Bhartiyans

Menu

मराठवाड्यातलं पहिलं स्वमग्न मुलांसाठीचे केंद्र 'आरंभ फाऊंडेशन '

Date : 02 Apr 2017

Total View : 943

२ एप्रिल 'ऑटिझम अवेरनेस डे' च्या निमित्ताने आपण जाणून घेऊया ऑटिझम बद्दल आणि त्यासाठी काम करणा-या ह्या संस्थेविषयी.


सारांश

ऑटिझम हा जन्मतः मेंदूतील बिघाडामुळे होतो. हा रोग नाही त्यामुळे त्यावर औषधं नाहीत. काही औषधं दिली जातात ती ऑटिझम करता नसून डिप्रेशन किंवा क्वचीतपणे या सुग्नांमध्ये आढळून येणारा हिंसकपणा आटोक्यात आणण्यासाठी किंवा हायपर अॅक्टीव्हिटी कमी होण्यासाठी असतात. अशा औषधांनी ऑटिझम बरा होत नाही. प्रगत देशांमध्ये ऑटिझमवर मोठ्या प्रमाणात रीसर्च सुरु आहे, हे असूनही अद्याप तरी या देशांना त्यावर इलाज सापडलेला नाही. अशा परिस्थितीत ह्या मुलाचं काय होणार ही काळजी पालकांना नेहेमीच सतावत असते.सविस्तर बातमी

२ एप्रिल जागतिक जागतीक ऑटिझम अवेरनेस डे आहे.

आजही बऱ्याच लोकांना 'ऑटिझम' म्हणजे काय हे निश्चित सांगता येणार नाही. अगदीच झालं तर लोक याला 'स्वमग्नता' असं म्हणतील पण 'ऑटिझम'म्हणजे नेमकं काय हे मात्र बऱ्याच लोकांना माहित नसतं.

आज मी तुम्हाला ऑटिझम बद्दल तर सांगणार आहेच पण जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नाचे भीषण स्वरूप स्वतः अनुभवणारया, ऑटिझम असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेविषयी पण सांगणार आहे.

गेले सहा महिने 'आरंभ' ह्या संस्थेच्या सौ. अंबिका टाकळकर याचे मेसेजेस मला येत आहेत. कधी त्या मुलांनी तयार केलेल्या सुरेख देखण्या वस्तूचे फोटो असोत किंवा त्यांनी साकार केलेले नृत्य असो किती नानाविध कलागुण आहेत ह्या मुलांमध्ये शब्दश: हे या मुलांना भेटलं की मगच जाणवतं.

सौ. टाकळकर यांच्याशी ओळख होण्याआधी मला ऑटिझम म्हणजे मतिमंद असंच वाटे. परंतु त्यांनीच पाठवलेल्या एका माहितीपर मेसेज मधून आता मात्र मला अनेक गोष्टी स्पष्ट झाल्यात.

आज 'ऑटिझम अवेरनेस डे' च्या निमित्ताने आपण जाणून घेऊया ऑटिझम बद्दल आणि त्यासाठी काम करणा-या ‘आरंभ’ ह्या संस्थेविषयी.

आज समाजात ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणजे नेमकं काय ते माहितचं नसल्यामुळे अशा मुलांना बरेचदा लोक “मतिमंद” समजतात,  पण मतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे.

२-३ वर्षाचं होईपर्यंत त्याच्या पालकांनाही काही कल्पना नसते. कधी कधी तर ८-१० वर्षापर्यंतही लक्षात येत नाही. जशी ती मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या वागणुकीमुळे लक्षात येतं की काहीतरी वेगळ आहे. 

मतिमंद मुलांचा बुध्यांक सरासरीपेक्षा कमी असतो तर ऑटिझम ग्रस्त मुलांचे बुध्यांक सरासरी म्हणजे ७० च्या वर असू शकतो. ५ टक्के मुलांचा सरासरीहून अधिक म्हणजे १०० पर्यंत असू शकतो. परंतु त्या मुलांना स्वतःला व्यक्त करता येत नसल्यामुळे ह्यांचा उपयोग होईलच असं नसतं. एखाद्या  २५ वर्षाचा मतिमंद मुलाचा बुध्यांक ६ वर्षाच्या मुलाएवढा  असेल तर तो ६ वर्षाच्या मुलाइतक वागतो,बोलतो, समजतो पण ऑटिझम ग्रस्त मुलाचा बुध्यांक चांगला असूनही तो तसं वागू शकत नाही: आणि म्हणूनच अशा मुलांना समजून घेणं ही अतिशय अवघड बाब असते. 

ऑटिझम हा जन्मतः मेंदूतील बिघाडामुळे होतो.  हा रोग नाही त्यामुळे त्यावर औषधं नाहीत. काही औषधं दिली जातात ती ऑटिझम करता नसून डिप्रेशन किंवा क्वचीतपणे या सुग्नांमध्ये आढळून येणारा हिंसकपणा आटोक्यात आणण्यासाठी किंवा हायपर अॅक्टीव्हिटी कमी होण्यासाठी असतात. काही मुलांना फिट्स येतात. त्यावर ही औषधं असतात. बऱ्याच मुलांना पोटाच्या विकाराच्या तक्रारी असतात, त्यावर औषधं असतात पण अशा औषधांनी ऑटिझम बरा होत नाही.

प्रगत देशांमध्ये ऑटिझमवर मोठ्या प्रमाणात रीसर्च सुरु आहे, हे असूनही अद्याप तरी या देशांना त्यावर इलाज सापडलेला नाही. अशा परिस्थितीत ह्या मुलाचं काय होणार ही काळजी पालकांना नेहेमीच सतावत असते.

ऑटिझम पूर्ण बरा होत नसला तरी, जर त्याचं निदान लवकर झालं आणि त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळाल तर बऱ्याच प्रयत्नांनी ह्या मुलांना आपण स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत करू शकतो; आणि त्याकरता हे प्रशिक्षण कसं असतं हे जाणून घेण महत्वाचं आहे.

काही  वर्षापूर्वी असंच ह्या मुलांना कसं शिकवायचं ह्याच प्रशिक्षण घेवून मराठवाड्यात ऑटीझमसाठी पहिलं सेंटर उभं राहिलं. चला, त्याच शाळेविषयी आज जाणून घेवूया.

एक सुंदर, छान, गुटगुटित आणि स्वस्थ मुल आपल्याला व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण एक ऑटिस्टीक मुल घरात जन्माला आल्यानंतर सर्वांच्याच सुखस्वप्नांच चित्रच विस्कटून जातं. पंधरा वर्षापुर्वी असच एक चित्र विस्कटलं आणि सुरू झाला त्या चित्राला सावरण्याचा प्रयत्न. जेव्हां अंबिका टाकळकर आणि बाळासाहेब टाकळकर ह्यांना कळलं की त्यांचा पहिला मुलगा ऑटिस्टीक (स्वमग्न) आहे ह्याचा; आणि त्याचं पहिलं पाऊल पडलं स्वमग्नेतेच्या अदभूत आव्हानात्मक जगात.

४ नोव्हेंबर २०११ रोजी टाकळकर दाम्पत्य, पुण्यातल्या डॉक्टर अमिता पुरोहित,  नाशिकचे प्रमोद गायकवाड, बेळगावचे शंशाक कोणो आणि काही सामाजिक जाणिवेतून एकत्र आलेल्या लोकांनी एकत्र येऊन 'आरंभ'चा पाया रचला.

स्वःत च्या मनात असलेल्या कल्पना आणि इतर पालकांच्या गरजा ओळखून एक अद्ययावत आणि आधुनिक सेंटर मराठवाड्यात असावं याचा ध्यास घेऊन या सर्वांनी सहकार्याने मराठवाड्यातल पहिलं स्वमग्न मुलांसाठीचे केंद्र 'आरंभ' च्या स्वरुपात साकार केलं. कल्पना जरी एकाची असली तरीही हे इतके अवघड काम मात्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेकांचे योगदान लागते आणि ते तसे लाभले देखील.

स्वःत अंबिका टाकळकर यांनी विशेष बी.एड.ची अर्हता प्राप्त केली आणि या विशेष मुलांसाठी लागणारे प्रशिक्षण आणि अर्हता प्राप्त असणाराच शिक्षकवर्ग त्यांनी या मुलांसाठी नेमून दिला ज्यामुळे मुलांच्या प्रत्येक गरजेला ओळखून त्याचे नेमके समायोजन केले जाऊ शकते.

