Bhartiyans

Menu

ना ओळख, ना परिचय तरी अचानक त्या ‘अनोळखी आजोबांचं’ पत्र येतं, यशाबद्दल तुमचं अभिनंदन करणारं.. लाल-निळ्या शाईने सुरेख हस्ताक्षरात लिहिलेलं..!

Date : 29 Mar 2017

Total View : 1496

वर्तमानपत्रात बातमी वाचून समाजातील विविध क्षेत्रातील आणि स्तरावरील यशस्वी व्यक्तींना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदनपर पत्रे पाठवणारा अवलिया ! जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे सदानंद भावसार यांनी आतापर्यंत एकूण ३७ हजाराहून अधिक पत्रे पाठविली आहेत.


सारांश

गेल्या ४० वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे सदानंद भावसार या पत्रामित्राचा एक अनोखा उद्योग सुरू आहे. वर्तमानपत्रात यश-निवड-नियुक्ती-पुरस्कार अशा बातम्या वाचून त्या यशस्वी व्यक्तींना भावसार अभिनंदनपर पत्र पाठवतात. आतापर्यंत त्यांनी एकूण ३७ हजाराहून अधिक पत्रे पाठविली आहेत. त्यांपैकी ११ हजाराहून अधिक पत्रांची उत्तरे आली आहेत. समाजकार्य करण्यासाठी वेळ- पैसा नाही...जागा नाही...अशी असंख्य कारणे देणाऱ्या लोकांनी भावसार यांचा आदर्श घ्यावा...!सविस्तर बातमी

साधारण ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी जळगावला मूळजी जेठा महाविद्यालयात बीएससी करत होतो. महाविद्यालयीन जीवनात मी खूप राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वक्तृत्व, वाद-विवाद स्पर्धा केल्या. एकदा असंच चाळीसगाव (जि.जळगाव) येथे झालेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिंकली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात माझा फोटो, बातमी आली होती. नंतर २-३ दिवसात महाविद्यालयातील आमचे शिपाई काका मला शोधत आले. म्हणाले, “अरे, तुझ्या नावावर पत्र आलंये.” मी गोंधळलो. जळगावमध्येच माझं घर असताना कॉलेजच्या पत्त्यावर कोण कशाला पत्र पाठवणार..?

हा विचार सुरू असतानाच ते पत्र मी हातात घेतलं. निळ्या शाईने अतिशय सुंदर, एकाच मापातील वळणदार अक्षरे आणि अतिशय रेखीवपद्धतीने लिहिलेल्या त्या पत्रात महत्त्वाच्या वाक्यांखाली लाल शाईने रेघ मारली होती. पत्रात डाव्या बाजूला जा.क्र. असं होतं. माझं अभिनंदन करणारं ते पत्र होतं. शेवटी नावाच्या ठिकाणी लिहिलं होतं- ‘तुझा अनोळखी आजोबा..!’ हे कोण आजोबा..? कुतूहल जागं झालं. पत्राच्या वरच्या उजव्या बाजूला नाव-पत्त्याचा शिक्का मारला होता.

नाव होतं- सदानंद धडू भावसार, योगेश्वर भुवन, सुभाष मार्ग, पारोळा, जि. जळगाव. मला खूप आश्चर्य वाटलं. आनंदही झाला. भावसार आजोबांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे मी पत्रोत्तरही पाठवलं. त्यावर त्यांनीही पुन्हा पत्र पाठवलं आणि मी त्यांच्याशी जोडला गेलो.

भावसार आजोबांशी संपर्क वाढला तसं हळूहळू कळत गेलं, की हा माणूस अवलिया आहे. या अनोख्या पत्रमित्राने आजवर समाजातील विविध क्षेत्रातील आणि स्तरावरील लोकांना मिळून एकूण ३७ हजाराहून अधिक पत्रे पाठविली आहेत. त्यातील ११ हजाराहून अधिक पत्रांची उत्तरे आली आहेत. वर्तमानपत्रात आपल्याला अनेक निवड, यश, स्पर्धेत विजय अशा बातम्या दिसतात. यातील ‘यशस्वी चेहरे’ ओळखीचे नसतील तर आपण सोडून देतो. भावसार आजोबा मात्र, त्या प्रत्येकाला ‘अभिनंदन’पर पत्र पाठवून त्याच्याशी एक वेगळंच नातं जोडतात.

गेल्या ४० वर्षांपासून पारोळ्याचे सदानंद भावसार यांचा हा आगळा-वेगळा उद्योग सुरू आहे. या छंदाची आणि समाजकार्याची सुरुवात कशी झाली, हे ते फार छान सांगतात. ते म्हणतात, “१९७६ ची गोष्ट आहे. मी पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक होतो. एकदा असंच मित्राशी समाजसेवा, सामाजिक कार्य या विषयावर गप्पा सुरू होत्या. हल्ली कोणालाच कोणाची पडलेली नसते, असा माझा सूर होता. अचानक मित्र म्हणाला, ‘लोकांचं सोड, तू तरी काय करतोय समाजासाठी?’ अगदी सहज तो हे वाक्य बोलून गेला. मात्र, मला ते खूप लागलं. मी अंतर्मुख झालो. खरंच, आपण काहीच करत नाही, याची जाणीव झाली. नोकरी, घर आणि आर्थिक गणिते सांभाळून मला काय करता येईल, असा विचार सुरू झाला. आपण किमान यशस्वी व्यक्तींना पत्र पाठवून त्यांचं अभिनंदन तर नक्की करू शकतो, हे सुचलं. त्या दिवसापासून आजपर्यंत हे कार्य अव्याहतपणे एखादं व्रत घेतल्यासारखं मी करतो आहे.”

