर्षे

शिक्षण : एम.बी.ए.

व्यवसाय : डोश्याची गाडी

नाही..नाही...असे गोंधळू नका! दचकू नका!
तुम्ही बरोबर वाचलं! एम.बी.ए. झालेला रामकुमार शिंदे हा चक्क डोशाची गाडी चालवतो! हैद्राबादमध्ये ‘राम की बंडी’ नावाची त्याची सुप्रसिद्ध डोश्याची गाडी आहे. त्याच्या ‘zomato.com’, ‘tripadvisor’ आणि google वर प्रसिद्ध असलेल्या त्याच्या गाडीवरील ‘बटर डोसा’, ‘चीज डोसा’ आणि ‘पिझ्झा डोसा’ इतकीच त्याच्या या व्यवसायातील यशाची कहाणी देखील रुचकर आहे!

रामकुमारच्या आजच्या यश आणि प्रसिद्धीमागे मेहनत व खडतर प्रवास आहे. त्याच्या अखंड कष्टांचा, चिकाटीचा हा प्रवास अनेक मुलाखतींमधून, युट्यूबवरील व्हिडीओजमधून, विविध वेब् साईट्स, ब्लॉग्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येतो, तेव्हा कौतुक वाटतं...!
त्याची कहाणीसुद्धा रंजक आहे!

एका इडली-डोसा विक्रेत्याचा मुलगा एमबीए होतो; पण त्यानंतर आरामात ए.सी. ऑफिसमध्ये बसून काम करायची उत्तम संधी नाकारून वडिलांना त्यांच्या व्यवसायात पूर्णवेळ मदत करायची असे ठरवतो. 

कोणालाही याचे आश्चर्यच वाटेल. यशस्वी उद्योजक होण्याच्या त्याच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे तो हा निर्णय घेऊ शकला. वीस हजार रुपयांची नोकरी नाकारून आपला व्यवसाय सुरु करण्याची आणि तो यशस्वी करून दाखवण्याची जिद्द हेच राम कुमारच्या ‘राम की बंडी’च्या यशाचे गमक आहे.

साधारण ८-९ वर्षांचा असल्यापासून राम आपल्या वडिलांचे इडली-डोसा बनवून विकण्याचे कष्ट पाहत होता. एका हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या त्याच्या वडिलांनी याच व्यवसायाच्या आधारावर त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. ही जाणीव ठेवून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चालून आलेली २०,००० रुपये महिना पगाराची नोकरी नाकारून त्याने वडिलांना पूर्णवेळ मदत करायचे ठरवले.

रामने वडिलांसारखीच एक स्वतंत्र हातगाडी सुरु केली. अधिक भांडवल गुंतवले; पण व्यवसाय म्हटलं की कष्ट, उतार-चढाव, यश-अपयश हे सगळं येतचं. त्यामुळे राम थोडा नाखूष होता. त्याला म्हणावा तसा फायदा होत नव्हता.

हैद्राबादला शेकडो लोक इडली, डोसा बनवून विकतात, त्यात आपले वेगळेपण काय? लोकांनी आपल्याचकडे डोसा खाण्यासाठी का यावं? हा विचार तो सतत करायचा. असे प्रश्न त्याला भंडावून सोडत होते. हीच तर त्याची खरी परीक्षा होती. उत्पादनात नाविन्य, विविधता आणि गुणवत्ता असेल तरच ग्राहक आकर्षित होतात, असे तो एम.बी.ए.मध्ये शिकला होता. त्याच्या शिक्षणाचा योग्य तो वापर करण्याची संधी चालून आली होती. 

रामने डोसा विकणाऱ्या त्याच्यासारख्या इतर व्यावसायिकांची माहिती काढली. त्याला लक्षात आलं की, आपण काहीतरी वेगळे केले, तरच स्पर्धेत टिकू. त्याने विविध प्रयोग करून बटर डोसा, चीज डोसा आणि पिझ्झा डोसा हे नवे प्रकार आणले आणि पाहतापाहता ‘राम कि बंडी’ फेमस झाली! त्याने या करिता आपल्या कुटुंबाकडूनही थोडी मदत घेतली आणि नामपल्ली येथे ‘राम कि बंडी’ दणक्यात सुरु झाली.

जातीच्या खवय्यांना वेळेचं बंधन नसतं. रामची ही ‘बंडी’ म्हणजेच ‘गाडी’ मध्यरात्री ३ ला सुरू होते आणि सकाळी ८ पर्यंत चालते; या थोड्या विचित्र वेळीसुद्धा त्याच्याकडे लांबून ग्राहक खास डोसा खाण्यासाठी येतात. उत्कृष्ठ दर्जाचे लोणी, चीज आणि इतर साहित्याचा सढळ हाताने वापर वापर, स्वच्छता आणि कामावरील निष्ठा व आवड यामुळे ‘गुगल मेप’ वर दिसणारी सध्यातरी ही एकमेव हातगाडी आहे. 

दिवसाला १००० खवय्ये येथे हजेरी लावतात. काही लोक तर चक्क सुट्टीच्या दिवशीसुद्धा खास डोसा खाण्यासाठी पहाटे उठण्याचे कष्ट घेतात. हेच रामचे यश आहे!

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून रामने अजून एक मोठी उडी घेतली. त्याने दोन वर्षांपूर्वी हैद्राबादच्या अतिशय अलिशान समजल्या जाणाऱ्या ‘बंजारा हिल्स’ भागामध्ये एक सुंदर व दिमाखदार असे ‘डोसा हाउस’ नावाचे रेस्टोरंट सुरु केले. त्याला देखील उदंड प्रतिसाद मिळाला. इथे ए.सी.च्या थंड वातावरणात अनेक उच्चभ्रू खवय्ये मोठ्या चवीने ‘राम की बंडी’च्या डोशांबरोबरच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.

रामच्या गाडीवर आणि हॉटेलमध्ये आजवर राजकारण ते सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. रामकुमार संध्याकाळी त्याच्या या हॉटेलमध्ये स्वत: जातीने लक्ष देतो. त्याच्याकडे ३० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्याच्या हॉटेलमधील शेफला तो ३० ते ४० हजार रुपये पगार देतो.

या यशाने राम हुरळून गेलेला नाही. त्याला अद्यापही आपल्या नामपल्ली भागातील गाडीवर रात्री काम करणं आवडतं. 

त्याच्या मते, “जिथून माझा प्रवास सुरु झाला त्याची जाण मी १० हॉटेल सुरु केले तरीही ठेवलीच पाहिजे”. म्हणूनच आजही त्याचा दिवस पहाटे २ वाजता सुरु होतो. ३ ते ८ तो ‘राम कि बंडी’ वर डोसे बनवतो. पुरेशी झोप न मिळाल्याची कुठलीच खंत त्याच्या चेहऱ्यावर नसते. ग्राहकांना मिळणारे समाधान पाहून त्याचा चेहरा नेहमी आनंदाने झळकत असतो.


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य