Bhartiyans

Menu

भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या काश्मिरी खेळाडूंना घडवणारा ‘किंगमेकर’ ‘मास्टर अली’..!

Date : 10 Mar 2017

Total View : 390

भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे तजमुल इस्लाम आणि हशीम मन्सूर यांना घडवणारा पडद्यामागचा जादूगार २६ वर्षांचा अली फासील हा काश्मीरमधील ११ वर्षांपासून मुलांना खेळाचे विनामूल्य प्रशिक्षण देतो आहे.


सारांश

वर्ल्ड किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि एशियन कराटे स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे तजमुल इस्लाम आणि हशीम मन्सूर यांना घडवणारा पडद्यामागचा जादूगार होता २६ वर्षांचा बंदीपोऱ्यात मुलांना खेळाचे विनामूल्य प्रशिक्षण देणारा अली फासील ! अली ११ वर्षांपासून मुलांना प्रशिक्षण देतो आहे. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्याच्या काही हुशार विद्यार्थ्यांनी काश्मीरच्या ८ जिल्ह्यांमध्ये १८ खेळ आणि ४००० विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत.सविस्तर बातमी

काश्मीर... अद्वितीय आणि अप्रतिम निसर्गसौंदर्‍याने नटलेले पृथ्वीवरील नंदनवन..! इथला निसर्ग, हिमालय, बर्फाचे डोंगर, घनदाट जंगले, झेलम-चिनाब-रावी-सतलज या नद्यांचे खळाळत वाहणारे निळेशार पाणी, सफरचंदाच्या बागा हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहायचं..!

 

या सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रात दुर्दैवाने आता दहशतवादाचा, अस्थिरतेचा, अशांततेचा आणि एकूणच काश्मीरची प्रतिमा मलीन होण्याचा रंग भरला जातो आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेच शिवाय नागरिकांसमोरची आव्हाने देखील प्रचंड वाढली आहेत. सगळ्यांत मोठा प्रश्न आहे तो, तरुणांच्या करिअरचा आणि रोजगाराचा. अर्थात, येथील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये अजिबात कमतरता नाही, ते कोणत्याही क्षेत्रात सरस कामगिरी करू शकतात, हे काश्मीरने वेळोवेळी जगाला दाखवून दिले आहे.

 

वर्ल्ड किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 7 वर्षांच्या तजमुल इस्लामने आणि एशियन कराटे स्पर्धेत ६ वर्षांच्या हशीम मन्सूरने सुवर्णपदक मिळवून जगाचे लक्ष काश्मीरकडे वेधून घेतले; पण तजमुल आणि हशीम यांना घडवणारा पडद्यामागचा कलाकार कोण होता? हशीम, तजमुल या ‘किंग्ज’ला घडवणारा ‘किंग मेकर’ कोण होता...? तो होता अली फासील...!

 

काश्मीरमधील मुलांनी विविध खेळात प्राविण्य मिळवावं यासाठी अली झटतो आहे. २६ वर्षांचा अली बंदीपोरामध्ये मुलांना खेळाचं प्रशिक्षण देणारा ‘मास्टर अली’ म्हणून प्रसिद्ध आहे. तजमुल, हशीम यांसारख्या गुणी आणि हुशार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चे नाव करावे यासाठी तो अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांना प्रशिक्षण देतो आहे.

 

अली सांगतो, “श्रीनगरपासून ७० किमी लांब अंतरावर मार्शल आर्टचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यामध्ये माझं वैयक्तिक कारण तर होतंच शिवाय खूप धडपड होती.” अली ७ वर्षांचा असताना त्याने ब्रूस लीच्या एका मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्राची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली. उत्तर प्रदेशमध्ये ते केंद्र होतं पण अनामिक भीतीने, बुजरेपणामुळे तो तिथे जाऊ शकला नाही.

 

तो म्हणतो, “माझ्या गावात रस्तेसुद्धा नव्हते. एका टेलीफोन बूथमधून फोन करून मी त्यांना माहिती विचारली; पण जाण्याचं धाडस झालं नाही. एका वर्षांनंतर, साधारण २००५ ला कुस्ती आणि इतर खेळाच्या प्रशिक्षण केंद्राबद्दल माहिती कळली. ते श्रीनगरला होतं.

 

अली तिथे गेला आणि तिथेच तो आयुष्यातली पहिली कुस्ती खेळला. केवळ खेळलाच नाही तर त्याने सुवर्णपदक देखील पटकावलं. अलीला खूप कमी सोयीसुविधा मिळाल्या. त्या काळात संपूर्ण काश्मीर खोर्‍यात तो एकमेव मार्शल आर्ट खेळणारा खेळाडू होता, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

आपल्यासारखे हाल येणाऱ्या पिढीचे होऊ नये या भावनेतून अलीने बंदीपोरा येथे मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र सुरू केले. एका स्टेडीअममध्ये भरणाऱ्या हे केंद्र अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त होते असे नाही. कारण अलीची ती सुरुवात होती. मात्र, ज्या मुलांना शिकण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यांना अलीचा अनुभव आणि त्याचं मार्गदर्शन मिळणार होतं. ते देखील एक पैसाही न देता विनामूल्य...! काही हितचिंतक, खेळात रस असलेली मंडळी आणि मित्र यांच्या मदतीने अली हे केंद्र चालावातो.

 

२०११ ला अली इराणमधून पदक जिंकून जेव्हा काश्मीरमध्ये परत आला, तेव्हा त्याच्या स्वागतालासुद्धा कोणीही हजर नव्हतं. एवढी नकारात्मकता का? याविषयी अली सांगतो, “माझ्या मुलांनी केवळ इंजीनियर किंवा डॉक्टर व्हावं अशी इच्छा पालक व्यक्त करतात, तेव्हा खूप वाईट वाटतं. एखादा मुलगा खेळाकडे वळतो तेव्हा त्याला आजही अगदी कमी प्रतिसाद मिळतो.” तो अनेक पालकांना हीच बाब समजावून सांगत असतो.

 

अलीला संस्था सुरू करून ११ वर्षे झाली. हळूहळू मुलांची संख्या वाढते आहे. शाळेच्या आधी आणि शाळेनंतर मुले प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. संस्थेतून तयार होऊन बाहेर पडलेली मुले त्यांच्या स्वतःच्या भागात संस्था सुरू करत आहेत आणि इतर मुलांना प्रशिक्षण देत आहेत. काश्मीर मधील ८ जिल्ह्यांमध्ये असे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. जवळपास १८ खेळांसाठी साधारण ४००० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुलींना सक्षम करण्यासाठी कुस्ती किंवा मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी देखील अली प्रयत्न करतो आहे.

 

एकूणच काय, काश्मीरसारख्या खूप विकसित नसलेल्या देशातसुद्धा अली सारखे हुशार आणि धडपडणारे प्रशिक्षक व तजमुल, हशीमसारखे होतकरू विद्यार्थी आहेत. गरज आहे, त्यांना सरकारकडून मदत, पाठिंबा मिळण्याची. तसेच, आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून, ‘होय, तुम्ही आमचेच आहात. हा विश्वास त्यांना देण्याची.’...!!!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य