Bhartiyans

Menu

आपण बिनधास्त प्लास्टिकची पिशवी रस्त्यांवर फेकतो, ‘ते’ तीच पिशवी प्लास्टिकमुक्त समुद्रासाठी शाळेत जमा करतात !

Date : 09 Mar 2017

Total View : 1032

आपण फेकेलेली प्लास्टिकची पिशवी जवळच्या गटारीत जाते. नकळत चक्र सुरू होतं आणि पुढे हा सगळा कचरा समुद्रात जातो...! याचा परिणाम- सागरी जीवांचा मृत्यू! हे चक्र थांबवणारे ‘सागर–मित्र अभियान’!


सारांश

आपण फेकेलेली प्लास्टिकची पिशवी जवळच्या गटारीत जाते व शेवटी समुद्राला जाऊन मिळते. परिणाम- सागरी जीवांचा मृत्यू! हे चक्र थांबवणारे ‘सागर–मित्र अभियान’! शालेय विद्यार्थी त्यांच्या घरातील प्लास्टिकचा सुका कचरा शाळेत जमा करतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी हा कचरा अभियानाच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द केला जातो. जमा कचरा CGMPL या कंपनीकडे पोहचविला जातो. काही गोष्टी पुनर्वापराला जातात. उर्वरित कचऱ्याचे रासायनिक विघटन होते.सविस्तर बातमी

आपल्या घरातल्या प्लास्टिक पिशव्यांच आपण काय करतो मित्रांनो ?

आपल्या सभोवताली वाढणारे विविध स्वरूपातील प्लास्टिकचे प्रमाण आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी आपल्याला माहिती आहे. आपण रस्त्यावर किंवा अगदी सहज कुठेही प्लास्टिकची पिशवी, कप फेकतो, तो जवळची गटार किंवा पाणीसाठ्यात जातो. हे चक्र सुरू राहतं आणि पुढे हा सगळा कचरा समुद्रात जातो...!

याचा परिणाम सागरी जीवांवर होतो. प्लास्टीकचे इतर दुष्परिणामसुद्धा आपण भोगतोय. तरीसुद्धा प्लास्टिकचा वापर आपण कमी केला आहे का? आपण कमी केला असेल, इतरांमध्ये तशी जागृती होण्यासाठी आपण काही करतो आहोत का? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर ‘हो’ येत असेल तर अभिनंदन..! पण उत्तर नाही असेल तर.....?

तर...सागर-मित्र अभियानाविषयी जाणून घ्या. कदाचित जे तुम्हाला करायचं आहे, तेच येथे होत असेल!

सागर-मित्र अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थी घरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून विघटनासाठी देतात आणि पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यामध्ये हातभार लावतात. पुण्यातील १०० हून अधिक शाळांमधील १ लाखाहून अधिक विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. आता तर हे अभियान जणू त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग झाले आहे.

हे विद्यार्थी दररोज घरातून टाकाऊ कोरडा प्लास्टिक कचरा (जसे कि प्लास्टिक पाकिटे, पिशव्या, बाटल्या, डब्यांची झाकणे, बुच, रिकामी रिफिल, तुटके कंगवे, इ.) शाळेत खास ‘सागर-मित्र’साठी ठेवलेल्या मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये आणून जमा करतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी हा कचरा एकत्र करून शाळेचे शिक्षक आणि या अभियानाच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्त केला जातो, अशा प्रकारे घरातील टाकाऊ प्लास्टिक कचरा येथे जमा करणारा प्रत्येक विद्यार्थी ‘सागर–मित्र’ होतो.

या अभिनव उपक्रमाचे जनक आहेत विवेक बोधनकर. जे ‘द एकॅडमिक ॲडवायझर’ (TAA) या एनजीओ चे संस्थापक आहेत. त्यांनी सुसानराज आणि ललित राठी या सह्संस्थापकांसोबत शालेय विद्यार्थ्यांना घेऊन एक ‘स्वच्छता मोहीम’ राबविली होती. या स्वच्छता अभियानात त्यांना काही ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा आढळून आला. यामुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका होता. त्यांनी मुलांना तो कचरा उचलू दिला नाही. मुलांना घरी पाठवले आणि स्वत:च्या मनाशी ठरवले, की मुलांना सुरक्षितपणे प्लास्टिक कचरा गोळा करायला शिकविले पाहिजे जेणेकरून त्यांच्या घरातील प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरण संरक्षणात त्यांचा हातभार लागेल.

बोधनकरांची ही कल्पना २०११ मध्ये प्रत्यक्षात साकार झाली. TAA च्या ‘सागर –मित्र’ अभियानाला सुरुवात झाली. “२०११ मध्ये पुण्याच्या एका शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या १५० विद्यार्थ्यांसोबत आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली. हळूहळू अनेक शाळा यात समाविष्ट होत गेल्या. पुण्यातील सर्व ७८० शाळा म्हणजेच १२ लाख विद्यार्थी यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. असे झाल्यावर नक्कीच शहरात आणि नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये खूप फरक पडेल.”

विवेक बोधनकर रोज त्यांचा लॅपटॉप घेऊन विविध शाळांमध्ये जातात. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ‘सागर- मित्र’ अभियानाची सविस्तर माहिती देतात. प्रेझेन्टेशन दाखवून मुलांना या अभियानात सहभागी करून घेणे ही पहिली पायरी असते. मुले स्लाईड शो पाहतात. यामध्ये अत्यंत सोप्या भाषेत बोधनकर किंवा त्यांचे सहकारी मुलांना समजावून सांगतात.

सागरी प्राणी किंवा पक्षी प्लास्टिकमुळे मरण पावतात, हे पाहून मुलांना कळतं, की प्लास्टिक कचऱ्यामुळे नद्या, समुद्र किंवा इतर पाणीसाठे किती मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. “आपल्या घरातील फिश टँकमध्ये आपण प्लास्टिकचे तुकडे किंवा कचरा टाकतो का?” या प्रश्नावर मुलांचे मोठ्या आवाजात ‘नाही’ असे उत्तर येते. ‘मग आपल्या घरातील माशांप्रमाणेच समुद्रातील जीव आहेत. त्यांची काळजी आपण घायला हवी. त्यांना आपण वाचवायला नको का?” त्यावर मुले सामूहिक स्वरात ‘हो’ असे म्हणतात...!

बोधनकरांच्या सुमारे एक तासाच्या प्रेझेन्टेशनमधून मुलांना खालील मुद्दे स्पष्ट होतात :

  1. आपण जे प्लास्टिक रस्त्यावर फेकतो ते आपण समुद्रात फेकल्यासारखेच आहे. कारण, जमिनीवरून एखाद्या पाणवठ्यात आणि तिथून समुद्राकडे असा त्याचा प्रवास असतो.
  2. समुद्रात गेलेल्या कचऱ्याचे लाटांचा मारा आणि सूर्याची उष्णता यामुळे बारीक तुकड्यांमध्ये, कणामध्ये रुपांतर होते. हे कण पाण्यात आणि शेवाळ्यात पसरतात.
  3. अशा प्रकारचे शेवाळे खाल्ल्याने मासे मरण पावतात. परिणामी, मासे हे अन्न असलेले सागरीपक्षी देखील मरतात.
  4. केवळ आपल्या बेजबाबदारपणामुळे व कचरा फेकण्याने आपणच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या समुद्री जीवव्यवस्थेला धोका निर्माण करत आहोत. 

मुले अशा रितीने प्रथमच आपल्या दैनंदिन जीवनाचा समुद्री जीवांवर होणारा भयानक परिणाम पाहत असतात. त्यांना आपण टाकलेल्या कचऱ्याचे ढीग जगाच्या सर्व समुद्रांमध्ये तरंगताना दाखविले जातात. नद्या तुंबल्यामुळे २५% मासे त्यांच्या पोटात प्लास्टिक अडकून मरण पावतात, हे मुलांच्या मनावर कोरलं जातं.

ताज्या माहितीनुसार, २०३० मध्ये समुद्रातील प्रत्येकी ३ टन मासळी मागे १ टन प्लास्टिक कचरा जमा झालेला असेल. या सर्वातून प्लास्टिक कचरा पर्यावरणाला असलेला सर्वात मोठा धोका आहे, हे मुलांना पटतं..!

विवेक सांगतात, “आम्ही २०११ मध्ये सुरुवात केल्यानंतर, मुले आणि त्यांचे पालक मिळून कशाप्रकारे यातील अडथळे दूर करू शकतात याचा विचार केला. आम्ही एक सोपी पद्धत तयार केली. शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या तर मुले होतील. म्हणून आम्ही शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले, की आपापल्या घरातील विघटनयोग्य सुका प्लास्टिक कचरा गोळा करा. दररोज किमान १ वस्तू तरी घरात प्लास्टिक कचरा म्हणून फेकली जाते. अशा महिन्याच्या ३० वस्तू मुलांनी सागर-मित्रने ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये जमा करायच्या. जी मुले असा कचरा आणू शकत नाहीत, त्यांना काहीही दंड नाही.

विशेष म्हणजे, आतापर्यंत मुलांनी १५० टनहून अधिक सुका प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. यामुळे १५० टन एकत्रित पणे जमा होणार्या कचऱ्यातील १ टन प्लास्टिक वेगळे केले गेले. मुलांच्या या योगदानामुळे खूप मोठी पर्यावरण हानी टळली. प्लास्टिकच्या ५ किलो कचऱ्याने १ वर्ग कमी. समुद्र किंवा शेती प्रदूषित होते, हे लक्षात घेतल्यास मुलांचे आजवरचे योगदान खूप मोठे आहे. 

मुले प्लास्टिक कचरा शाळेत जमा करतात. शिक्षक आणि स्वयंसेवक त्यांना यात मदत करतात. सागर- मित्रची गाडी, वाहक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यासोबत शाळेत ठरलेल्या दिवशी जाऊन हा कचरा गोळा करते. वजन करून हा कचरा व्यवस्थित बांधला जातो आणि ८ रुपये प्रतिकिलो प्रमाणे शाळेला पैसे दिले जातात. नंतर हा जमा केलेला कचरा क्लीन गार्बेज मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि.(CGMPL) या कंपनीकडे पोहचविला जातो. ही कंपनीच हा कचरा विकत घेते.

या कचऱ्याचे ६० प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्यापैकी काही गोष्टी तत्काळ पुनर्वापराला जातात. उदा. काही कंपन्या त्यांच्या बाटल्या पुनर्वापरासाठी घेतात. निळ्या रंगाच्या विशिष्ट खोबरेल तेलाच्या बाटल्यांपासून निळ्या रंगाच्या प्लास्टिक बादल्या किंवा कुंड्या बनवल्या जातात. तरीही, विघटन होऊ शकत नाही असा ३० ते ४० % कचरा उरतो. मग, हा कचरा रासायनिक विघटन प्रक्रियेसाठी पाठवला जातो. यामध्ये प्रचंड उष्णता देऊन हा कचरा वितळवला जातो आणि त्याचे विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेमध्ये रुपांतर केले जाते.

सागर मित्रचे सहसंस्थापक, ललित राठी हे CGMPL चे मुख्य असून, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य प्रकारे विघटन आणि पुनर्वापर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याबाबत ते संशोधनही करत आहेत. या कामामध्ये सागर मित्रचे अजून एक सहकारी, शास्त्रज्ञ निलेश इनामदार यांच्या प्रयत्नामुळे पायरोलायसीस प्रक्रियेतून फर्नेस तेल आणि कोळसा यांची निर्मिती केली जाते. त्यांचेही या संपूर्ण प्रक्रियेतील योगदान कौतुकास्पद आहे.

सवयींमध्ये झालेले बदल :

सागर मित्रमुळे मुलांना प्लास्टिक कचरा गोळा करण्याची सवय लागली आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील याबाबत जागरूक झाले. पुण्याच्या कोथरूडमधील परांजपे स्कूल ही पहिली शाळा होती जी या अभियानामध्ये सहभागी झाली. या शाळेच्या मुख्याध्यापिका, फिलोमिना गायकवाड म्हणतात, “सुरुवातीला विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना ही गोष्ट अंगवळणी पडायला थोडा वेळ लागला. पण, आता सर्व विद्यार्थी, घरातील आणि शाळेच्या आवारातील प्लास्टिक कचरा नियमितपणे गोळा करतात. शाळेचे माजी विद्यार्थी देखील त्यांच्या घरातील प्लास्टिक टाकाऊ कचरा आणून शाळेतील सागर-मित्र पिशवीमध्ये जमा करतात.”

केवळ पुण्यातच नाही तर या अभियानाचा प्रभाव परदेशातील शाळांवर देखील पडला आहे. न्यूयॉर्कर लीन रोझेन यांनी ब्रुकलीनच्या दोन शाळांना या अभियानामध्ये सहभागी करून घेतले आहे. रोझेन म्हणतात, “मी एका शाळेला याबाबत आवाहन केले. त्या शाळेतील २ वर्गांपासून याची सुरुवात झाली. पालकांनी या उपक्रमाला संमती दिल्यावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांना कुठेही रस्त्यावर हा कचरा गोळा करायचा नसून, आपल्याच घरातील टाकाऊ वस्तू गोळा करायच्या आहेत. आम्ही नोव्हेंबर महिन्यात सुरुवात करून पुढच्या मे महिन्यात या उपक्रमाची सांगता केली. मुलांना आपण कचरा टाकून पर्यावरणाची हानी करत नाही, याचा अभिमान आहे. मुलांना जर मोठ्या माणसांसारखे समजावून सांगितले, सहभागी करून घेतले, तर अतिशय उत्तम परिणाम साधता येतो. याची जाणीव मला या उपक्रमामुळे झाली.” सागर-मित्र अभियान आता मोरक्कोमधील शाळांमध्येही पोहोचले आहे.

महाराष्ट्राच्या जळगावमधील २१ शाळा, राजस्थानमधील ५ शाळा या अभियानामध्ये सहभागी झाल्या आहेत. अभियानात स्वयंसेवकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. बोधनकर त्यांच्या अशाच एका स्वयंसेवकाबाबत सांगतात. “विशाल सोनपूर हा स्वयंसेवक ‘दिव्यांग’ आहे. मात्र, तरीही तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि पूर्ण इच्छाशक्तीने हे काम करतो. त्याच्यामुळेच या अभियानाला जळगावमध्ये एवढे यश मिळाले आहे. आम्हाला असे कार्यकर्ते हवेत, जे अत्यंत सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने आमचा उपक्रम समजावून सांगू शकतील, समाजात मिसळू शकतील.”

विवेक बोधनकर म्हणतात, “मुलांना आम्ही असे बिलकुल सांगत नाही की तुम्ही जग बदलू शकता. पण आम्ही मुंग्यांचे उदाहरण देतो ज्या एकत्रितपणे काम करून एक मोठे धान्याचे कोठारसुद्धा रिकामे करू शकतात. मुलांनी आपला मुंगीचा वाटा उचलायचा आहे. त्यामुळे खूप फरक पडू शकतो.”

सागर-मित्र अभियानाची दखल सरकारने घेतली नाही तरच नवल! TAA या संस्थेला पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आमंत्रण दिले. त्यांच्या भेटीमुळे व प्रोत्साहनामुळे शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक अशा १२०० लोकांना एकत्रितपणे सागर-मित्र अभियानाची माहिती देण्यात आली. आता सागर-मित्र पुण्यातील रहिवासी संकुलामधील नागरिकांनाही या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.

शेवटी बोधनकर म्हणतात तेच खरं की, “सागर–मित्र असलेले प्रत्येक लहान मूल घरातील किंवा आसपासच्या किमान ३ लोकांना प्रेरित करत असते. आमच्या उद्दिष्टानुसार जर १२ लाख मुले यात सहभागी झाली तर पुण्यातील कचरा व्यवस्थापनावर खूप मोठा प्रभाव जाणवेल. इतकेच नाही तर लोक ज्या पद्धतीने प्लास्टिक चा वापर करतात. त्यात देखील बदल होईल. आमच्यासाठी तीच मोठी उत्साहवर्धक बाब आहे. ‘विन अ सिटी–विन द वर्ल्ड’.”

सागर-मित्र बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या http://sagarmitra.org/ या संकेतस्थळाला नक्की भेट द्या !


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य