Bhartiyans

Menu

वसुली म्हणजे पुरूषांची मक्तेदारी...? कोण म्हणतं?

Date : 27 Mar 2017

Total View : 842

परंपरा मोडून मंजू भाटिया यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेले वसुलीचे क्षेत्र निवडले. १ ग्राहक ते ५०० कोटींची वार्षिक उलाढाल आणि २० राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकृत वसुली एजंट, असा त्यांचा प्रवास आहे.


सारांश

हातात चाकू-बंदूक घेऊन वसुली करणारा ‘भाई’ आपण चित्रपटात पाहत असतो. या क्षेत्रात एखादी महिला अतिशय सभ्यतेने काम करते आहे, यावर विश्वास ठेवाल? पण हे खरं आहे! वसुलीचे क्षेत्र मंजू भाटिया यांनी निवडलं. १ ग्राहक आणि महिन्याचे उत्पन्न रु. २५००० ते ५०० कोटींची वार्षिक उलाढाल व २० राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकृत वसुली एजंट, हा त्यांचा प्रवास अजिबात सोपा व सहज नव्हता...!सविस्तर बातमी

आपण कितीही नाकारलं तरी स्त्री-पुरुष असा भेदभाव अजूनही व्यवसाय आणि करिअरचं क्षेत्र निवडताना कुठेतरी आपल्या मनात येतोच. कोणतं काम कोणी करायचं हे आपल्या मनावर इतक्या लहानपणापासून ठासवलेलं असतं, की पुरूषांच्या क्षेत्रात ‘स्त्री’ काम करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते आहे, ही कल्पना देखील अनेकांना सहन होत नाही. कशासाठी? का? असे प्रश्न समाज त्यांना विचारतोच..!

हे सगळं असलं तरीही, या पारंपरिक समजुतीला छेद देऊन काहीतरी वेगळं करणाऱ्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला असतात.

मंजू भाटिया ही अशीच एक धाडसी महिला, जी अशा क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते आहे.

वसुली एजंट अर्थातच वसुली करणारा ‘भाई’ हे आपण चित्रपटात पाहत असतो. या क्षेत्रात एखादी महिला काम करते आहे, यावर विश्वास नाही ना बसणार?
पण हे खरं आहे! 
वसुलीचे क्षेत्र मंजू भाटिया यांनी धाडसाने निवडलं आणि इतर महिलांच्या मदतीने त्याचा विस्तार सुद्धा  केला.

मूळच्या इंदौरच्या असलेल्या मंजू आता मुंबईमध्ये एका वसुली कंपनीच्या सह-संचालक म्हणून काम करत आहेत. 
‘१ ग्राहक आणि महिन्याचे उत्पन्न रु. २५००० यांपासून आता रु. ५०० कोटींची वार्षिक उलाढाल आणि २० राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकृत वसुली एजंट म्हणून काम.’  
हा प्रवास अजिबात सोपा आणि सहज झाला नव्हता. 
कसा झाला असेल हा प्रवास?

वसुली म्हटल्यावर चित्रपटात पाहिलेले अनेक प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर येतात. तोंडात पान-गुटखा आणि हातात बंदूक घेऊन गुंड दारात उभे ठाकतात,रस्त्यात कुठेही अडवून त्रास देतात, चीजवस्तू पळवतात, अपहरण करतात. आडदांड-गुंड-मवाली आपल्या डोळ्यांसमोर येतात; पण हे समज मोडून काढत मंजू यांनी फक्त स्त्रिया कर्मचारी असलेली ही कंपनी उभी केली आहे.

‘वसुली’चे व्यवस्थापकीय संचालक पराग शहा सांगतात, की ही कल्पना मंजू यांचीच आहे. मी फक्त व्यवसाय सुरु केला; पण आज जे काही आहे ते केवळ मंजू यांच्या श्रमांमुळेच!

इंदौरमध्ये एका व्यावसायिकाच्या घरात मंजू भाटीया लहानाची मोठी झाली. वडिलांचा इलेक्ट्रिक उपकरणांचा व्यवसाय होता. एक भाऊ, बहिण आणि मंजू अशी तीन भांवंडे. मंजू हुशार होती. बारावी नंतर तिने ठरवलं होतं अगदी रु ५०० मिळाले तरी चालतील पण स्वतः च्या पायावर उभं राहायचं. आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आणि मुलाखत देणंही सुरू केलं.

टूलीप इंटरनॅशनल या त्यांच्या कुटुंबाचे स्नेही असलेल्या पराग शाह यांच्या फर्ममध्ये नोकरी सुरु केली. शाह अगदी पहिल्या दिवसापासूनच मंजूला सांगत होते, “जर तुला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अगदी मुळापासून शिकून घे आणि कोणत्याही कामाला छोटे समजू नकोस.”

टूलीप या औषध विक्री कंपनीत मंजू खूप गोष्टी शिकली. त्या विषयाची कोणतीही माहिती नसतानासुद्धा ती शिकत होती.

संपर्काचे जाळे तयार करण्याची प्रक्रिया, मालाची खरेदी-विक्री, स्वतःचे मुंबईसारख्या ठिकाणी माल विकत घेता येतील असे मोठे विक्रेते, हे सर्व मंजू इथे शिकत होती. सोबतच तिने Tally हे अकौंटींग सोफ्टवेअर शिकून घेतलं. त्यामुळे तिला व्यवहाराची माहिती झाली. तिने स्वतःचं पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं. सरकारी कामकाजाची माहिती मंजूला येथे झाली.

माणसाच्या आयुष्याला कसं वळण मिळेल हे सांगता येत नाही. मंजूचं असंच झालं. पराग यांची अजून एक अतिशय छोटी फर्म होती, वसुलीची. या फर्मचे काम, बँकांच्या लोनचे हफ्ते जे कोणी वेळेवर भरत नाहीत त्यांच्याकडून ते वसूल करणे, हे होते. सुरुवातीला ही कंपनी केवळ स्टेट बँकेसाठीच काम करत होती.

बँक दर महिन्याला वसुली कंपनीला त्यांच्या लोनचा हप्ता चुकविणाऱ्या ग्राहकांची माहिती देते. त्यामध्ये एकदा एका आमदाराचे नावही होते. एक जरी चूक पराग यांच्या कर्मचाऱ्यांकडून झाली असती तरी फर्म कदाचित संपली असती. पराग यांनी हे काम मंजूला करायला सांगितलं. मंजूने आमदारांची वेळ आधीच फोनवर ठरवून घेतली. सुरवातीला ग्राहकाला त्याच्या लोन विषयी माहिती देऊन त्यांच्याकडून कारण जाणून घेणे गरजेचं आहे, असं मंजू यांना वाटलं.

त्या सांगतात, की प्रत्येक वेळेस ग्राहक लोन बुडवत नसतो. तो कधी कामाच्या गर्दीत विसरून जातो किंवा तारीख पुढे-मागे होते. आमदाराच्या बाबतीत हेच झालं होतं. आमदारांनी अगदी शांतपणे सगळे ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सर्व रक्कम जमा केली.

या घटनेनंतर मंजू यांनी धडा घेतला, की बँक व ग्राहक यांच्यात संवादच नसतो. त्यामुळे लोनचे हप्ते घ्यायला जेव्हा बँक अधिकारी जातात तेव्हा ग्राहक एकदम बचावाचे धोरण स्विकारतो. बँकेकडे रक्कम ही येत नाही.

मंजू यांना असं वाटलं, की या कामासाठी सर्व महिला निवडाव्या कारण जिथे महिला वसुलीसाठी जात होत्या तिथे त्यांना आदरयुक्त वागणूकही मिळत होती. त्यांनी तरुण पदवीधर मुली, गृहिणी अशा महिलांची निवड केली. २००४ पर्यंत वसूली ही केवळ वैयक्तिक कर्ज यासाठीच होत होती. नंतर व्यवसायाचे स्वरूप थोडे बदलवून शेती विषयक कर्ज याचाही विचार मंजू यांनी सुरु केला.   

मंजू सांगतात, “आम्ही १० जणी रात्री एखाद्या कर्ज बुडवणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी जात असू आणि आम्हाला JCB रस्तावर आणण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर trailer घेऊन जात असू. हे वाचताना देखील तुम्हाला सैनिक-कमांडो प्रमाणे वाटत असेल; पण हा त्यांच्या रोजचा व्यवसायाचा एक भाग होता.

साधारणपणे ज्याचा कर्जाचा हप्ता द्यायचा राहिला असेल त्याला आम्ही आधी फोन करून पूर्वकल्पना देतो. तरीही जर त्याने हप्ता जमा केला नाही तर त्याला सूचना देण्यात येते, की तुझा ट्रॅक्टर जप्त केला जाईल. काहीजण यानंतर पैसे जमा करतात व पुढची हमी देतात. मात्र, अगदीच कोणी ऐकले नाही तर मात्र त्याचा ट्रॅक्टर जमा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. आतापर्यंत आम्ही मध्य प्रदेशमध्येच १००० हून अधिक ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याची आम्ही नोंद ठेवतो. व्हिडीओ शूटिंग करून ठेवतो, आमच्यावर जबरदस्ती, खंडणी किंवा इतर कसलाही आरोप होऊ नये यासाठी.”

