Bhartiyans

Menu

आता अभ्यासासाठी पुस्तक हातात घेऊन बसण्याची गरज नाही ! व्हा ‘स्मार्ट’ आणि वाचा ६५ लाख पुस्तके एकाच ॲपमध्ये !

Date : 10 Apr 2017

Total View : 909

आयआयटी खरगपूरने एक ॲप तयार केलं आहे आणि त्याद्वारे तब्बल ६५ लाख पुस्तके, जनरल्स, पिरॉडिकल्स वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा चक्क मोफत आहे.


सारांश

वाचन ‘स्मार्ट’ करणारे अनेक ॲप्स आज उपलब्ध आहेत; पण असंही एक ॲप आहे जिथे तुम्हाला तब्बल ६५ लाख पुस्तके, जनरल्स, पिरॉडिकल्स वाचता येतात आणि तीसुद्धा अगदी मोफत..! भारतातील जगद्विख्यात संस्था आयआयटी खरगपूरने हे ॲप तयार केलं आहे. मानव संसाधन मंत्रालयाने आयआयटी खरगपूरवर नॅशनल डिजिटल लायब्ररी (एनडीएल) निर्माण करण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकल्पातूनच हे ‘ॲप’ तयार झालं.सविस्तर बातमी

स्मार्टफोन हातात आल्यापासून प्रत्येकजण ‘स्मार्ट’ झाला आहे, असंच म्हणायला हवं. प्रत्येकाचं जीवन आता ‘ऑनलाईन’ आणि ‘ॲप’मय झालं आहे. विविध ‘ॲप्स’मुळे जशी अनेक कामं घरबसल्या करणं शक्य झालं आहे, स्वत:चं मनोरंजन करवून घेणं, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणं शक्य आहे, अगदी तसंच ज्ञानसाधकांसाठी विद्यार्जनाचा मार्ग देखील अधिक सोपा आणि ‘स्मार्ट’ झाला आहे.

तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि तुम्हाला वाचनाची, विशेषत: अभ्यासाची आवड असेल तर तो तुम्ही स्मार्टफोनमुळे कुठेही करू शकतो. प्रवास करताना किंवा जवळ पुस्तक नसतानासुद्धा तुम्ही वाचन करू शकतात. आता वाचनासाठी पुस्तकावर अवलंबून रहावं लागत नाही. वाचन ‘स्मार्ट’ करणारे अनेक ॲप्स आज उपलब्ध आहेत; पण असंही एक ॲप आहे जिथे तुम्हाला तब्बल ६५ लाख पुस्तके, जनरल्स, पिरॉडिकल्स वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि तीसुद्धा अगदी चकटफू..!

असं कोणतं हे ॲप आहे बरं? बघुया तरी !

भारतातील सुप्रसिद्ध आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगद्विख्यात संस्था आयआयटी खरगपूरने हे ॲप तयार केलं आहे. या ॲपमुळे विद्यार्थांना ज्ञानाची कवाडे संपूर्णत: मुक्त झाली असून केव्हाही आणि कुठेही अभ्यास करणं त्यांना शक्य होणार आहे. अभ्यास हा त्यांच्या ‘बोटांचा खेळ’ झाला आहे.

या ॲपमध्ये युजरला ६५ लाख पुस्तके, जनरल्स, पिरॉडिकल्स वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही सेवा पूर्णत: विनामूल्य आहे. युजरला केवळ नोंदणी करावी लागते. विद्यार्थ्यांसह ज्याला अभ्यास किंवा वाचनाची आवड आहे, त्यांपैकी कोणीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

मानव संसाधन मंत्रालयाने आयआयटी खरगपूरवर नॅशनल डिजिटल लायब्ररी (एनडीएल) निर्माण करण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकल्पाची सुरुवात एप्रिल २०१५ मध्ये झाली आणि या प्रकल्पातूनच ‘ॲप’ तयार करण्याची कल्पना पुढे आली. सुमारे दोन वर्षे या प्रकल्पावर मेहनत घेतल्यानंतर गेल्याच महिन्यात हे ॲप युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे.

आयआयटी खरगपूरचं अद्भूत यश हे आहे, की केवळ एकाच महिन्यात सुमारे १ लाख युजरने हे ॲप डाऊनलोड केलं आहे. ॲप अधिक उपयुक्त होण्यासाठी अनेक युजर्सने उपयुक्त सूचना देखील दिल्या आहेत.

या ॲपमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार खुलं झालं आहे. एनसीईआरटीची पुस्तके, सुमारे आठ राज्यांची शैक्षणिक क्रमिक पुस्तके, जेईई, गेट आणि युपीएससीच्या प्रश्नपत्रिका, सीएसआयआरच्या आठ प्रयोगशाळांची प्रकाशने, आयसीएआरच्या दोन प्रयोगशाळांची प्रकाशने, कृषीकोश, लिब्रीवोक्स (ऑडिओ बुक्स), साऊथ एशिया अर्काइव्ह, वर्ल्ड ई-बुक लायब्ररी, सत्यजित राय सोसायटीची पुस्तके, आयआयएससीचे प्रबंध आणि शोधनिबंध यांसह असंख्य उपयुक्त आणि दुर्मिळ पुस्तके या ॲपवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

एवढंच नाही, तर नॅशनल डिजिटल लायब्ररी (एनडीएल) ने युरोपिआना (द अम्ब्रेला लायब्ररी ऑफ युरोप फॉर कल्चर अँड म्युझियम) या संस्थेची देखील यासंदर्भात मदत घेतली आहे. ‘युरोपिआना’ने सुमारे १२ वर्षांपूर्वी डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हा प्रकल्प सुरू केला होता. सुमारे दहा लाख भारतीय पुस्तकं डिजिटल करण्याचा या संस्थेचा मानस आहे. आता ही संस्था देखील एनडीएलला जोडली गेली आहे.

आयआयटीचे वरिष्ठ प्राध्यापक आणि एनडीएलचे समन्वयक पार्थ प्रतीम सांगतात, की ‘एनडीएलचे ॲप सुरू झाले असून लवकरच त्याचे ॲपल व्हर्जन येत आहे. त्यामुळे आय-फोन युजर्सला देखील याचा लाभ घेता येणार आहे.’ एनडीएलने ही सुविधा विविध शैक्षणिक संस्थांसाठी देखील सुरू केली आहे. त्यांच्या ndl.iitkgp.ac.in. या संकेतस्थळावर तुम्ही यासाठी नोंदणी देखील सुरू करू शकतात.      

स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांचं वाचन आणि विशेषत: अभ्यास कमी झाला असं म्हणताना आपण अनेकदा हे विसरतो की स्मार्टफोन हे केवळ तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग आपण चांगला केला तर नक्कीच लाभ होईल, हानी नाही. कारण आपल्याला माहीत आहेच, It is not the gun that fights, the man behind gun that fights..!  

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया