Bhartiyans

Menu

घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचे हातच घ्यावे ! लग्नाच्या आहेरात आलेले ७०,००० सामाजिक संस्थांना देणारे ‘सह-जीवनप्रवासी’ !

Date : 05 Apr 2017

Total View : 1079

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश झाडे आणि दिपाली यांनी त्यांच्या लग्नात आहेराच्या पाकिटात आलेली रक्कम समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना देण्याचं ठरवलं आणि सुमारे सत्तर हजार रुपयांची रक्कम त्यांनी दिली सुद्धा..!


सारांश

लग्न म्हटलं आहेर आला. हल्ली बहुतांश लोक आहेर म्हणून रोख रक्कम देतात. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश झाडे आणि दिपाली यांनी त्यांच्या लग्नात आहेराच्या पाकिटात आलेली रक्कम समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना देण्याचं ठरवलं आणि सुमारे सत्तर हजार रुपयांची रक्कम त्यांनी दिली सुद्धा..! लोक बिरादरी प्रकल्प-हेमलकसा, प्रश्नचिन्ह आदिवासी शाळा-मंगरुळ चव्हाळा अशा ९ संस्थांना त्यांनी ही रक्कम मदत म्हणून दिली.सविस्तर बातमी

सनईच्या सुरांनी भारलेलं प्रसन्न वातावरण... फुलांनी सुरेख सजवलेलं मंगल कार्यालय... पाहुण्यांची गर्दी...  अत्तराचा घमघमाट... प्रेमळ आग्रहाने तृप्त होऊन उठणाऱ्या जेवणाच्या पंगती....थट्टामस्करी...रुसवेफुगवे.. फोटोसाठी गर्दी.... हे वर्णन वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की, हे वर्णन एखाद्या विवाहसोहळ्याचं आहे.

लग्न म्हटलं की देणं-घेणं आलं. आहेर आला. मात्र, ‘कृपया आहेर आणू नये.’ अशी टीप पत्रिकेत लिहूनही अनेकदा आहेराचा आग्रह होतो. लग्नघरातील मंडळीनाही नाईलाजाने जवळच्या नातेवाईकांकडून खास मित्र-मैत्रिणींकडून आहेर घ्यावाच लागतो. हल्ली बहुतांश लोक भांडे, शोभेच्या वस्तू यापेक्षा रोख रक्कम आहेर म्हणून देणे पसंत करतात. त्यामागे नवदाम्पत्याला नव्या आयुष्याची सुरुवात करताना मदत व्हावी, हा हेतू असतो.

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश आणि दिपाली झाडे यांना देखील त्यांच्या लग्नात आहेराच्या पाकिटात मोठी रोख रक्कम आली. सुमारे सत्तर हजार रुपये आले. एवढी मोठी रक्कम ते सहज स्वतःसाठी वापरू शकले असते; परंतु तसे न करता त्यांनी ती रक्कम समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना देण्याचं ठरवलं आणि दिलीसुद्धा..!

लग्नात आलेली ७०,४४३ रुपयांची रक्कम त्यांनी खालील संस्थांना मदत स्वरूपात दिली :  

१. लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – १०,००० रु.

2. प्रश्नचिन्ह आदिवासी शाळा, मंगरुळ चव्हाळा – १०,००० रु.

3. चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा वाशीम – ५,७५० रु.

4. छत्रछाया फाउंडेशन बुलडाणा – ५,००० रु.

5. आई फाउंडेशन,गेवराई – ५,००० रु.

6. सेवा संकल्प प्रतिष्ठान चिखली – १०,००० रु.

7. भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, आर्वी - १०,००० रु.

8. पालवी ,पंढरपुर - १०,००० रु.

9. समर्पण प्रतिष्ठान (माहेर) - १०,००० रु.

लग्नात मिळालेले पैसे स्वत:साठी वापरणारे किंवा वधू-वराच्या नावावर त्याची ठेव करून ठेवणारे अनेक लोक असतात. मात्र, गणेश आणि दिपाली यांनी घालून दिलेला हा आदर्श खरोखर आजच्या काळात कोणीही आचरणात आणावा असाच आहे. अर्थात, एवढी मोठी रक्कम दान केली म्हणजे गणेश गर्भश्रीमंत असतील असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र, तसं नाही. गणेश हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. ते १६ सदस्यांच्या एकत्र कुटुंबात राहतात. घरी आई-वडील, तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि त्यांची एकूण ६ लहान मुले आहेत.

गणेश हे फार्मासिस्ट आहेत. ते एका मेडीकलमध्ये काम करतात. त्यासोबतच त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय देखील आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांच्याच गावात राहणाऱ्या दिपाली घुबडे यांच्याशी त्यांचा विवाह गेल्या महिन्यातच, ५ फेब्रुवारी २०१७ ला पार पडला. दिपाली यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील सेवानिवृत झाले असून आई शिक्षिका आहे.

गणेश-दिपाली या दोघांच्याही संमतीने लग्न साध्या पद्धतीने करायचे ठरले. विधी, रितीरिवाज, जेवण, मानपान सगळं करायचं ; पण अनावश्यक खर्च टाळायचा असं ठरलं. त्यांना कोणालाही नाराज करायचं नव्हतं. दिसायला अगदीच छोटे पण सकारात्मक बदल त्यांनी केले. लग्नात वधू-वरावर टाकण्यासाठी अक्षता न वापरता फुलांच्या पाकळ्या वापरल्या गेल्या. भोजनाच्या ठिकाणी अन्न वाया घालवू नये, अशी पाटी लावण्यात आली होती.

लग्नात आहेर म्हणून आलेली रोख रक्कम विविध सामाजिक संस्थांना द्यावी असा विचार मनात आल्यावर गणेश यांनी तो लगेचच आपल्या घरातील आणि सासरच्या मंडळींना बोलून दाखवला. सर्वांनी हा समाज विधायक विचार उचलून धरला.

गणेश म्हणतात, "आपणही समाजाचं काही देणं लागतो. परंतु, परिस्थितीमुळे आपल्याला प्रत्येक वेळी मदत करता येतेच असं नाही. त्यामुळे लग्नात आलेली रक्कम स्वतःकडे न ठेवता यानिमित्त ती रक्कम पुन्हा समाजालाच भेट स्वरूपात परत द्यावी, असं वाटलं. आम्हां दोघांच्याही घरच्यांनी होकार दिल्याने हे करणं शक्य झालं.”

मनात तीव्र इच्छा असेल तर आपण कोणतेही कार्य करू शकतो हा संदेश देत गणेश आणि दिपाली यांनी एक उत्तम वस्तूपाठ घालून दिला आहे.

आजच्या काळात लग्नामध्ये अनावश्यक आणि अनाठायी खर्च करणाऱ्या तरुणाईने गणेश आणि दीपालीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्थांना होईल व या नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्याला हजारो गरजूंचे आशीर्वाद मिळतील.


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Exclusive story by writer