Bhartiyans

Menu

महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्कूलबस चालक ते ‘पाळंदे टेक्नोसोल्यूशन्स’च्या संचालिका, मनाली यांचा प्रवास आहे कल्पकता व मेहनतीचा प्रेरणादायी संगम !

Date : 08 Mar 2017

Total View : 1411

मूळच्या इंजीनीअर असलेल्या पुण्याच्या मनाली पाळंदे यांचा महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्कूलबस चालक ते ‘पाळंदे टेक्नोसोल्यूशन्स’ चालवणाऱ्या यशस्वी महिला उद्योजिका हा प्रवास प्रेरणादायी आहे.


सारांश

आज महिला रिक्षापासून अगदी बुलेट ट्रेन आणि विमानही चालवत असल्या तरी हे क्षेत्र पुरूषांची मक्तेदारीच आहे, असा समज आहे. अशा वातावरणात २००३ मध्ये पुण्याच्या मनाली पाळंदे यांनी स्कूलबस चालक होण्याचा निर्णय घेतला आणि त्या झाल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्कूलबस चालक. मनाली यांचा हा व्यवसाय पुढे ‘पाळंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ व ‘पाळंदे टेक्नोसोल्यूशन्स’पर्यंत वाढला आणि त्या ठरल्या यशस्वी उदयोजिका..!सविस्तर बातमी

महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्कूलबस चालक ते पाळंदे टेक्नोसोल्यूशन्सच्या संचालिका,

मनाली यांचा प्रवास आहे कल्पकता व मेहनतीचा प्रेरणादायी संगम !                               

आज जागतिक महिला दिन. जन्म देणारी आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, पुढे स्वत: झालेली मुलगी अशा अनेक रूपातून ‘स्त्री’ आपल्याला भेटते. प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आणि मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्त्री-शक्तीला, सर्व महिला वर्गाला ‘भारतीयन्स’कडून महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा..!

आज पाहूया धोपटमार्ग सोडून स्वत: ची ‘वहिवाट’ ‘बिकट वाट’ वाटत असली तरी तिलाच यशाचा राजमार्ग करणाऱ्या मनाली पाळंदे यांचा प्रवास..! 

मूळच्या इंजीनीअर असलेल्या पुण्याच्या मनाली पाळंदे जेव्हा लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी परंपरांची, पुरूषप्रधान संस्कृतीची, समाजाची चौकट मोडून वेगळा निर्णय घेतात आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्कूलबस चालक होतात, तेव्हा आपल्या तोंडून नकळत, उत्स्फूर्त शब्द निघतात, ‘ती आली... तिने पाहीलं आणि ती जिंकली....!’     

ड्रायव्हर म्हटलं, की आजही आपल्या डोळ्यासमोर पुरुष ड्रायव्हरच येतो. आज महिला रिक्षापासून अगदी बुलेट ट्रेन आणि विमानही चालवत असल्या तरी त्यांची संख्या कमी असून ड्रायव्हिंग हे क्षेत्र पुरूषांची मक्तेदारी असलेलेच आहे, असा समाजाने करून घेतलेला समज आहे. अशा वातावरणात २००३ मध्ये मनालीनं हा निर्णय घेतला.

गोष्ट झाली अशी की, मनाली तिच्या मुलांना शाळेत सोडायला स्वतःची गाडी घेऊन जायची. तेव्हा अचानक एक दिवस ‘अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच शाळेच्या व्हॅन चालकाने बलात्कार केला.’ अशी कानात शिसं ओतणारी बातमी आली...! या बातमीचा धक्का सर्व पालकांना बसला आणि  मनालीच्या मुलाच्या वर्गातील इतर काही मुलींच्या आयांनी मनालीला त्यांच्याही मुलींना शाळेत सोडण्याची विनंती केली. मुलींच्या सुरक्षिततेसाठी मनालीनं ते काम स्वीकारलं.

तिचं असं मुलांना ने-आण करणं एका रिक्षावाल्यानं पाहिलं. त्याला वाटलं हा तिचा व्यवसाय आहे. म्हणून त्यानं तिला सांगितलं, की जवळच एका नवीनच झालेल्या शाळेलासुद्धा स्कूलबस चालकाची गरज आहे. त्यांच्या सांगण्यामुळे मनालीच्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं. तिने घरच्यांशी विचारविनिमय केला. स्वत: इंजिनियर असूनही ड्रायव्हर म्हणून काम केलं तर लोक काय म्हणतील यावरही विचार झाला; पण जिद्दी मनालीने या सर्वाला तोंड देऊन हा व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

मनालीने त्या नवीन शाळेच्या मुख्याध्यापक व पालकांची भेट घेतली आणि आपल्या नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आता प्रश्न होता, बससाठी लागणारे ८ लाख रुपये कुठून उभे करायचे? या व्यवसायातला कुठलाच अनुभव नसल्याने आणि अशी कमर्शियल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या आधी कधीच न हाताळल्याने कोणतीही बँक तिला कर्ज देत नव्हती. शेवटी, तिच्या बहिणीने व वडिलांनी मदत केली आणि एका खासगी बँकेने थोडं कर्ज दिलं. पुन्हा नवीन प्रश्न तयार झाला, की बस आली तरी ती चालवायला भाडोत्री ड्रायव्हर कुठून ठेवणार? ड्रायव्हरला पगार देण्याइतपत मनालीजवळ पैसे नव्हते. जिद्दी मनालीने यातूनही मार्ग काढला. त्यांच्याकडे कार चालवण्याचा परवाना होताच. मग त्यांनी ट्रक चालवण्याचंही प्रशिक्षण घेतलं आणि परवानाही मिळवला आणि मनाली झाल्या राज्यातील पहिल्या महिला स्कूलबस चालक...!

मनाली यांनी पाळंदे अँड सन्स कंपनी सुरु केली. अर्थातच अजूनही अडचणी संपल्या नव्हत्याच. पहिल्या महिनाअखेरीस मनालीच्या हातात फक्त २५०० रु पडले. ती खूपच निराश झाली. एवढे कष्ट घेऊनही त्याचे चीज न झाल्याने तिला जवळच्या मंडळींनी मारलेले टोमणे आठवू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं आपल्या मुलाची शाळा गाठली आणि तिथल्या पालकांना विश्वासात घेऊन सर्व माहिती दिली. विशेष म्हणजे काही पालकांनी लगेचच आपल्या घराचे पत्ते तिला दिले आणि त्यांच्या मुलांना ने-आण करण्याची जबाबदारी सोपवली.

मनाली यांचा पहिला महिना खरोखर कसोटीचा होता. बसच्या कर्जाच्या हप्त्यासाठी नवऱ्याचा बहुतांशी पगार वापरावा लागला. पुढील काळात तिच्या स्कूलबसला मिळणारा प्रतिसाद वाढतच गेला. मग तिच्यामागे कायमच खंबीरपणे उभे राहणाऱ्या तिच्या सासूबाईनी बसमध्ये मुलांना काय हवं-नको बघण्याची जबाबदारी उचलली. स्वतः आई असणाऱ्या मनालीने बसमधून येता-जाताना मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून टेपरेकोर्डरवर श्लोक, स्तोत्र, शाळेतील गाणी, कविता, पाढे हे सर्व लावण्यास सुरवात केली. पालकांनी त्यांचं कौतुक केलं. मनाली लोकप्रिय होऊ लागली.

शेवटी, जे सगळीकडे होतं तेच मनालीच्या बाबतीत देखील झालं. तिची वाढती लोकप्रियता इतर व्हॅन आणि रिक्षाचालकांना सलायला लागली. त्यांच्याकडून तिला धमक्या येऊ लागल्या. तिचे पती आणि पोलिसांनी या प्रकरणाला आळा घातला.

२००५ साली मनालीनं आणखी २ बस घेतल्या. त्या बससाठी तिनं ड्रायव्हर आणि मदतनीस ठेवले. शाळांना सुट्ट्या असताना ती स्वतः बस घेऊन महाराष्ट्रभर कुठेही जात असे. तिनं आपल्या बसेस भाडेतत्वावर देण्यास सुरुवात केली. ‘पाळंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ चं काम जोरात सुरू झालं. तिनं व्यवसायाचा विस्तार वाढवला. लवकरच मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकारी वर्गाला भेटून त्यांच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बस द्यायला सुरुवात केली. किर्लोस्कर, आय.टी.सी., जॉन डियर, मिल्टन प्लास्टिक, इंटरवेट इंडिया यासारख्या अनेक कंपन्यांकडून तिला प्रतिसाद मिळाला.

