Bhartiyans

Menu

एखादा मोर ‘नाच रे मोरा’ गाण्यासारखा तुमच्या अंगणातच पिसारा फुलवून नाचू लागला तर...?

Date : 08 Apr 2017

Total View : 904

बिहारमधील सहारसा जिल्ह्यापासून पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या गावातील अभिनंदन यादव यांनी १९९१ मध्ये हौस म्हणून पंजाबहून मोरांची एक जोडी आणली. या जोडीने नंतर सहा गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे.


सारांश

कल्पना करा, की सकाळी उठल्यावर घराच्या अंगणातील झाडावर तुम्हाला मोर दिसतोय ! स्वप्नवत वाटतं ना हे सगळं ! पण, बिहारमधील सहरसा जिल्ह्यापासून पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या गावातील कारा यादव यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. १९९१ मध्ये त्यांनी पंजाबहून मोरांची एक जोडी आणली. या जोडीने नंतर सहा गोंडस पिल्लांना जन्म दिला. या मोरांना बघण्यासाठी यादवांच्या शेताबाहेर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.सविस्तर बातमी

माझं एक स्वप्न आहे, की माझं घर शहरापासून लांब, दूरवर कुठेतरी, शांत वातावरणात आणि निसर्गसान्निध्यात असावं. त्या घराच्या अंगणात भरपूर झाडे असावी, सुगंधी फुलांची आणि हो, फळांचीसुद्धा! फुलांनी बहरलेली आणि फळांनी लगडलेल्या त्या झाडांनी हिरव्या, पिवळ्या, केशरी, पांढऱ्या, लाल, निळ्या अशा विविध रंगांची मुक्त उधळणच जणू माझ्या अंगणात करावी. घरामागच्या अंगणात एक लहानसा गोठा असावा. त्या गोठ्यात एक गाय आणि तिचं वासरू. शेणाने सारवलेल्या जमिनीचा तो विशिष्ट गंध सर्वत्र दरवळत असावा...!

या स्वप्नातली माझी सर्वांत मोठी फॅंटसी म्हणजे या फुला-फळांनी बहरलेल्या झाडांवर चिमणी, कावळे, पोपट या पक्षांबरोबरच मोरही दिसावा...!! कल्पना करा, की रोज सकाळी घरातून बाहेर पडल्यावर समोरच तुम्हाला मोर दिसतोय आणि तोच प्रसन्न भाव मनात घेऊन तुम्ही कामावर जात आहात. सगळं कसं अगदी अशक्य आणि स्वप्नापुरतंच ठीक आहे, असं वाटतं ना !

आपल्यासाठी हे दिवास्वप्नं असलं, तरी बिहारमधील सहरसा जिल्ह्यापासून पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या गावातील अभिनंदन उर्फ कारी यादव यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. यादव यांचं घर अगदी स्वप्नातल्या घरासारखं सुंदर आणि निसर्गरम्य आहे ! १९९१ मध्ये हौस म्हणून त्यांनी पंजाबहून मोरांची एक जोडी आणली आणि हा ‘राष्ट्रीय पक्षी’ चक्क त्यांचा ‘पाळीव पक्षी’ झाला. मोरांच्या या जोडीने नंतर सहा सुकुमार आणि अतिशय गोंडस पिल्लांना जन्म दिला.

एकूण आठ मोरांचं कुटुंब यादवांच्या शेतात बागडू लागलं. त्यांना कुंपणांमध्ये अडकवून ठेवू नये, असा विचार करून यादव त्यांना मुक्तच ठेवतात. शेजारच्यांचा कुत्रा किंवा मांजर आपल्या अंगणात जरी आली तरी आपण तक्रार करतो. मात्र, या मोरांनी यादव यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही लळा लावला. त्यामुळे मोरांनी कधी इतरांच्या शेतातील पिकांवर धाड घातली तरी शेतकरी त्यांना फक्त हुसकावून लावतात. मोरांना इजा होईल, असं काहीही कोणीच करत नाही. या मोरांना बघण्यासाठी यादवांच्या शेताबाहेर नेहमीच गर्दी असते. येणारे-जाणारे लोक या सुंदर मोरांना बघून आनंदित आणि आश्चर्यचकित होतात. प्रवाशांचा थकवा मोरांना पाहिल्यावर कुठल्याकुठे निघून जातो.  

यादव यांच्या गावातील गावकरी कृष्णकुमार कुंदन सांगतात, की ‘वर्षातून एकदा या मोरांची सगळी पिसे गळून पडतात. तो काळ गावातल्या लहान मुलांसाठी ‘पर्वणी’चा असतो, अत्यंत आनंदाचा असतो. मोरपीस गोळा करण्यासाठी चिमुरड्यांची अक्षरशः पळापळ सुरू असते.

अभिनंदन यादव यांनी मोरांबाबत आणखी एक विशेष गोष्ट सांगितली, ते म्हणतात “गावातला एक महत्वाचा घटक झालेल्या ह्या मोरांना आता गावाबाहेर करमत नाही. त्यांना या गावाचं वातावरण जणू मानवलं आहे. ते इथे रमले आहेत. एका राजकीय नेत्याने यातील दोन मोर नेले; पण ते गावाबाहेर जगू शकले नाहीत. गावासारखं वातावरण, अन्न त्यांना बाहेर मिळालंही असेल; पण कदाचित त्यांच्या कुटुंबापासून लांब नेल्याचं दु:ख त्यांना सोसलं नसावं!

प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, मोबाईल, इंटरनेटच्या लहरी यामुळे सर्वच पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात मोरांची संख्या आधीच कमी असल्याने त्यांना गमावून चालणार नाही. मोर हा केवळ निसर्गाचा सुंदर अविष्कार नसून भारताचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे. त्यामुळे या मोरांच्या संरक्षणाचं आणि पर्यायाने संवर्धनाचं काम करणाऱ्या यादव यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे..!

श्रुती आगाशे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया