Bhartiyans

Menu

छत्तीसगड... नक्षलवादी भाग...डॉक्टर नाही...नागरिकांचे हाल! छत्तीसगड...जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार...डॉक्टर आले...नागरीक खुशहाल!

Date : 22 Mar 2017

Total View : 484

छत्तीसगडसारख्या नक्षलवादी भागात डॉक्टर, सर्जन टिकत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. यासाठी छत्तीसडचे जिल्हाधिकारी डॉ.अय्याज यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आणि त्यांना डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यश आले.


सारांश

छत्तीसगडसारख्या नक्षलवादी भागात डॉक्टर टिकतच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. बिजापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ६७ पैकी ५६ जागा रिक्त होत्या आणि सुकमामध्ये ५५ पैकी ४२. यासाठी छत्तीसडचे जिल्हाधिकारी डॉ.अय्याज यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मिडियावरून आवाहन केले. त्याला ११६ डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आणि अवघ्या ६ महिन्यांमध्ये रिक्त पदांमध्ये घट होऊन हा आकडा बिजापूरमध्ये १८ आणि सुकमामध्ये २० झाला आहे.सविस्तर बातमी

डॉ. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेलं अद्भूत काम आपणा सर्वांनाच माहिती आहे. बोटे नसलेल्या हातांनासुद्धा अद्भूत अविष्कार घडवण्याची प्रेरणा त्यांनी दिली आणि या वनवासींच्या जीवनातही निर्मळ आनंद निर्माण करून ‘आनंदवन’ वसवलं, घडवलं, उभं केलं. त्यांच्या कार्याची पताका पुढे डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास बाबा आमटे खांद्यावर घेऊन समाजसेवा करत आहेत.

एका डॉक्टरने समाजाची पर्वा न करता कुष्ठरोग्यांसाठी काम करणं ही तर मोठी गोष्ट आहेच; पण त्याचबरोबर जिथे मुलभूत सुविधाही नाही आणि नक्षलवाद्यांची दहशत मात्र आहे, अशा ठिकाणी जाऊन हे समाजकार्य करणं, ही त्याहून मोठी गोष्ट होती. ‘आनंदवना’मुळे चंद्रपूरमधील आदिवासींना आणि नक्षलवाद्यांनासुद्धा आरोग्याची नवसंजीवनी मिळाली, पण इतरांचं काय?

भारतात आजही काही भाग नक्षलवादी आणि अविकसित आहेत. या भागात डॉक्टर, पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी टिकत नाहीत. छत्तीसगडसारख्या नक्षलवादी भागातही हीच समस्या उद्भवली. परंतु, तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी हार न मानता आपले काम सुरु ठेवले, पाहुया त्यांनी काय केलं?

छत्तीसगडसारख्या नक्षलवादी भागात डॉक्टर, सर्जन टिकत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वयोवृद्ध उपचाराविना मरत आहेत. अनेक बालकांना जन्माला येण्यापूर्वीच या जगाचा निरोप घ्यावा लागत होता. यावर उपाय म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत: प्रयत्न करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या.

यासाठी छत्तीसगडचे जिल्हाधिकारी डॉ.अय्याज यांनी पुढाकार घेतला. ते स्वत: वैद्यकीय क्षेत्रातले असल्याने त्यांना परिस्थितीची भीषणता अधिक जाणवली. त्यांनी सोशल मिडियावरून आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत म्हणून ११६ डॉक्टरांनी चौकशी केली. यांपैकी ५० डॉक्टर हे अनुभवी आणि एका विषयातील तज्ज्ञ होते. तर, ६६ सर्वसाधारण होते.

यांपैकी ५० टक्के लोकांनी स्वतः जाऊन बिजापूरला भेट दिली. बऱ्याच जणांनी पगार, सुखसोयी आणि कुटुंबासाठी असलेल्या सोयींची माहिती विचारली. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून सर्वाधिक अर्ज आले होते. आंध्र प्रदेशात एकूण २७ वैद्यकीय महाविद्यालये ३८०० जागा आहेत. तेलंगणामध्ये २० महाविद्यालये आणि २७५० जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये ४८ महाविद्यालये ६२४५ जागा आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा यांना जोडणारा रस्ता तयार झाला, की डॉक्टरांची संख्यादेखील वाढेल असे डॉ. अय्याज यांचे म्हणणे आहे.