उद्देश :- मराठवाड्यात स्वमग्न मुलांसाठीचे अद्याप एकही केंद्र नाही हे लक्षात आले आणि समाजातील सर्वच आई-वडिल, आपल्या मुलांना विशेष प्रशिक्षण गरजेचे आहे हे मान्य न केल्याने कुणीतरी त्या मुलांचा आधार होणे, त्या आई बाबांना विश्वास देणे की तुमचे हे मुल पुढे स्वावलंबी होऊ शकते हे अतिशय निकडीचे होते.

या दरम्यान, टाकळकर दाम्पत्याच्या स्वतःच्या मुलाला अनेक थेरपींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागली आणि मग असं लक्षात आलं की जिथे सर्व थेरपीज ह्या मुलांना मिळतील अशा एका सर्वसमावेशक सेंटरची गरज आहे; आणि ह्यातूनच मग आरंभ’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मोहिम :- आरंभ’ने उत्तम दर्जाचे शिक्षण पुरवणे, कमी-अधिक प्रमाणात ऑटिस्टीक असणाऱ्या विद्यार्थांना स्वतः स्वावलंबी बनविणे, अशा प्रकारच्या स्वमग्न मुलांविषयी समाजात जागृती करुन त्या मुलांना विशेष शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे इत्यादी महत्वाकांक्षी उपक्रम राबवत स्वमग्न मुलांना आयुष्यात उभे करण्याचे अत्यावश्यक समाजोपयोगी कार्य आरंभ’ने हाती घेतले. आज आरंभमध्ये २८ विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे क्रियाशील उपक्रम आरंभमध्ये राबवले जातात.

आरंभ’मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आयुष्यात उभे करण्यासाठी खास परीश्रम घेतले जातात. विविध थेरपीज द्वारा मुलांच्या क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो.

ह्यात आवाज थेरपी, अ‍ॅक्युपेशनल थेरपी, प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ड्रामा थेरपी, मास्क थेरपी, स्पिच थेरपी, फिजिओथेरपी इत्यादींचा प्रभावी उपयोग केला जातो.

ह्या विषयी आपण सविस्तर जाणून घेवू या ....

आरंभ मध्ये आवाज ह्या अद्ययावत थेरपीची नविन तंत्रज्ञानासहीत सुरवात झाली. ह्याद्वारे मुले न बोलता आपल्या भावना दुसर्‍या माध्यमाच्या सहाय्याने दर्शवू शकतात. हे आधुनिक तंत्रज्ञान २ एप्रिल २०१२ रोजी ऑटीझम डेच्या दिवशी आरंभ येथे आणण्यात आले

अ‍ॅक्युपेशनल थेरपी :- ह्या थेरपीत मुलांना आपल्या अती-उत्तेजीत भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. लवकर ती सामान्य होतात आणि त्यांची मुळात असलेली त्यांची चंचलता कमी होण्यास मदत होते.

प्ले थेरपी :- आपल्यातील उर्जा योग्य ठिकाणी वापरुन मोकळ्या वातावरणात आनंद घेऊन खेळातून अनेक छोट्या छोट्या गोष्टी या ऑटिस्टीक असणाऱ्या मुलांना शिकायला मिळतात. ऑटिझम असणाऱ्या या मुलांसाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या आणि त्यांना स्वावलंबी करू शकतील असा सर्वच गोष्टी मुलांना आवडणाऱ्या खेळाच्या माधमातून शिकवल्या जातात.

ड्रामा थेरपी :- जीवनातल्या भावना समजण्यासाठी मनोरंजन हा सर्वांसाठीच सर्वात मोठा आधार समाजाला जातो. ड्रामा थेरपीद्वारे विविध भावनांचे प्रकटीकरण कसे करायचे हे हसत-खेळत मुले शिकत असतात. ड्रामा थेरपीचे शास्त्र-शुध्द प्रशिक्षण अंबिका व योगिता ह्यांनी चेन्नई येथे घेतले आहे. या प्रशिक्षणामुळे ऑटिझम असणाऱ्या मुलांच्या भावनांचे प्रकटीकरण ही मुले व्यवस्थित करू शकतात आणि यामुळे स्वावलंबी जीवन जगायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला या मुलांना फार मदत होते.