२००५ नंतर सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची घोषणा केली आणि आता कर्जवसुली क्षेत्र धोक्यात येणार हे लक्षात आल्यावर मंजू यांनी घर जप्ती आणि घरांची कागदपत्र छाननी याकडे आपला मोर्चा वळवला. २००२ मध्ये सरकारने स्थानिक मालमत्ता जप्त करण्याची परवानगी बँकांना दिल्यामुळे या व्यवसायात चलती होती. या सगळ्याचा फायदा घेत २००७ मध्ये त्यांनी जयपूर, रायपुर आणि मुंबई येथे आपल्या शाखा सुरु केल्या.

स्थानिक मालमत्ता कर्ज वसुली ही अतिशय क्लिष्ट आणि लांबलचक प्रक्रिया होती. या क्षेत्रात पाय रोवणे खरच अवघड किल्ला सर केल्यासारखंच होते. बँक ऑफ इंडियाच्या उप-सरव्यवस्थापक यांच्यासोबतची पहिली भेट मंजू यांच्या लक्षात राहण्याजोगी होती. प्रथमत: अशा रीतीने स्वतःचे काम बाहेरच्या एखाद्या कंपनीस देण्यास या बँक अधिकाऱ्याचा विरोधच होता. मंजू यांनी स्वतःच्या व्यावसायिक कौशल्याने आणि वसुलीमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण दाखवून ‘आम्ही बँकेच्या नावाला कोणताही धक्का न लावता हे काम करू’, असे वचन देऊन त्यांच्याकडून २ ग्राहकांचे काम मिळवले. आज या बँकेचे कर्ज वसुलीचे सर्व ग्राहक मंजू यांच्याकडे आहेत. या ग्राहकांची संख्या थोडी-थोडकी नाही तर सुमारे दोन लाख आहे.

सार्वजनिक क्षेत्राबद्दल मंजू यांचे मत आहे की इथल्या कर्मचारी वर्गाबरोबर काम करणे सगळ्यात अवघड असते. ऐतिहासिक भाषेत बोलायचं तर गड जिंकताना बालेकिल्ला सहज सर होतो; पण तटबंदी मोडण अवघड जातं.

विशेष म्हणजे हे सगळ करताना मंजू यांनी कधीही नियमबाह्य एकही गोष्ट केली नाही.

मंजू भाटिया म्हणतात, “माणसांच्या स्वभावावर काम करा. त्यांना ओळखा. विश्वास आणि एकेमेकांचे संबंध यावर भर द्या. प्रत्येकाच्या स्वतःच्या काही समस्या असतात, वैताग असतात आणि कधी कधी बाहेरच्या लोकांचा संपर्कही नको वाटतो. म्हणून मी लोकांवर काम करते. बाकी तर होतंच असतं.”

प्रत्येक कामाला एक शिस्त आणि पद्धत असते. जसे नोटीस पाठवण्याचे पहिले काम बँकेतून केलेच जाते. लोकांनी त्या नोटिसला उत्तर दिलेच नाही तर ती केस वसुलीसाठी येते आणि वसुलीला ती वास्तू ताब्यात घेण्यास सांगितले जाते. 
या सगळ्या गोष्टी भावनेशी निगडीत आहेत; पण कधी कधी भावना आणि व्यवहार वेगळे ठेवावेच लागतात.

अशीच एक केस ‘वसुली’कडे आली होती. तीन पिढ्यांपासूनचे घर होते. त्यावेळेस घरातील प्रत्येकाचे ऐकून असे वाटले, की सोडून द्यावी केस पण जेव्हा टीम घरी आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार घरातीलच एका व्यक्तीने केली होती. मग दुसऱ्या दिवशी वसुलीची टीम त्यांची शुटींगची टीम, हवालदार, बँक कर्मचारी आणि वास्तूची किंमत ठरवणारे तज्ञ असा लवाजमा घेऊन तिथे पोहोचली आणि पोलिसांना हे पटवून दिले, की आम्ही आमचे काम करत होतो.

वसुली चे काम घर सील करणे आणि लिलाव करणे असे होते. जेव्हा त्या घराची किंवा वास्तूची विक्री होते तेव्हा वसुलीला त्याचे कामिशन मिळते. वसुलीचे काम लिलावासाठी अधिकाधिक निविदा आणणे हे ही होते. तसेच जास्त किंमतीला जर वास्तू विकली गेली तर बँक आणि वसुली दोघांचाही फायदाच होता.

