Bhartiyans

Menu

वय वर्षे १५... ‘ति’चं लग्न... चूल-मूल... आयुष्याची राखरांगोळी. वय वर्ष १८... ‘ति’चं लग्न... घर-शिक्षण-नोकरी... आयुष्य ही सुरेख नक्षी !

Date : 30 Mar 2017

Total View : 487

जालना जिल्ह्यातील देऊळगाव ताड गावातली शाळेच्या ‘संवाद पेटीत’ १५ वर्षांच्या मुलीचं ‘मला लहान वयात लग्न करायचं नाही’, असं पत्र आलं. ते गाडेकर बाईंनी पाहीलं. पुढे काय झालं, तुम्हीच वाचा!


सारांश

जालना जिल्ह्यातील देऊळगाव ताड गावातली शाळेच्या ‘संवाद पेटीत’ १५ वर्षांच्या मुलीचं ‘मला या वयात लग्न करायचं नाही. मला शिकायचं आहे’, असं निनावी पत्र सापडलं. अंगणवाडी सेविका गोपिका गाडेकर बाईंनी तपास केल्यावर पत्र ‘अनिता सावंत’चं आहे, हे कळालं. बाईंना अनिताच्या घरच्यांची समजूत घालण्यात प्रचंड प्रयत्नांती यश आलं. आज १७ वर्षांची अनिता ‘हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद’ येथे नर्सिंग शिकते आहे !सविस्तर बातमी

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड नावाचं छोटेसं गाव. या छोट्याशा गावातली छोटीशी शाळा. मात्र, या छोट्याशा शाळेतही मुलांना त्यांच्या तक्रारी मोकळेपणाने मांडता याव्या यासाठी त्यांच्या उपक्रमशील बाई गोपिका गाडेकर या जागरूक होत्या. त्यांनी मुलांसाठी एक ‘संवाद पेटी’ ठेवली होती. या पेटीत मुलांनी त्यांच्या तक्रारी, सूचना, मते यामध्ये लिहून टाकायची..!

असंच एकदा या संवाद पेटीत एका १५ वर्षांच्या मुलीचं पत्र आलं. ते पत्र वाचून गाडेकर बाई सुन्न झाल्या. असं काय म्हटलं होतं त्या मुलीने....?

एकदा नेहमीप्रमाणे ‘संवाद पेटी’ गोपिका गाडेकर बाईनी उघडली. त्यात बरीच पत्र होती. सगळी पत्रे वाचताना अचानक त्यांना एक पत्र दिसलं. पत्रातलं अक्षर खूप ओळखीचं वाटत होतं; पण त्यावर नाव नव्हतं. एका १५ वर्षांच्या मुलीच्या वेदना आणि भीती त्या पत्रातून व्यक्त झाली होती. या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्याचा घाट तिच्या कुटुंबियांनी घातला होता.

प्रकरण गंभीर असल्याचं गाडेकर बाईंच्या लक्षात आलं. त्यांनी हस्ताक्षर ओळखण्याचा खूप प्रयत्न केला. त्याचा अभ्यास केला. काही मुलींना भेटायला बोलावलं. त्यांच्याकडून माहिती काढली आणि मग लक्षात आलं, की हे पत्र ‘अनिता सावंत’चं आहे. “मला एवढ्या लहान वयात लग्न करायचं नाही. मला अजून खूप शिकायचं. मी शिकले तरच मी माझ्या मुलांना शिकवू शकेन.” असं अनिता कळकळीने सांगत होती. २१ व्या शतकात, २०१४ साली हे घडतं आहे हे पाहून बाईंना वाईट वाटलं.

गाडेकर बाईंनी अनिताच्या घरच्यांना भेटायचं ठरवलं. तिच्या कुटुंबाची समजूत घालण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले; पण त्यात त्या यशस्वी झाल्या. आज १७ वर्षांची अनिता ‘हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद’ येथे नर्सिंग शिकते आहे...!

जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील देऊळगाव ताड हे गाव जालन्यापासून ६० किमी अंतरावर आहे. मराठवाड्यातील इतर गावांप्रमाणेच या गावालासुद्धा दुष्काळ, रुक्ष हवामान, आर्थिक अडचण या समस्यांचा सामना करावा लागतो. या सगळ्याचा परिणाम मुलांवर जास्त होतो. लहान-लहान मुलींनासुद्धा आर्थिक अडचणींमुळे पैसे कमावण्यासाठी कापसाच्या शेतात शाळा सोडून काम करावं लागतं. शाळा सुटल्याने आता घरात बसून काय करतील, म्हणून त्यांचं लवकर लग्न लावून दिलं जातं.

गाडेकरबाईंसारख्या समाजसेविका हे थांबवण्याची धडपड करता आहेत. याचदृष्टीने काम करणारी Village Child Protection Committee (VCPC) नावाची एक समिती आहे. या समितीमध्ये गाडेकरबाई काही सजग गावकऱ्यांसमवेत काम करतात. २००९-२०१० मध्ये भारतीय सरकारने एकात्मिक बाल संरक्षण योजना (Integrated Child Protection Scheme) अर्थात ICPS सुरू केली होती. VCPC हा त्याचाच एक भाग आहे जो मुलांचे संरक्षण आणि कल्याण यासाठी कार्यरत आहे.