मास्क थेरपी :- विविध रंगीबेरंगी मुखवटे हे विविध भावना दर्शवतात. या थेरेपिमध्ये फक्त डोळे उघडे असतात आणि बाकी पूर्ण चेहर्‍यावर मुखवटा झाकलेला असतो. ऑटिझम मुले कदाचित आत्मविश्वासाची कमतरता असणाऱ्या या मुलांना या मास्क-थेरेपीमुळे इतरांच्या नजरेला नजर देणे ह्या मुलांना शक्य होते जे ते सामान्यतः करत नाहीत. यातूनच या मुलांचा आत्मविश्वास वाढत जातो.

म्युझिक थेरपी :- शब्द रचना, ताल, सूर आणि ठेका ह्यांचा समन्वय साधून मुलांना संगीताच्या सहाय्याने उपचार पद्धतीसाठी पुर्ण वेळ काम करणारी शिक्षिका आरंभमध्ये आहे.

स्पिच थेरपी:- मुलांची भाषा विकसीत होण्यासाठी आठवड्यातुन दोन दिवस स्पिच थेरपिस्ट येतात.

मैदानी खेळ (Outdoor) :- विविध खेळणी आणि मैदानी खेळ मुलांना समायोजनासाठी मदत करतात. समुहात राहून करायचे वर्तन मुले शिकतात.

आरंभमध्ये मुलांसाठी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम घेताना मुलांना विविध ठिकाणी पिकनिकसाठी नेण्यात येते. ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव मुले पर्वतारोहण करुन मिळवतात. ह्याच सोबत आरंभ’मध्ये पालकांसाठी मुलांच्या समस्या आणि पालकांना येणार्‍या अडचणी, त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात येतात. स्वमग्न जागृती सप्ताहानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दर वर्षी मार्ग’तर्फे घेण्यात येणा-या गुंजन मुलांसाठीच्या नृत्य स्पर्धेत मुलं सहभागी होतात.

मुलांच्या वर्तन बदलासाठी, साजाजिक समायोजनासाठी विविध सण आणि  उत्सव शाळेत घेतले जातात. त्यामध्ये होळी, गोकुळ अष्टमी, रक्षाबंधन, नवरात्री, गणपती असे अनेक सण साजरे केले जातात. मुलांना कंपनी क्षेत्र भेट तसंच मॉल,  बँक, पोस्ट ऑफिस येथे सुद्धा नेले जाते.

आरंभ आर्ट झोन

प्रत्येक व्यक्ती मध्ये काहीतरी सुप्त गुण असतातच असतात, गरज असते फक्त ते गुण ओळखण्याची. स्वमग्न मुले जरी सार्‍या क्षमता लवकर प्राप्त करू शकत नसली तरी त्यांची बुध्दी सामान्य मुलांप्रमाणेच  असते. त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आर्ट झोनच्या माध्यमातून आरंभने सुरु केले आहे. कला ही प्रत्येकाच्या अंगात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुप्त रुपात दडलेली असतेच. फक्त त्यास वाव मिळण्याचा अवकाश असतो. स्वमग्न (ऑटिस्टीक) मुलांमध्ये जरी त्रिसूत्री अक्षमता असली तरीही त्यांच्यामध्ये एक ना एक सुप्त गुण असतोच. आपणांस फक्त तो ओळखून त्यास आकार द्यावा लागतो. "आरंभ" ने हेच महत्वाचे कार्य हाती घेतले आहे. मुलांमधील कलेला व्यवसायाचे रूप देण्यासाठी, त्यांना भविष्यात स्वावलंबी बनविण्यासाठी "आरंभ आर्ट-झोन" ची स्थापना करण्यात आली.

या आर्ट-झोन मध्ये १० वर्षांवरील मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांनुसार प्रशिक्षण दिले जाते: आणि मग त्यातून सुंदर कलात्मक वस्तुंची निर्मिती केली जाते. समाजात या वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री करून स्वमग्न मुलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या सर्व वस्तूंचे प्रोझोन मॉलमध्ये दरवर्षी दिवाळीआधी प्रदर्शन असते. याचसोबत आरंभ आर्ट-झोन मध्ये औरंगाबाद येथे प्रथमच ब्लॉक-पेंटिंगचे रुमाल, विविध आकाराच्या आकर्षक आणि बहूपयोगी अशा रांगोळ्या, पणत्या, सांजवातीसहीत आकर्षक मेणबत्या, दिवाळीसाठी उपयुक्त लिफाफे आणि ग्रीटिंग कार्ड्स तसेच प्रदूषण मुक्त अशा पेपरबॅग, सुतळीपासून लेटर-हँगिंग, ग्लास-पेंटिंग आणि पेंटिंग फ्रेमस तयार करण्यात आली आहेत. 

