Bhartiyans

Menu

४० हून अधिक निराधार मुलांच्या आयुष्याचा ‘आधारवड’ ठरलेला बीडचा संतोष गर्जे..!

Date : 27 Feb 2017

Total View : 1163

बीडच्या गोविंदवाडी येथील गेओराईमध्ये ३ एकरवर वसलेला ‘बालग्राम’ हा ४० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि निवासव्यवस्था देणारा अनाथाश्रम चालवणारा संतोष गर्जे हा या भागातील निराधार मुलांच्या आयुष्याचा आधारवड ठरला आहे.


सारांश

महाराष्ट्रात निसर्गापासून अनेक घटकांनी बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भागातील सर्वांचेच प्रश्न अनुत्तरित आहेत. अशा निराशाजनक वातावरणात गोविंदवाडी या खेड्यातील निराधार मुलांसाठी बालग्रामसारखा अनाथाश्रम आणि आई फाउंडेशनची स्थापना संतोष गर्जे या तरुणाने वयाच्या १८ व्या वर्षी केली. आज तो गेओराईमध्ये ‘बालग्राम’ हा अनाथाश्रम चालवतो. या आश्रमात ४० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि निवासव्यवस्था देण्यात येते.सविस्तर बातमी

महाराष्ट्रातील कायम दुर्लक्षित आणि विकासाची वानवा असलेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे बीड जिल्हा..!

निसर्गापासून अनेक घटकांनी बीडकडे पाठ फिरवलेली दिसते. त्यामुळे या भागातील लहान मुले, तरुण, स्त्रिया, वृद्ध अशा सर्वांचेच प्रश्न अनुत्तरित आहेत. अनेक ठिकाणी तर अजूनही मुलभूत प्रश्नसुद्धा सुटलेले नाहीत.

अशा निराशाजनक वातावरणात बीड जिल्ह्यातील गोविंदवाडी या छोट्याशा खेड्यातील निराधार मुलांसाठी बालग्रामसारखा अनाथाश्रम आणि आई फाउंडेशनची स्थापना करणारा संतोष गर्जे हा आशेचा किरण ठरला आहे. 
संतोषने जेव्हा याची सुरुवात केली, तेव्हा तो अवघ्या १८ वर्षांचा होता! 
आज वय वर्षे २९ असलेला संतोष गेओराईमधील शिवाजीनगर परिसरात ३ एकरवर वसलेला अनाथाश्रम चालवत आहे. येथे तो ४० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि निवासव्यवस्था देतो आहे.

संतोषमधल्या समाजसेवकाची स्वप्ने एवढ्यावर समाधान मानणारी नाहीत. त्याला कमीत कमी १०० विद्यार्थ्यांसाठी अशीच सोय करायची आहे. मुलींसाठी स्वतंत्र इमारत बांधायची आहे. एक विहीरसुद्धा खोदायची आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून रहावे लागणार नाही. या सगळ्यासाठी संतोषला सुमारे ३० लाख रुपयांची गरज आहे.

तो सांगतो, “त्यांचे गाव पाण्यासाठी पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. गेली ३ वर्षे पावसाने ओढ दिल्याने महिन्याला १५००० रु केवळ पाण्यावर खर्च होत आहेत. विहीर बांधली तर मुलांचा पाण्याचा प्रश्न सुटेलच, याशिवाय आश्रमासाठी लागणारा भाजीपालासुद्धा पिकवता येईल.

बीएमसीच्या समाज कल्याण अधिकारी शुभा बेनुरवार यांनी संतोषला निधी संकलनासाठी आतापर्यंत खूप मदत केली आहे. या निधीमधून त्याने मुलांना दप्तरं, वह्या, पुस्तकं आणि नवीन कपडे घेतले. त्या मुलांसाठी या नवीन वस्तूंचा आनंद अवर्णनीय होता.

बालग्राम जेव्हा सुरु झालं, तेव्हा केवळ ७ मुले होती. ती देखील आसपासच्या ‘रेड लाईट’ एरियातील होती. या मुलांसाठी अनाथाश्रम सुरु करण ही सोपी गोष्ट नव्हती. सरकारी अडथळे आणि उदासीनता याला संतोषला तोंड द्यावं लागलं.

अनाथाश्रमासाठीचा परवाना मिळवण्यासाठी त्याच्याकडून लाच मागितली गेली. जेव्हा त्याने चिडून म्हटलं, की मी अनाथाश्रम बंद करतो. या निराधार मुलांना तुम्हीच सांभाळा! तेव्हा कसाबसा त्याला परवाना मिळाला.

एका गरीब शेतमजुराचा मुलगा असलेला संतोष एक संवेदनशील समाजसेवक बनण्यामागे तशीच एक ह्रदयस्पर्शी कहाणी आहे. नवऱ्याच्या मारहाणीमुळे त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या भाचीला निराधार करून बहिणीच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. या धक्क्यामुळे वडील घरातून निघून गेले, ते अजूनही परत आलेले नाहीत. त्याचवेळी संतोषने ठरवलं, की आपण शिक्षक व्हायचं आणि अशा निराधार मुलांसाठी बालग्राम सुरु करायचं.

आज ८ वीत शिकत असलेल्या संतोषच्या भाचीची जबाबदारी भुसावळमधील एका डॉक्टरांनी स्वीकारली आहे.

अनेक निराधार मुलांच्या आयुष्याचा आधारवड झालेल्या ‘संतोष गर्जेला’ त्याच्या सत्कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी ‘टीम भारतीयन्स’तर्फे अनेकानेक शुभेच्छा...!

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य