Bhartiyans

Menu

हवेच्या वेगावर नियंत्रण मिळवू शकणाऱ्या ‘ॲन्थ्रोपोजेनिक पवनचक्की’ची निर्मिती करणारा जिनियस !

Date : 06 Mar 2017

Total View : 1017

पुण्याच्या एका जिज्ञासू आणि हुशार अवलियाने १५ वर्षे रात्रंदिवस अनेक प्रयोग करून कृत्रिमरित्या हवेच्या वेगावर नियंत्रण मिळवू शकणाऱ्या पवनचक्कीची निर्मिती करण्यात यश मिळवलं..! यामुळे वाऱ्यापासून वीज निर्मिती करता येईल.


सारांश

ऊर्जा निर्मितीच्या अनेकविध पर्यायांपैकी पवन ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा अपारंपारिक स्रोत आहे. मात्र, वाऱ्याचा वेग, हवामानातील असमतोल यामुळे हा प्रयोग आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर करणं शक्य होत नाही, हे वैज्ञानिकांचं शल्य पुण्याचे शास्त्रज्ञ बी.एन.हजारे १५ वर्षे रात्रंदिवस मेहनत करून दूर केलं. त्यांनी कृत्रिमरित्या हवेच्या वेगावर नियंत्रण मिळवू शकणारी ॲन्थ्रोपोजेनिक पवनचक्की तयार केली.सविस्तर बातमी

वाढत्या लोकसंख्येसाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची ऊर्जा निर्माण करणं हे दिवसेंदिवस अधिक कठीण आणि आव्हानात्मक होतं आहे. यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा (सौरऊर्जा, हवा, नैसर्गिक वायू इ.) वापर वाढवायला हवा. कारण, निसर्गाकडून उपलब्ध होणाऱ्या साधनांपासून जे पारंपारिक ऊर्जास्रोत (खनिज तेल, कोळसा, वीज) तयार केले जातात, ते संपण्याची भीती असते. कारण, ते मर्यादित असतात.

या पार्श्वभूमीवर अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर आपण वाढवायला हवा. नागरिकांच्या वैयक्तिक वापरासाठी आणि उद्योगांसाठी इंधन पुरेल अशी परिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे. आजची अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची साधनं उद्याची पारंपरिक साधनं बनणार आहेत. म्हणूनच या क्षेत्रामधील भविष्यवेधी आणि नियमित संशोधन आवश्यक आहे. काळाची गरज ओळखून ही ऊर्जानिर्मिती कशी करता येईल याचा विचार करणं आणि कृती आवश्यक आहे.

ऊर्जा निर्मितीच्या अनेकविध पर्यायांपैकी पवन ऊर्जा हा एक समृद्ध, स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा अपारंपारिक स्रोत आहे. मात्र, याकडे दुर्दैवाने आपल्या देशात फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही. नेदरलँड्समध्ये आज २०% वीज ही पवनचक्कीच्या माध्यमातून तयार केली जाते.

आपल्या देशातही हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाऱ्याचा वेग, हवामानातील असमतोल आणि इतर मर्यादांमुळे हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करणं शक्य होत नाही. वाऱ्याच्या लहरीपणामुळे आणि त्याच्या मानवी नियंत्रणाबाहेरील वेगामुळे ही ऊर्जा वर्षाचे ३६५ दिवस आणि २४ तास एखाद्या औद्योगिक उत्पादनाप्रमाणे हवी तेवढी आणि हवी तिथे निर्माण करता येत नाही, हे वैज्ञानिकांचं दु:ख आहे.

मात्र, पुण्याच्या एका जिज्ञासू आणि हुशार अवलियाने रात्रंदिवस अनेक प्रयोग-चाचण्या करून ते स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं. त्या अवलियाचं नाव आहे ‘बिरुदेव हजारे’.

हजारे यांच्या प्रामाणिक, अविश्रांत आणि शास्त्रीय प्रयत्नांना अखेर यश आलं आणि तब्बल १५ वर्षांच्या ध्यासपर्वातून निर्माण झाली ऊर्जेचा अमर्यादित स्रोत असलेली पवनचक्की..! ही पवनचक्की नक्कीच उद्याचा इंधन तुटवडा भरून काढण्यास मदत करेल.

हजारे यांनी अशी पवनचक्की तयार केली आहे, जी-

१) स्थळ-काळाच्या मर्यादेवर सहज मात करू शकते.

२) आटोपशीर आणि हाताळण्यास सोपी असेल.

३) radical आणि paragmentic अशा दोन्ही प्रवाहांना एकत्र आणु शकते.

४) ग्रामीण भागाला विजेसाठी स्वयंपूर्ण करू शकेल.

५) वीज उपभोक्त्यांची गरज, पैसे आणि गुणवत्ता तीनही कसोटींवर उतरू शकते.

६) वीजनिर्मिती, वितरण आणि वापर या सगळ्याच मुद्द्यांमध्ये क्रांतिकारी बदलांची नवी पहाट आणू शकेल.   

नक्की कशी आहे ही पवनचक्क्की..?

ढोबळमानाने पाहता वाऱ्यातील शक्तीचे अर्थात ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करून त्यापासून वीजनिर्मिती करणे, अशी पवनचक्कीची कार्यपद्धती आहे. मात्र, अखंडित वीजनिर्मिती होण्यासाठी वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वाऱ्याचा वेग जितका जास्त तितकी जास्त ऊर्जा आणि परिणामी मिळणारी वीजही तितकीच जास्त. मात्र, हे सर्व सतत अखंड ठेवणे प्रचंड अवघड काम आहे.

हवेचा वेग नियंत्रित करणं, त्यात सातत्य राखणं आणि गरजेनुसार तो कमी-जास्त करणं शक्य आहे का? ही अवघड आणि अशक्य कोटीतील गोष्ट हजारे यांनी तयार केलेली पवनचक्की करू शकते, हेच तिचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे..! विशिष्ट यांत्रिक उपकरणांची ठराविक पद्धतीने रचना केल्यानंतर कृत्रिमरित्या हवेचा वेग वाढवणं आणि तो नियंत्रित करण शक्य आहे, हे या पवनचक्कीने सिद्ध केलं आहे.

या संशोधनाद्वारे Potential Energy (स्थितीज ऊर्जा) चे Kinetic Energy (गतीज ऊर्जा) मध्ये रुपांतर करण्यासाठी जितकी ऊर्जा खर्च होते. त्यापेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त करण्यात यश आलं आहे. प्रश्नांची योग्य उत्तरे शोधण्याबरोबरच योग्य प्रश्न विचारण्याचे धाडस देखील ‘Anthropogenic windmill’ चे जनक पुणे बी.एन.हजारे यांनी दाखवलं आणि पवन ऊर्जा निर्मितीचा एक नवीन आयाम त्यांनी जगासमोर आणला. या ॲन्थ्रोपोजेनिक पवनचक्कीचं पेटंट देखील त्यांना मिळालं आहे.

शालेय जीवनापासून असलेली विज्ञान विषयाची आवड, कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचं शास्त्रीय उत्तर मिळवण्याची वृत्ती, आत्मविश्वास, चिकाटी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांकडून घेतलेली प्रेरणा यातून हजारे यांनी ही अभूतपूर्व गोष्ट साध्य केली.

ही संकल्पना जरा मोठ्या प्रमाणावर राबवली गेली, तर आजही जे ‘अंधारात’ आहेत, अशा ग्रामीण भागातील अनेक लोकांच्या जीवनात आपण प्रकाश पेरू शकतो..!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य