Bhartiyans

Menu

कंपोस्ट खतप्रकल्प, तोसुद्धा चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात?

Date : 07 Apr 2017

Total View : 992

मुंबईमधील दहीसरचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी मिळून पर्यावरण संरक्षणासाठी चक्क कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प पोलीस ठाण्याच्या आवारातच सुरू केला असून लवकरच ते तो मोठ्या प्रमाणावर राबवणार आहेत.


सारांश

काहीतरी चांगलं ऐकल्याने एखादा चांगला विचार सुचतो, ज्यातून समाजविधायक उपक्रम किंवा कार्य उभं राहतं. मुंबईमधील दहीसर येथील पोलीस हेड कॉन्सटेबल बजाई जगताप यांचं असंच झालं! बारावीच्या परीक्षेसाठी एका शाळेत ‘ड्युटी’ करत असताना त्यांनी शाळेत पर्यावरण जागृतीसंदर्भात सुरू असलेल्या कार्यशाळेतील विचार ऐकले आणि कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प राबवायचं ठरवलं. त्यांच्या पुढाकारामुळे दहीसर पोलीस ठाण्याच्या आवारातच कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू झाला आहे.सविस्तर बातमी

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.... ही प्रार्थना आपण सर्वांनीच ऐकली असेल. अनेकांची ती शालेय प्रार्थना देखील असेल. या प्रार्थनेतून नेहमी सज्जनांच्या म्हणजेच चांगल्या व्यक्तींच्या संगतीत रहा. सतत चांगलं ऐकत रहा, असं का सांगितलं असेल हो...?

कारण, चांगलं पाहिल्याने, चांगलं ऐकल्याने, चांगलं वाचल्याने नकळत माणसात बदल होत जातो; तो सकारात्मक होतो !

काहीतरी चांगलं ऐकल्याने त्यातून एखादा चांगला विचार सुचतो, ज्या माध्यमातून समाजविधायक असा प्रचंड मोठा उपक्रम किंवा कार्य उभं राहू शकतं, याची असंख्य उदाहरणे देता येतील. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे, मुंबईमधील दहीसर येथील पोलीस हेड कॉन्सटेबल बजाई जगताप यांचंच बघा ना..!

पण जगताप यांनी असं काय चांगलं ऐकलं, की ज्यामुळे संपूर्ण दहीसर पोलीस स्थानक चक्क कंपोस्ट खतनिर्मिती करू लागलं? चला, बघूया !

पोलीस हेड कॉन्सटेबल बजाई जगताप यांची बारावीच्या परीक्षेसाठी एका शाळेत ‘ड्युटी’ लागली होती. त्याच शाळेत पर्यावरण जागृतीसंदर्भातील एक कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होती. कर्तव्य बजावत असताना जगताप यांच्या कानावर त्या कार्यशाळेतील वक्त्यांचे विचार पडत होते. त्यांची उत्सुकता वाढली आणि त्यांनी स्वत: तिथे जाऊन पाहीलं.

ते म्हणतात, “मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ असताना, मला पर्यावरण जागृतीचा कार्यक्रम ऐकू येत होता. मला त्यांचे विचार आणि पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी सुचवलेली कंपोस्ट खतनिर्मितीची कल्पना खूप आवडली.
त्याक्षणी मला लक्षात आलं, की पर्यावरण संरक्षण करणं यात काहीही अवघड नसून ते अगदी प्रत्येकाला सहज शक्य आहे. गरज आहे ती फक्त चांगलं काहीतरी करण्याचा निर्धार करण्याची.”

शाळेतील पर्यावरण कार्यशाळेत ऐकलेली कंपोस्ट खतनिर्मितीची कल्पना जगताप यांनी लगेचच आपल्या वरिष्ठांना सांगितली आणि तसा उपक्रम राबवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे, वरिष्ठांना देखील ती आवडली आणि त्यांनी कंपोस्ट खतनिर्मिती करण्यास हिरवा झेंडा दाखविला.

लगेचच जगताप वा त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘इको-रॉक्स’ या पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. ही संस्था मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संलग्न आहे. त्यानंतर ‘इको-रॉक्स’चे स्वयंसेवक आणि दहीसर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने काही दिवसांपूर्वी दहीसर पोलीस ठाण्याजवळ कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचा छोटा प्रकल्प उभारला गेला.