या सर्व गोष्टी मुलांना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ शिकवतात तर पुर्ण वेळ काम करणारे कला-शिक्षक दररोज मेहनत घेतात, विविध गोष्टी शिकवतात. सदैव नव-नवीन कल्पना घेऊन मुलांना वेगळे काहीतरी देण्याचा आरंभ’चा हा प्रयत्न म्हणूनच फलदायी ठरतो. यामधुन आम्ही या सर्वच मुलांच्या क्षमता पण वाढवत नेल्या जातात आणि यांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य घडवायला मदत केली जाते..

यावर्षी  बनविलेल्या वस्तुंची व्रिकी अपेक्षेपेक्षा जास्त झाली असून मिळणा-या नफ्यातुन मुलांची बँकेंत खाती उघडली. यासोबतच या मुलांनी केलेल्या या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या फायद्यातून दर महिन्याला काही ठराविक रक्कम चेक द्वारे दिली जाते आणि हे चेक त्यांच्याच या खात्यात जमा केले जातात. आरंभ’च्या छोट्या मित्रांनी त्यांच्या स्वतःच्या स्वयंपूर्णतेकडे उचललेले हे पहिले पाऊलच ठरते.

मुलांच्या मनोरंजनासाठी विविध नाटुकले, समुह नृत्य बसवले जातात. चेन्नई येथे विशेष नाट्य प्रशिक्षणाची तीन दिवसीय कार्यशाळा अंबिका टाकळकर यांनी केली ज्याचा उपयोग अशा प्रकारच्या नाटकांच्या दिग्दर्शनासाठी होतो.

आरंभचा मुख्य उद्देश ह्या स्वमग्न मुलांना सामान्य पातळीपर्यंत आणून, त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून फक्त त्यांना स्वःतच्या पायावर उभे करणेच नव्हे तर पूर्ण आयुष्यातच समर्थपणे उभे करणे हा आहे.

पालक आपल्या स्वमग्न पाल्यांच्या सामाजिक वर्तणूकीवर नाराज असतात. ह्यामुळे ते आपल्या पाल्याला कुठे घेऊन जात नाहीत. ही गोष्ट ओळखून आरंभने ह्या सर्व मुलांना काही पालकांची नाराजी असताना त्यांना तयार करुन मुलांसहीत बर्फी चित्रपट बघण्यास नेले. आणि ह्या मुलांनी त्या चित्रपटाचा घेतलेला आनंद बघून सर्वच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले.

भविष्यात मुलांसाठी स्वतःच्या पायवर स्वावलबी बनवण्याचा दृढ संकल्प आहे. ....

अध्ययन अक्षमता

शारिरीक व मानसिक दृष्या सक्षम असणारी पण फक्त शैक्षणिक दृष्टया अतिशय कमकुवत असणारी मुले ह्या प्रकारात मोडतात. समाजातील ही गरज ओळखून ह्यावर्षी पासून अध्ययन अक्षमतेचा एक वर्ग आरंभ मध्ये सुरू करण्यात आला. त्यात सहा मुलं असून प्रत्येकाला एकास एक पद्धतिनं शिकवलं जातं. सर्व मुलांचा प्रवेश सर्वसाधारण शाळेत असून तयारी आरंभ मधून केली जाते.

लवकरच आरंभ, विशेष मुलांसाठी 'ऊमंग' हा सॅटरडे क्लब स्थापन करणार असून ज्या मध्ये शनिवार, रविवार विशेष मुलांसाठी, डान्स, गायन, पेटी, तबला, पेंटिग ह्याचे क्लासेस घेतले जातील.

विशेष मुलांच्या विशेष शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ लागते. त्यासाठी आरंभ कटीबध्द आहेच पण सामाजिक सहभागातून मुलांना लागणार्‍या अनेक आधुनिक सोयी उपलब्ध होऊ शकतात. ज्या मुलांच्या प्रगतीसाठी पूरक ठरतील. म्हणुनच समाजातील दात्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या यथाशक्ती प्रमाणे आरंभला मदत करावी. त्यासाठी सौ. अंबिका टाकळकर यांच्याशी संपर्क साधावा +९१ ८२७५२ ८४१७८


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य