अर्थात, तिथेही तिला इतर कंत्राटदारांकडून त्रास सहन करावा लागला. मोठ्या कंपन्यांमध्ये एकाच दिवसात ३ पाळ्यांमध्ये काम करावं लागतं. यातच एखादा ड्रायव्हर दारू पिऊन कामावर आल्याची तक्रार येत असे किंवा तो न सांगता दांडी मारत असे. अशा वेळी मनालीला स्वतःलाच बस घेऊन जावं लागे. मग ती दिवसपाळी असो की रात्रपाळी.

दरम्यान, राजेशला म्हणजे मनालीच्या नवऱ्याला नोकरीनिमित्त परदेशी जावं लागलं. एकीकडे घर, मुलं आणि दुसरीकडे व्यवसाय सांभाळताना तिची खूपच धावपळ होत होती ; पण या सगळ्या अडचणींवर ती मात करत गेली. इंजिनियर असल्याने आपल्या बसेस कोणत्या वेळी कुठे असतात हे कळण्यासाठी बसमध्ये GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम तिनं बसवली. त्याचा खूप फायदा झाला. आता ड्रायव्हर्सने खोटी कारणे सांगणे बंद झालं.

यातूनच पुढे २०१० साली मनालीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्यांनी असं सॉफ्टवेअर तयार करायचं ठरवलं ज्याद्वारे गाडीमध्ये डीझेल कधी भरायचं, गाडीच्या विम्याचे, कर्जाच्या हप्त्याचे पैसे कधी भरायचे, गाडीचा वेग प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्याचा इशारा कसा मिळेल अशा अनेक गोष्टी सोप्या होतील. लगोलग तिनं ‘पाळंदे टेक्नोसोल्यूशन्स’ नावाने कंपनी काढली आणि बसेससाठी अशी सर्व माहिती देणारं सॉफ्टवेअर तयार केलं.च पाच वर्ष स्वतःच्या गाड्यांवर चाचणी करून झाल्यावर तिने इतर ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्या कंपन्यासाठी त्याचं मार्केटिंग सुरु केलं.

लवकरच या सॉफ्टवेअरला चांगला प्रतिसाद मिळाला. बँकेच्या कॅश नेणाऱ्या गाडीत देखील त्याचा उपयोग केला गेला. २०१५ साली मनालीने तिचा बसचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला आणि पूर्णवेळ ‘पाळंदे टेक्नोसोल्यूशन्स’ मध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. तिनं बनवलेली आणखी एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे Radio Frequency Identification (RFID). यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्याचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावरून फिरवलं, की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ते खूप महत्वाचं ठरलं.

महाराष्ट्रातील पहिली महिला स्कूलबस चालक ते एक कल्पक आणि यशस्वी उद्योजिका या तिच्या प्रेरणादायी प्रवासामुळे मनालीला अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स एक्सलंस अवार्ड, चित्पावन उद्योगश्री पुरस्कार असे अनेक सन्मान तिला प्राप्त झाले आहेत. तिच्या कर्तुत्वाची दखल विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी मुलाखती, बातम्यांमधून घेतली आहे. आपल्या सर्व यशाचं श्रेय ती तिच्यामागे भक्कमपणे उभे असलेले तिचे पती, मुले आणि कुटुंबियांना देते. इतके सगळे व्याप सांभाळत असतानाही मनालीने तिच्यातील कलाकार जपलाय. आपला गायन, वादनाचा छंद ती वेळ काढून जोपासते.

काळाची गरज ओळखून त्याप्रमाणे पावले टाकल्यामुळे आज मनाली एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाते. मुरलेल्या वाटेवरून न जाता स्वतःची वेगळी वाट तयार करणाऱ्या या कर्तबगार उद्योजक महिलेला तिच्या पुढील वाटचालीसाठी ‘टीम भारतीयन्स’कडून खूप शुभेच्छा..!

आज महिलादिनी मनाली यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्व महिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, हीच सदिच्छा..!

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य