हा प्रकल्प सुरू झाल्यापासून दररोज सर्व पोलीस कर्मचारी कंपोस्टच्या ३ फूट बाय २ फूट आकाराच्या कंटेनरमध्ये ४ किलो सुका कचरा जमा करतात. त्यात झाडांची पानं-फुलं, दैनंदिन सुका कचरा यासोबतच पोलीस उपाहारगृहातील भाज्यांची देठे, फळांच्या साली, इ. यांचाही समावेश असतो.

हेड कॉन्सटेबल जगताप हे ज्यांच्या व्याख्यानाने हा उपक्रम करण्यास उद्युक्त झाले त्या रश्मी जोशी ‘इको-रॉक्स’च्या संयुक्त सचिव आहेत. त्या म्हणतात, “आम्ही या प्रकल्पाला ‘वेस्ट टू वेल्थ’ असं नाव दिलं आहे. कंपोस्ट खत तयार करण्याचं प्रशिक्षण आम्ही काही पोलीस कर्मचाऱ्यांना दिलं आहे. महत्वाचं म्हणजे, त्यांना हे काम करण्यात आनंद आणि उत्सुकता वाटते आहे.”

या प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम करणारे कन्हैय्याराम तेलंग असं सांगतात, की ‘इको-रॉक्सच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला कंपोस्ट खत तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. हे खरंच खूप सोपं आहे. तुम्हाला केवळ एकदाच कचरा टाकून खत तयार करण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यानंतर अवघ्या १-२ दिवसात तुम्हाला तयार कंपोस्ट खत मिळतं.” यामुळे आपण कचरा कमी करतो आणि पर्यावरण संरक्षणात हातभार लावतो याचं समाधान मिळतं. याशिवाय आपल्याला झाडांसाठी अतिशय उपयुक्त असलेलं कंपोस्ट खत देखील मिळतं.

तेलंग कंपोस्ट डब्यात सर्वात आधी डब्याच्या तळाशी झाडांची वाळलेली पाने पसरतात. त्यावर इको-रॉक्सने दिलेले बॅक्टरिया कल्चर टाकतात. यातच गायीचं शेण देखील घातलं जातं. अशा प्रकारे मिश्रण झाल्यावर विघटन होऊन उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार होतं.

हा प्रकल्प पाहून दहीसरचे पोलीस निरीक्षक उदय शिर्के यांना खूप आनंद वाटला आणि समाधान देखील झालं. त्यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं. ते म्हणतात, “ मी कंपोस्ट खत आमच्या गावी करायचो; पण मुंबईसारख्या महानगरातसुद्धा अतिशय कमी जागेत हा प्रकल्प होतो आहे, हे पाहून समाधान वाटलं. आपल्यांपैकी प्रत्येकाने जे जे शक्य आहे ते ते पर्यावरणासाठी करायलाच हवं. ज्यांना काहीच शक्य नाही, त्यांनी किमान एवढं तरी करावं.”

दहीसरचे पोलीसांच्या या कंपोस्ट खत प्रकल्पाचं कौतुक बृहन्मुंबई महापालिकेने देखील केलं आहे. ‘जनतेच्या सेवकांनी जनतेसमोर आदर्श घालून दिला आहे.’ अशा शब्दात बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहिसरचे पोलीसांची पाठ थोपटली.

यासोबतच पालेकेचे अधिकारी जे म्हणाले, त्यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. ते म्हणतात, “ कचरा व्यवस्थापान ही समस्या दिवसेंदिवस अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते आहे. महानगरांमध्ये तर कचऱ्याचं वाढतं प्रमाण अक्षरशः भीतीदायक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प शहरात उभं राहणं गरजेचं आहे. कारण, विकास हा कोण्या एका व्य्क्तीकडून साधला जात नसतो. तर, विकासाच्या प्रक्रियेत सर्वांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन सहभागी व्हायला हवं, तरच विकास होतो.”

खरं आहे, असंही एक विचारवंत फार सुंदर म्हणाला होता, की- ‘एका माणसाने १०० पावले चालत जाणं हा विकास नसून १०० माणसांनी मिळून एक पाऊल टाकणं हा विकास आहे.’

काय पटतंय ना..? मग, चला तर आजपासूनच कामाला लागूया ! पर्यावरण संरक्षणासाठी काहीच नाही तर किमान, ‘मी जास्त कचरा करणार नाही आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करेन’, हा संकल्प करूया..!      

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

हिंदुस्थान टाईम्स