Bhartiyans

Menu

तुमच्या लग्नाचा सूट किंवा शालू पुन्हा तेवढ्याच आनंदाने कोणीतरी त्याच्या लग्नात घालायला तयार आहे ! काय म्हणता ? द्याल ?

Date : 06 Apr 2017

Total View : 2721

लोकांनी त्यांच्या लग्नात प्रचंड पैसे खर्च करून आणलेले; पण अत्यंत कमी वापरलेले कपडे गरजुंना देण्याचे काम मंगळूरमधील काही मुस्लीम तरुणांनी मिळून सुरू केलेली ‘झ्वाज रिटेबल ट्रस्ट’ ही संस्था करते.


सारांश

लग्नातील महागडे सूट-शेरवानी, शालू-पैठणी यांचं पुढे काय होतं? नंतर ते फार तर २-३ वेळा घातले जातात आणि पडून राहतात. तेच जर एखाद्या गरजूला त्याच्या लग्नासाठी दिले तर...? कर्नाटकातील मंगळूरमधील काही मुस्लीम तरुणांनी हाच विचार केला आणि झ्वाज रिटेबल ट्रस्ट ही संस्था उदयास आली. त्यांनी आतापर्यंत प्रत्येकी २ या पद्धतीने ३९ नववधूंना साड्या आणि वरांना सूट भेट स्वरूपात दिले आहेत.सविस्तर बातमी

तुम्हाला तुमचं लग्न आठवतं का हो? असा प्रश्न विचारणाऱ्या माणसाकडे तुम्ही तो ‘बालिश’ किंवा जरा ‘वेडसर’ आहे, अशा नजरेने पाहाल. कारण, लग्न (किमान स्वत:चं तरी) कोणीही विसरत नाही. लग्नसोहळा विसरणं जसं अशक्य, तसंच लग्नात आपण कोणता ड्रेस घातला होता, हे विसरणं देखील अशक्यच!

वरमुलगा कोट, शेरवानी, ज्योधपुरी, थ्री-पीस, सफारी, इ. महागडे आणि दिमाखदार कपडे घालून छान तयार झालेला असतो; तर वधू उंची शालू, पैठणी, नववारी, जरीकाठच्या साड्या घालून सजलेली असते. यांपैकी आपण लग्नासाठी कोणता खास पोशाख घेतला होता? तो किती महाग होता? कुठून घेतला होता? हे सगळं प्रत्येकाला आठवतंच असतं. जो तो आपल्या आवडीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे त्यातल्या त्यात भारी कपडे घेतच असतो. मात्र, या कपड्यांचं पुढे काय होतं...?

लग्नात घेतलेले महागडे सूट, शेरवानी, शालू, पैठणी यांचं पुढे काय होतं? हा विचार आपण करतो का? नाही करत ! लग्नानंतर हे ‘लग्नाळू’ कपडे फार तर २-३ वेळा मोठ्या समारंभात किंवा घरातील दुसऱ्या एखाद्या सदस्याच्या लग्नात घातले जातात. वय वाढतं तसं माप बदलतं, मग हेच कपडे घट्ट, आखूड, सैल व्हायला लागतात, ठेवून ठेवून खराब होतात आणि एक दिवस अक्षरश: फेकले जातात...!

लग्नात आपण प्रचंड पैसे खर्च करून हौशीने आणलेले; पण स्वत: मात्र अत्यंत कमी वापरलेले कपडे एखाद्या गरजूला त्याने त्याच्या लग्नात घालावे यासाठी दिले तर...?

तर, ती गरजू व्यक्ती तुमचे कपडे आनंदाने त्याच्या लग्नात घालेलच शिवाय नंतर देखील त्याचा वापर करेल. तुमच्यामुळे त्या वधू-वराला सुंदर आणि किमती कपडे घालायला मिळतील.

अगदी हाच विचार कर्नाटकातील मंगळूरमधील काही मुस्लीम तरुणांनी कृतीत उतरवला आणि साकार झाली ‘झ्वाज संस्था’. झ्वाज चॅरिटेबल ट्रस्ट ही मुस्लीम तरुणांनी मिळून सुरू केलेली संस्था तुमचे लग्नातील कपडे गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. मंगळूर व आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांचे भारी कपडे मशीद, मॉल्स इ. ठिकाणी आणून देतात आणि मग झ्वाजचे स्वयंसेवक ते गरजूंपर्यंत पोहोचवतात.

केवळ लग्नातील कपडेच नव्हे तर इतर मदत करण्यासाठी देखील व्हॉटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून ते जनजागृती करत असतात. आता इथपर्यंतच न थांबता हा उपक्रम मंगळूरप्रमाणे कर्नाटकातील इतर शहरांत राबवण्यासाठी देखील ‘झ्वाज’चे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

‘झ्वाज’चे अध्यक्ष इस्माईल काणा म्हणतात, “ अनेक जोडपी लग्नातील कपडे नंतर २-३ वेळाच घालतात. त्यांनी आपले किमती कपडे गरजूंना द्यावे यासाठी आम्ही सोशल मिडीयाच्या आधारे आवाहन केलं आणि सुरथकाल येथे एक औपचारिक बैठक झाल्यावर ‘झ्वाज’ सुरु झाली.”

सुरूवातील ‘झ्वाज’चे कार्यकर्ते थेट दात्यांकडूनच कपडे घ्यायचे आता मात्र दाते त्यांना मशीद, फोरम फिझा मॉल, सिटी सेंटर मॉल, थोक्कोटू, सुरथकाल या ठिकाणी त्यांच्या आवाहनानुसार कपडे आणून देतात. हे कपडे रमजानच्या काळात गरीब-गरजुंना आवश्यकतेनुसार वाटले जातात.

इस्माईल सांगतात, की त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वधुला २ या पद्धतीने ३९ नववधूंना साड्या आणि वरांना सूट भेट स्वरूपात दिले आहेत. नागरिकांनी मोठ्या स्वरूपात मदत करावी, अशी त्यांना अपेक्षा आहे.

‘झ्वाज’चे समन्वयक समीरूद्दीन पद्बेट्टू म्हणतात, “आम्ही नागरिकांकडून त्यांनी वापरेले कपडे देखील स्वीकारतो आणि ते गरीबांना वाटतो. ज्यांनाही अशा प्रकारची मदत करायची असेल, त्यांनी ०९६८६५८४८६८ किंवा ०९१६४४३५५७८ या क्रमांवर संपर्क साधावा.”

गोष्ट किती साधी आणि छोटी असते नाही; पण ती तुमच्यासह एखाद्याचं जीवन बदलू शकते. समाजकार्य किंवा समाजसेवा म्हणजे केवळ संस्थांना देणग्या देणं, मोठे उपक्रम राबवणं, बडेजाव करणं असं नाही. तर, अखंड मानवतेला जगण्यासाठीचं अनुकूल वातावरण प्राप्त करून देणं ही समाजसेवा आहे आणि अशी समाजसेवा तुम्ही आता या क्षणापासून सुरू करू शकता, गरज आहे ती फक्त तुमच्या उरात समाजविधायक कृती करण्याची प्रेरणा आणि डोक्यात सकारात्मक विचार घेऊन जगण्याची....!!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Times of India