सुरुवातीला पगार कमी आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने भावसार आजोबा एकच वृत्तपत्र विकत घ्यायचे. त्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पीएचडीधारक, विजयी खेळाडू, पुरस्कारप्राप्त व्यक्ती यांना पत्र पाठवायचे. आर्थिक परिस्थिती सुधारली तशी त्यांनी यात वाढ केली. आज ते ६ वर्तमानपत्र, २ मासिके आणि २ साप्ताहिके घेतात. त्यातील बातम्या वाचून यशस्वी व्यक्तींना पत्र पाठवतात. या सगळ्याचा मासिक खर्च अंदाजे १५००-२००० रुपये येतो. शिवाय रोज वर्तमानपत्र वाचायला आणि पत्रे लिहायला ५-६ तास द्यावे लागतात.

वयाच्या सत्तरीतही ते हे कार्य तेवढ्याच उत्साहाने आणि जोमाने करत आहेत, हे विशेष.

भावसार आजोबांच्या घरी जाण्याचा योग एकदा आला होता. तेव्हा त्यांच्या या छंदाचं मूर्त स्वरूप पाहून माझे डोळे अक्षरशः दिपले. २-३ मोठ्या लोखंडी कपाटात पत्रांचे ढीग व्यवस्थित वर्षानुसार रचून ठेवले होते. ते प्रत्येक पत्राच्या वर जा.क्र. म्हणजे ‘जावक क्रमांक’ असं लिहितात. त्याच पत्राला तुम्ही पत्रोत्तर पाठवलं तर त्यावर तोच क्रमांक ‘आवक क्रमांक’ म्हणून घातला जातो. या सगळ्याची वेगळी नोंदही ठेवली जाते. त्यामुळे आजही १९९४ सालातील अमुक एक पत्र हवं, असं तुम्ही म्हटलं तर ते पट्कन काढून देतात.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांसारख्या राजकारणातील धुरंधर व्यक्तींपासून ते रतन टाटा, स्व. भवरलाल जैन यांसारख्या उद्योजकांपर्यंत आणि रणजित देसाई, शांता शेळके, शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांपासून ते तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंतच्या पत्रांचा अनमोल ठेवा त्यांनी प्राणपणाने जपला आहे.

विशेष म्हणजे, एकदा पत्र पाठवलं की काम झालं. विषय संपला, अशा आविर्भावात ते नसतात. तुम्ही त्यांच्याशी जोडले गेल्यानंतर दरवर्षी गुढीपाडवा आणि दिवाळीला ते तुम्हाला शुभेच्छापर पत्र पाठवतात.

पत्र पाठवण्यासोबतच गेल्या २३ वर्षांपासून त्यांनी अजून एक उपक्रम सुरू केला आहे. दरवर्षी दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ते रोख बक्षिसे देतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेतात. भूकंप, चक्रीवादळ, पूर, दुष्काळग्रस्त भागांना त्यांनी आतापर्यंत सुमारे पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

घरात एखाद्याने समाजकार्य सुरू केलं तर, ‘तू काय लष्कराच्या भाकऱ्या भाजतो आहे.’ असा सूर अनेकदा घरच्यांचा असतो. मात्र, भावसार आजोबांना त्यांची पत्नी रत्नप्रभा, मुलगा पंकज आणि सून वर्षा यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनासह काही खासगी संस्थांनी देखील घेतली आणि विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, ग्रामभूषण पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार असे ११ पुरस्कार मिळाले आहेत.

समाजकार्य करण्यासाठी वेळ नाही...पैसा नाही...जागा नाही...कोणाची मदत नाही... अशी असंख्य कारणे देणाऱ्या लोकांनी सदानंद भावसार यांचा आदर्श घ्यावा. एका तालुक्याच्या ठिकाणी राहून ते आपल्या कार्याने जगाशी जोडले गेले आहेत.

आजच्या तरुणाईला अनुभवाचा सल्ला देताना हे ‘अनोळखी आजोबा’ फार सुंदर सांगतात, “मी नेहमीच तरुणांना सांगतो. एक होती म्हातारी. जी लहानपणीच मेली. कारण म्हातारी केवळ वयानेच वाढली होती. वयाने वाढत जाणं आणि वृद्धापकाळाने मृत्यू येणं यात जीवनाची इतिकर्तव्यता नाही. तुम्ही स्वत:च्या अवाजवी गरजा कमी केल्या, तर निश्चितच समाजकार्यासाठी वेळ आणि पैसा देऊ शकाल. स्वत:चं मोठं वाटणारं दु:ख विसरून इतरांच्या दु:खाकडे पाहिलं तर नक्कीच तुम्हाला तुमचं दु:ख लहान वाटेल...!”

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य