रचनेनुसार गावाचा सरपंच हा या समितीचा अध्यक्ष असतो आणि अंगणवाडी सेविका सचिव असते. अधिकृत आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक ,शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक, सामाजिक संस्थेमधील तसेच महिलामंडळातील २ सदस्य आणि १२ ते १८ वयोगटातील १ मुलगा व १ मुलगी अशा सर्वांची मिळून ही समिती तयार होते. तिचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

VCPC चे सदस्य महिन्यातून २ वेळा भेटतात. या बैठकीत पुढील कार्याची दिशा सचिव ठरवतात. याचा वेळी संवादपेटी उघडली जाते आणि मुला-मुलींनी त्याद्वारे मांडलेल्या अडचणींचा आढावा घेतला जातो .या बैठकीत प्रत्येकाला आपापली मते मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य असते. सर्वांची मते विचारात घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते. या तक्रारींमध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते मुला-मुलींच्या वैयक्तिक समस्यांपर्यंत विविध समस्यांचा समावेश असतो.

VCPC सदस्य पोस्टर्स, पथनाट्य, आदी प्रबोधनपर कार्यक्रम राबवून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. VCPC च्या सचिव म्हणून काम करताना गाडेकरबाईंना हे समाधान आहे, की मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी हानिकारक ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण त्या करू शकतात. समितीचे इतर सदस्यसुद्धा गावातीलच असल्यामुळे त्यांना आपल्या गावातील मुला-मुलींना येणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना असते.

आनंद कौतिकराव गाडेकर हे २ वर्षांपासून VCPC चे सदस्य आहेत. ते सांगतात, “जेव्हा आम्हाला गावात बालविवाह होणार आहे याची कुणकुण लागते. तेव्हा आम्ही मुलगा आणि मुलीकडच्या लोकांना समजावतो. अशा विवाहाचा त्या मुलांवर आणि त्यांच्या संततींवर होणारा वाईट परिणाम समजावून सांगतो. मात्र, तरीही ती मंडळी त्यांच्या निर्णयावर विवाहावर ठाम असतील तर पोलिसांना त्याची माहिती देतो. पोलिस पुढील कारवाई करतात.”

वर्षोनुवर्षे चालत आलेल्या प्रथा, रूढी मोडणं ही सोपी गोष्ट नाही. हे काम करताना स्वयंसेवकांना आणि त्यातही विशेषतः महिला स्वयंसेवकांना प्रचंड विरोध होतो. याची सुरुवात त्यांच्या घरातूनच होते. अनेकदा धमकावलंसुद्धा जातं. परंतु मुलांच्या भवितव्यासाठी हे स्वयंसेवक समर्थपणे आपल्या कार्याची धुरा सांभाळत आहेत.

SACRED नावाची एक सामाजिक संस्था आहे. ही युनिसेफशी संलग्न आहे. या संस्थेचे सचिव रवी केळगावकर म्हणतात, ‘कमालीची गरिबी आणि आणि उत्पन्नाच्या साधनांच्या कमतरतेमुळे मुलींची लग्न लवकर लावून दिली जातात, जेणेकरून एक खाणारं तोंड कमी होतं.” बालविवाहाला विरोध करण्यासोबतच ही संस्था शाळेतील मुलींची संख्या वाढण्याचं काम देखील करत आहे. येथे मुलींचं साक्षरतेचं प्रमाण फक्त ५०.९% आहे. याचं मुख्य कारण दळणवळणांच्या साधनांची कमतरता हे आहे. गावापासून ४ किमी अंतरावरून सार्वजनिक बस वाहतूक होते. त्यामुळे गावातच ७ वीपर्यंत शिक्षण झाल्यावर मुलींना शिक्षण सोडावं लागतं. लांबच्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना पाठवलं जात नाही. भोकरदन तालुक्यातील १६५ खेड्यात मिळून केवळ ५ बस आहेत. माध्यमिक शाळांमध्ये मुलं सायकलवरून जातात; पण मुलींना ती परवानगी नाही. त्यामुळे शाळा सोडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. या सगळ्याचा विचार करून गाडेकरबाई आणि इतर सदस्य मुलींसाठी रिक्षा उपलब्ध करून देण्याचा विचारात आहेत. या व अशा अनेक सुविधा येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.

आनंद गाडेकर म्हणतात, ”समाज आणि या मुलांप्रती आमचीही काही सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या कल्याणासाठी काम करण्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो. आतापर्यंत आम्ही केवळ स्वतःसाठी काम करत होतो; पण आता संपूर्ण गाव हेच आमचं कुटुंब झालं आहे. मुलांकडून आम्हाला जो आदर मिळतो त्यातून अजून प्रोत्साहन मिळतं.”

१९४७ ते आताचे २०१७ स्वातंत्र्याला ७० वर्षे होत आली. तरी अजूनही आपण बालविवाह, शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या मुलभूत गरजा आणि समस्यांशी लढतो आहोत. मात्र, हा लढा सुरू आहे आणि सुरूच राहील. केशवपन, सती, विधवा पुनर्विवाह यांसारख्या समाजाविघातक प्रथांप्रमाणेच बालविवाह देखील एके दिवशी संपूर्ण भारतातून नष्ट होईल, हे नक्की! तो दिवस लवकरात लवकर येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया..!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य