Bhartiyans

Menu

टेनिस’ चॅम्प होण्यासाठी महागडे साहित्य, विशिष्ट आहारच लागतो, असे नाही ! घरगुती कोर्टवर सराव करणारासुद्धा ‘विजेता’ होऊच शकतो

Date : 21 Mar 2017

Total View : 446

हरियानाच्या सोनिपत जिल्ह्यातील मदिना गावाचा, मातीच्या कोर्टवर कोणतेही खास प्रशिक्षण न घेता, पाणी पिऊन सामना खेळणारा आणि भारताला राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश मिळवून देणारा अवघ्या १३ वर्षांचा अजय मलिक..!


सारांश

हरियानाच्या सोनिपत जिल्ह्यातील मदिना गावात मातीच्या कोर्टवर कोणतेही खास प्रशिक्षण न घेता, खुराक परवडत नाही म्हणून पाणी पिऊन सामना खेळणाऱ्या आणि भारताला राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश मिळवून देणाऱ्या अवघ्या १३ वर्षांच्या अजय मलिककडे बाकी काही नसलं तरी जबरदस्त इच्छाशक्ती, कोणत्याही साधनांपेक्षा स्वतःच्या हाता-पायांवरचा विश्वास, फक्त केळी आणि पाणी पिऊनही आपण आणि आपणच जिंकू शकतो असा बुलंद आत्मविश्वास नक्कीच आहे!सविस्तर बातमी

तुम्हाला ‘इक्बाल’ आठवतो का हो? अभिनेता श्रेयस तळपदेचा ‘इक्बाल’ ! घरची परिस्थिती नाही म्हणून शेतावर तीन काठ्यांचे स्ट्म्प करून, प्रचंड सराव करून भारताला दणदणीत यश मिळवून देणारा ‘इक्बाल’...! तसंच तुम्हाला गीता आणि बबिता फोगाट आठवत असतील... आर्थिक परिस्थिती नाही म्हणून शेतात कुस्तीचा आखाडा तयार करून, त्यावर घाम गाळून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ‘दंगली’त भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारतीय पहेलवान ‘महावीरसिंग’ यांच्या सुपुत्री...!

इक्बाल आणि गीता-बबिता यांच्याच पंक्तीत तुम्ही हरियानाच्या सोनिपत जिल्ह्यातील मदिना गावाच्या अजयचंही नाव घेऊ शकता. अजय मलिक. मातीच्या कोर्टवर कोणतेही खास प्रशिक्षण न घेता, दोन डावांच्यामध्ये खुराक परवडत नाही म्हणून पाणी पिऊन सामना खेळणारा आणि भारताला राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश मिळवून देणारा अवघ्या १३ वर्षांचा अजय मलिक..!   

अजयचे वडील अजमेर मलिक हे भारतीय सैन्यात सुभेदार होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आधीच सैनिकांचा पगार तुटपुंजा त्यात स्वेच्छानिवृत्ती, त्यामुळे थोड्याफार मिळकतीवर टेनिससाठी लागणारे महागडे आधुनिक साहित्य, विशेष प्रशिक्षण, महागडी खुराक हे सगळं त्यांना परवडेनासं होतं. तरी, त्यांनी अजयला आपल्या पद्धतीने घडवलं आणि तो विजेता झाला !

अजय या नववीतील मुलाकडे बाकी काही नसलं तरी जबरदस्त इच्छाशक्ती, बाकी कोणत्याही साधनांपेक्षा  स्वतःच्या हाता-पायांवर विश्वास, दोन डावांमध्ये प्रोटीनयुक्त महागडं खाणंच हवं ही समजूत खोडून आपल्याला परवडतं म्हणून फक्त केळी आणि पाणी पिऊनही आपण आणि आपणच जिंकू शकतो असा बुलंद आत्मविश्वास, यालाच त्याने आपलं भांडवल केलं...!

अजयने साधारण वयाच्या १० व्या वर्षी टेनिस खेळायला सुरवात केली आणि 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्याला विजयाचं सुवर्णपान मिळालं. त्याचा चुलत भाऊ हाच त्याचा प्रशिक्षक. तोसुद्धा प्रशिक्षण घेतलेला नाही तर आवड म्हणून दूरदर्शनवरील खेळ पाहून-पाहून डावपेच शिकलेला. त्याने कोपराच्या दुखापतीमुळे खेळ सोडला. आपलं स्वप्न तो अजयच्या डोळ्यात पाहत होता.

