Bhartiyans

Menu

‘मॅजिक बस’च्या साहाय्याने वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या जीवनात नवे ‘मॅजिक’ करणारी पूजा कश्यप

Date : 01 Mar 2017

Total View : 560

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अवघ्या १५ व्या वर्षी पेलवून दिल्लीच्या पूजा कश्यपने ‘मॅजिक बस’च्या माध्यमातून वस्त्यांवरील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाचं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याच्या कामास सुरुवात केली.


सारांश

वय वर्षे १५ हे ‘सोळाव्या वरीस’च्या उंबरठ्यावरचं स्वप्नाळू आणि फुलपाखराचे पंख लावून आलेलं वय आहे...! पण, अशा पद्धतीने सगळ्यांना जगता येत नाही. दिल्लीची पूजा कश्यप अशांपैकीच एक. तिने १५ व्या वर्षी ‘मॅजिक बस’च्या माध्यमातून वस्त्यांवरील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाचं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. गेल्या ६ वर्षात तिने ७५० मुलांबरोबर काम केलं असून २७ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे.सविस्तर बातमी

वय वर्षे १५ हे कसलं आणि कसं वय आहे..? असा प्रश्न विचारला तर कोणीही सांगेल. वय वर्षे १५ हे ‘सोळाव्या वरीस’च्या उंबरठ्यावरचं थोडं अल्लड, स्वप्नाळू, मित्र-मैत्रीणीत रमणारं आणि फुलपाखराचे पंख लावून आलेलं वय आहे...! पण हेच वय अशाच पद्धतीने सगळ्यांना जगता येतं का? बघा, जरा आपल्या आजूबाजूला एकदा. कदाचित उत्तर ‘नाही’ मिळेल.

दिल्लीची पूजा कश्यप हिचं उत्तरसुद्धा ‘नाही’ आहे. कारण ती या वयात काम करते आणि घरात आर्थिक मदत करते आहे. पूजावर ही वेळ का आली असेल? तुम्हीच वाचा.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अवघ्या १५ व्या वर्षी जाणवणं आणि त्यादृष्टीने काम करत आपल्यासारख्याच मुलींना शिक्षणासाठीही प्रोत्साहन देणं, ही कौतुकास्पद बाब पूजा करते आहे. तिने यामुळे तिच्या वयाच्या मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

पूजा कश्यप झोपडपट्टीमध्ये राहते आणि आपल्या बरोबरीच्या मुलींना ‘मॅजिक बस’च्या मदतीने शिक्षणाचे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देते आहे. याबद्दल पूजा सांगते, कमावण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता, घरातले आम्ही सर्व जण म्हणजे एकूण ७ जण आईवर अवलंबून होतो. आई रोज सकाळी भलस्वा येथून निजमुद्दीनला म्हणजे तब्बल २७ किमी एवढ्या अंतरावर स्वयंपाकाची कामे करायला जायची. एवढे कष्ट करून तिला फक्त ९००० रुपये मिळायचे. त्यातून आमचे ७ जणांचे कुटुंब चालवणं केवळ अशक्यच. शिक्षणावर आईचा विश्वास होता, त्यामुळे माझ्या लहान भावंडांचे शिक्षण पैशासाठी थांबावे असे मला आणि तिलाही वाटत नव्हते.

वडिलांविषयी बोलताना पूजा वेगळ्याच भावविश्वात जाते. उत्तरप्रदेशातून पूजाचे आजोबा दिल्लीत पोटापाण्यासाठी काम बघायला आले आणि तेव्हापासूनच ते निजामुद्दीनच्या झोपडपट्टीत राहू लागले. पूजाला तिचे आजी-आजोबा आठवतच नाहीत. तिचे वडील सहावीत असतानाच तिच्या आजी, आजोबांचे निधन झाले. त्यांचा भाजीविक्रीचा व्यवसायच वडिलांनी पुढे सुरू ठेवला आणि लवकर लग्न करून आपला संसार थाटला.

या झोपडपट्टीच्या जागेवरच पुलाचे काम होणार होते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर निजामुद्दीन सोडण्याची वेळ आली. भलस्वा येथे आम्हाला ७००० रुपये देऊन जागा देण्यात आली. सुरवातीला खूप चांगला वाटलेला हा सौदा किती तोट्याचा आहे हे नंतर लक्षात आलंती सांगते, आमची जागा जाण्याआधी वडिलांनी पापड उद्योग सुरू केला होता. सकाळी पापड करायचे आणि संध्याकाळी इंडिया गेट जवळ विकायचे. हा व्यवसाय तिथेही चालेल असं वाटत होतं; दुर्दैवाने तसं झालं नाही.

भलस्वा येथे कमी किंमतीत मिळणारी स्वतःची जागा एवढच आम्ही पाहीलं. तेथून सगळं किती दूर आहे हे लक्षात नाही आलं. शेजारी कचर्‍याचे ढीग, दलदल आणि लांबवर पसरलेली जागा अशा ठिकाणाहून आम्हाला निघताही येत नव्हतं कारण दुसरीकडे जायला आमचं घर थोडीच होतं?”

पूजा फक्त तिसरीत होती तेव्हा ते भलस्वा येथे राहायला आले. तिच्या वडिलांनी आईच्या मदतीने भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला पण तो चालला नाही. जवळची शिल्लक संपत आलेली. त्याच दरम्यान आईने निजामुद्दीन येथे स्वयंपाकाची कामे सुरू केली आणि शेवटी तिच्या एकटीच्या कमाईतूनच घर चालवणं सुरू झालं.

वडिलांना उद्योगच नसल्यामुळे तंबाखू आणि मटक्याचे व्यसन लागले आणि ती ऐन बारावीत असतानाच वडिलांनी अचानक घर सोडलं. तेव्हा भावाचे नुकतेच १० वीची परीक्षा दिली होती; तेवढ्यावर त्यालाही नोकरी लगेच मिळणं अशक्य.

या वेळेस देवादुताप्रमाणे आलेल्या संतोष भैय्याने पूजाला ‘मॅजिक बस’मध्ये नोकरीची संधी असल्याचं सांगितलं. मॅजिक बसनेही तेव्हा नुकतीच भलस्वामधील मुलांसाठी काम कारण्यास सुरवात केली होती. पूजाच्या मॅजिक बसमधील कामला आज ६ पेक्षा अधिक वर्षे झाली.

शिक्षणामुळे पूजाला हे साध्य करता आलं. याचं सर्व श्रेय ती आपल्या आईला देते. तिच्या आईने कधीही पैशांची अडचण आहे म्हणून मुलांची शाळा बंद नाही केली. आजूबाजूचा परिसर तर विचित्रच होता. व्यसनाधीन मुले, निरक्षरता, अस्वच्छता, खेळायला जागा नाही, शिक्षणाला महत्व नाही, अशा वातावरणात मुले बिघडण्याची भीती आईला होती. तिथे आईवडीलच आपल्या गरजा भागवण्यासाठी मुलांना शाळेतून काढून कामावर पाठवत असत. पूजाच्या आईने असं कधीच केलं नाही. आईचा पाठिंबा आणि शिक्षणाची आवड यामुळे पूजा शिकली.

ती सांगते, सुरूवातीच्या प्रशिक्षणाच्या काळात संतोष भैय्याने खूप मदत केली. मला कधीच वाटत नव्हतं, की मी मुलांना शिकवू शकेल. मात्र, संतोष भैय्याने मदत आणि मार्गदर्शन केलं.

स्वतःच्याच घराजवळील एका वस्तीतील मुलींसाठी काम करण्याचा अनुभव पूजाला खूप काही देऊन गेला. ती म्हणते, “स्वातंत्र्य म्हणजे काय? असं विचारलं तर या झोपडीबाहेर पडून आमचे इतर मित्र-मैत्रिणी जेव्हा आमच्या वैताक्तिक आयुष्याकडे न पाहता आमच्याशी सहज मैत्री करतील, त्याला आम्ही स्वातंत्र्य म्हणू!!” ‘मॅजिक बस’ने त्यांना ते स्वातंत्र्य दिलं असल्याचं पूजा कृतार्थतेने सांगते.

पूजाच्या या प्रगतीमुळे तिच्या घरच्यांची मानसिकता देखील बदलली आहे. आधी पूजाला आणि तिच्या बहिणींना नातेवाईकांशिवाय कोणाशी बोलण्याची मुभा नव्हती. यामागे संरक्षण हा मुद्दा असला तरी पारंपरिक विचारही होते. आता हे विचार बदलत आहेत.

“जेव्हा मी तरुण कार्यकर्ती म्हणून निवडले गेले. तेव्हाच मुले आणि मुली दोन्हीही सदस्य भरपूर असल्याने माझ्या मनातून स्त्री-पुरुष भेद निघून गेला. मला एक वेगळीच ओळख आणि नाव प्राप्त झालं.”, असं पूजा कौतुकाने आणि अभिमानाने सांगते.

मागे वळून पाहताना तिला जाणवतं की आपण कुठून कुठे आलो. याचं स्वतःशीच हसूसुद्धा येतं. घरापासून १० किमी अंतरवरील टीमरपूर येथील वस्तीवर काम करण्याची संधी तिला मिळाली; पण घरात खायला घालू शकू या भावनेने तिने ती संधी स्वीकारली आणि त्या संधीचं सोनं केलं. आतापर्यंत पूजाने ७५० मुलांबरोबर काम केलं असून २७ तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे.

तिने समाजकार्य या विषयात पदवी प्राप्त केली आहे. तसेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदव्योत्तर पदवीसाठी देखील नावनोंदणी केली आहे. स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे साठवण्यासोबतच ती घरातही मदत करते आहे.

अगदी काही महिन्यांपूर्वीच तिचे वडील आजारपण घेऊन घरी परत आले. मात्र, तिचा भाऊ व ती खंबीरपणे आईच्या मागे उभे राहिले आणि त्यांनी मिळून वडिलांचे आजारपण दूर केले.

पूजाचे विचारच आपल्याला खूप काही सांगून जातात. ती म्हणते, की ‘तुमची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्यासारख्याच इतरांना मदत करू शकत नाही, असा होत नाही.’ तिचे हेच बोल अनेकांना मार्गदर्शक ठरत आहेत.

ते अनेकांना असेच प्रोत्साहन आणि प्रेरणा देतील व अनेक पूजा आपले कुटुंब सावरण्यास खंबीरपणे उभ्या राहतील, असा विश्वास पूजाकडे पाहून वाटतो..!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य