हे सगळं कसं जुळवून आणलं गेलं, हे देखील वाचण्यासाराखं आहे. एप्रिल महिन्यामध्ये छत्तीसगड जिल्ह्यामध्ये एक उपक्रम सुरु करण्यात आला SOS आणि Public Health India Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आणि इतर कर्मचारी नक्षलवादी भागात जाऊन काम करतील असा हा उपक्रम होता.

“जिथे सोयी सुविधा कमी आहेत अशा भागात डॉक्टरांनी काम करावे यासाठी आम्ही केवळ आमच्या नियमात बदल न करता नवीन गोष्टी करण्याचा देखील प्रयत्न केला.” असे या उपक्रमाचा एक भाग असलेले सुब्रत साहू सांगतात. ते पुढे म्हणतात, “ आम्ही अधिक पगार, उत्तम सोयी-सुविधा देण्याचा विचार केला. मानधनासाठी जिल्हा अधिकारी, राष्ट्रीय अधिकारी आणि जिल्हा निधी अधिकारी यांनी आम्हाला मदत केली.”

प्रसन्ना सांगतात, “तज्ञ डॉक्टर २ ते २.५ लाख रुपये एवढे मानधन दर महिन्याला मिळत होते. लहान मुलांचे डॉक्टर किंवा सर्जन यांना १.५९ ते २.६ लाख रुपये मानधन राष्ट्रीय आरोग्य विभाकडून आणि १.१ लाख जिल्हा निधीकडून मिळत होते. हे सगळं करताना लक्षात आलं, की पैसा हेच सर्व काही नाही. आम्ही लष्करी अधिकारी आणि सैनिकांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं. ते देखील देशासाठी सोयी सुविधा नसलेल्या गावांमध्ये राहतातच ना?”

पुढे ते म्हणतात, “अद्ययावत घरे आणि इतर सोयी-सुविधा आम्ही डॉक्टरांना देऊ केल्या. २ वर्षाचा करार केला. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी म्हणून त्यांना अधिक ३ गुण उपलब्ध करून दिले. तसेच मुलांच्या शिक्षणाची सोय, बायकोला नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.”

या सर्व प्रयत्नांना यश आले. सुकमा आणि बिजापूरमध्ये आता बदल दिसतो आहे ८४ तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांनी हा करार मान्य केला आहे. जिथे फक्त खाण कामगारांची कार्यालये आणि सीआरपीएफचे तंबू होते. तिथे आता डॉक्टरांची संख्या देखील दिसू लागली आहे. हा बदल स्वागतार्ह आहे.

बिजापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ६७ पैकी ५६ जागा रिक्त होत्या आणि सुकमामध्ये ५५ पैकी ४२ जागा रिक्त होत्या. अवघ्या ६ महिन्यांमध्ये हा आकडा बिजापूरमध्ये १८ आणि सुकमामध्ये २० वर आला आहे. सुकमामध्ये प्रथमच एक स्त्री-रोगतज्ज्ञ काम करते आहे. बिजापूरमध्ये देखील डॉ. कुशल साकुरे आणि डॉ. अरुण चौधरी हे स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. भूलतज्ज्ञ आणि सोनोग्राफीतज्ज्ञ मिळण अतिशय अवघड काम होतं; पण आता शस्त्रक्रिया दुप्पट झाल्यामुळे गरजेनुसार जवळील जगदलपूरमधून त्यांना बोलावता येतं, असं डॉ.तांबोळी सांगत होते.

या आकडेवारीवरून आपल्याला वास्तवाची भीषणता लक्षात येते :

 

बिजापूर

सुकमा

लोकसंख्या

२,५५,२३०

२,६०,६१८

लिंग गुणोत्तर

९८४

९९०

साक्षरता

४०.९०%

४२%

गावे

६९९

४०१

आरोग्य केंद्र

८९/१०३

६१/११३

आरोग्य अधिकारी आणि तज्ज्ञ

 

 

यांची मंजूर पदे

६७

५५

पूर्वीची रिक्त पदे

५६

४२

आताची रिक्त पदे  

१८

२०

नुकतेच सुकमा जिल्ह्यांत झालेल्या माओवादी हल्ल्यांत १२ भारतीय जवान शहीद झाले, ही बातमी आपण वाचली होतीच. आपला जीव वाचवणारे हे जवान जेवढे वंदनीय आहेत, तेवढेच प्रसंगी जीवदान देणारे हे डॉक्टर देखील आहेत, नाही का..?


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Hindustan Times