निवृत्त्तीनंतर नेताजी सुभाषचंद्र बोस संस्था चालवणाऱ्या अजयच्या वडिलांनी पैशांचं कारण न दाखवता अजयला त्यांच्यापरीने मदत करण्याचे ठरवले. अजमेर यांना स्वत:वर आणि अजयवर विश्वास होता. ते राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होते. विजेच्या खाबांना लावलेले नेट आणि मातीचे कोर्ट यावर अजयचा सराव सुरू झाला. सोसाट्याचा वारा आला, मुसळधार पाऊस पडला की लगेच हे कोर्ट पडायचं. पण अजयने हिंमत हारली नाही, तो पुन्हा ते उभारायचा.

कोर्टवरील सीमारेषेची आखणी चुन्याने करण्याऐवजी नायलॉनच्या दोरीने व्हायची कारण ती जास्त दिवस टिकेल आणि पैसे वाचतील यासाठी. पायाची आणि मनगटाची ताकद, क्षमता वाढविण्यासाठी टायरांचा वजन म्हणून वापर केला जायचा. अजमेर यांनी स्वत:ला निवृत्तीवेळी मिळालेल्या १३ लाखांपैकी ३ लाख अजयसाठी खर्च करायचे ठरवले. त्यांनी याच पैशातून त्याच्यासाठी एक छोटेखानी कोर्ट बांधले.  

आपल्याला उच्च प्रतीच्या कोर्टवर सराव करायला मिळाला नाही, अशी तक्रार अजयने कधीच केली नाही. तो उलट अतिशय खिलाडूवृत्तीने हसत म्हणतो, ‘आमचं मातीचं कोर्ट आणि स्पर्धेचं कोर्ट यात केवळ रंगाचाच तर फरक असतो.’ जगद्विख्यात टेनिसपटू आणि टेनिसविश्वाचा बादशहा रॉजर फेडरर याला अजय आदर्श मानतो. परंतु, तो भारतीय टेनिसपटू रामकुमार रामनाथन यांचाच खेळ प्रत्यक्ष पाहू शकला आहे.

दिल्ली लॉन-टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कुमार म्हणतात, की ‘अजयचे सराव तंत्र बदलण्याची गरज आहे. अजयची क्षमता आणि सहनशक्ती अफाट आहे. तो पाण्यावर राहूनसुद्धा सामना जिंकू शकतो. कोणत्याही खेळात तांत्रिक शिक्षण अतिशय आवश्यक असतेच. तसेच ते अजयलाही गरजेचे आहेच. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ७ ते १० सेकंदात गुण कमावून सामना खिशात घालतात. त्या ‘ट्रिक्स’ अजयला शिकण्याची गरज आहे.’ अरुणकुमार अजयचे सध्याचे प्रशिक्षक सोमबीर यांनाही सूचना देत असतात. ३ वर्षापूर्वी कुमार यांनीच अजयला ५० टेनिस बॉल भेट देऊन प्रोत्साहित केले होते. त्यांनी उत्तम प्रकारच्या ४ रॅकेट अजयला दिल्या आहेत.

अजयचे वडील अजमेर हे एका स्पर्धेचा अनुभव सांगताना म्हणतात, “ स्पर्धेच्या आधी सरावादरम्यान खेळताना अचानक अजयची एक रॅकेट तुटली. तेव्हा आमच्याकडे केवळ ३०० रुपये होते. रॅकेटदुरुस्तीला ८०० लागणार होते. काही तजवीज केलीही असती; पण मग प्रवासाला काहीच उरले नसते. तेव्हा अक्षरशः देवावर हवाला ठेऊन अजय केवळ एका रॅकेटने सामना खेळला.”

अजय रोज ४० बदामांचे ज्यूस घेतो. हीच एकमेव महागडी खुराक तो घेतो. बाकी त्याचा आहार, सराव आणि खेळ आजही तसाच सुरू आहे..... साधेपणाने पण, ठामपणे, निश्चयाने, सातत्त्याने, अचूकतेने, अपयशाला यशात बदलण्याच्या निर्धाराने...!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Times of India