मंजू यांच्याकडून अजून एक ऐकण्यासारखा किस्सा आहे. त्या सांगतात, “गोव्यातलं २२ एकरांवर वसलेलं एक रिसोर्ट. स्टेट बँककडून माहिती मिळाली होती. साधारण ३८ कोटी एवढी किंमत ठरवली होती. त्या एका वस्तूसाठी आम्ही १२ पेक्षा जास्त निविदा मागवल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे आणि आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक म्हणजे रु ६१ कोटीला त्या वास्तूची विक्री झाली. २०११-१२ मध्ये साधारण रु ५०० कोटीपर्यंतच्या केसेस आम्ही केल्या. त्यात आमचा फायदा रु. १० कोटी १० लाखांचा होता.

एवढ्या घराच्या कर्जवसुलीसाठी ५% आमचे कमिशन असते आणि जर लिलावात एखादी वस्तू विकली गेली तर वसुलीला ०.२५% किंवा ०.५% इतके कामिशन मिळते. कशालाही नाही म्हणायचे नाही हा आमचा मूलमंत्र आहे. वस्तूची किंमत अथवा कर्जाची रक्कम कितीही कमी असली तरी आम्ही केसेस नाकारल्या नाहीत. कर्ज वसुली ५ लाख असेल आणि कर्जदाराने २ लाख बँकेत जमा केले असतील तरी आम्हाला कमिशन मिळते.

सगळ्यात अवघड असतात ते कॉर्पोरेट ग्राहक, एक तर ते कोर्टात जाणार, मग कोर्टाच्या फेऱ्या किंवा लिलाव जाहीर केला तर ‘स्टे’ आणतात आणि मग आमचे कमिशनही मिळत नाही. कोणतीही कंपनी चालवण्यासाठी रोख रकमेची गरज अधिक असते. ती आम्हालाही आहेच.”

गेल्या १०-१२ वर्षातील मंजू भाटिया यांच्या कंपनीची प्रगती पहिली की आपण आश्चर्याने थक्क होतो. इंदौरमध्ये २ ग्राहक आणि रु २५००० उत्पन्न येथून सुरू झालेली त्यांची कंपनी आज २० बँकांबरोबर संलग्न आहे. भारतभरात त्यांच्या २६ शाखा आणि २५० कर्मचारी आहेत.

मंजू सांगतात, “आमच्याकडे केवळ २च पुरुष कर्मचारी आहेत. एक कंपनीचे संचालक पराग शाह आणि दुसरे माझे वडील जे कर्नाटक आणि तामिळनाडू या शाखांसाठी काम करतात. महिलांना अधिकार दिले तरी त्या अतिशय संयमाने आणि जोखमीने त्यांचे काम करतात.”

‘वसुली’नेही आता on-line केसेस घ्यायला सुरवात केली आहे. मंजू यांचे कौतुक यासाठी आहे, की त्या फक्त अंमलबजावणीचे काम करतात. महिन्यातून १५ दिवस त्या फिरतच असतात आणि जितका व्यवसाय वृद्धिंगत करता येईल त्यावर लक्ष केंद्रित करतात. सध्या तरी आम्ही आमच्या रोजच्या कामामध्येच व्यस्त आहोत, असं त्या सांगतात.

युनिअन बँकेचे अधिकारी ओ.पी.दुआ हे मंजू भाटिया यांच्याबद्दल असं सांगतात, की सुरवातीला आम्ही मंजू यांच्या कामाविषयी साशंक होतो; पण त्या ग्राहक आणि ‘वसुली’ यांच्यात मैत्रीचा धागा निर्माण करतात. त्यामुळे काम करणं अवघड गेलं नाही”.

विचारांची स्पष्टता, काम करण्याचे निश्चित प्रयोजन, हे मंजू यांचं वैशिष्ट्य आहे. जसा सूर्य रोज उगवतो आणि प्रकाश देतो, तसंच तुम्हालाही तुमचं निश्चित ध्येय माहीत हवं आणि त्या ध्येयाकडे रोज एक एक पाऊल पुढे टाकता यायला हवं. तुम्हाला सूर्यासारखं प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वर्षी प्रकाशमान व्हायचं आहे, असं त्या म्हणतात.

महिलांना त्या सांगतात, की महिला पुरूषांपेक्षा खूप सक्षम असतात. विचारांच्या आणि कामाच्या बाबतीतसुद्धा त्या अधिक प्रगल्भ असतात. तुम्ही केवळ मुले जन्माला घालणारे यंत्र नाही. त्यामुळे सतत वेगळा विचार करून कार्यरत रहा.’’

थोडक्यातच, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणते काम करतात याला अधिक महत्त्व नसून तुम्ही ते काम कसं करतात, यालाच अधिक महत्त्व आहे. मंजू भाटिया या याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे..!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य