Bhartiyans

Menu

इंजिनीअर ते भारतीय हवाई दलातील अधिकारी निधि दुबेचा प्रवास - जिद्दीचा, मेहनतीचा आणि राष्ट्रभक्तीचा !

Date : 11 Apr 2017

Total View : 1152

इंजिनीअर निधि दुबेने भारतीय हवाई दलात जायचं ठरवलं. त्यासाठी स्वत:ची नोकरी सोडून तिने प्रचंड मेहनत केली. तीन वर्षाच्या परिश्रमानंतर ती ‘लॉजिस्टिक्‍स ब्रॅंच-शॉर्ट सर्व्हिस कमिशन’मध्ये उच्च पदावर कार्यरत आहे.


सारांश

ऐशोआरामात जगण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करावं, त्यासाठी भारतीय हवाई दलात जावं असं नागपुरच्या इंजिनीअर निधि दुबेला सारखं वाटत होतं. त्यासाठी नोकरी करतच तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. २०१५ ला ती यशस्वी झाली. तीन वर्षाच्या परिश्रमानंतर ‘लॉजिस्टिक्‍स ब्रॅंच-शॉर्ट सर्व्हिस कमिशन’मध्ये उच्च पदावर रुजू झाली. कौतुकास्पद बाब म्हणजे, भारतातील केवळ चार महिलांची या पदासाठी निवड झाली होती. त्यांपैकी निधि एक आहे.सविस्तर बातमी

तुम्हाला ‘लक्ष्य’ चित्रपटातील ऋतिक रोशन आठवतो का..? तो एका सुखवस्तू कुटुंबातील मुलगा असतो. मात्र, सैन्यात भरती व्हायचंच अशी खुणगाठ मनाशी पक्की केल्यावर आणि आयुष्याचं ध्येय निश्चित झाल्यावर तो मागे वळून पाहत नाही. उच्च मध्यम वर्गातील हा मुलगा अतिशय ऐशोआरामाचं जीवन सोडून सैन्यात जातो आणि अत्यंत खडतर परिस्थिती राहतो. स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो शत्रूला धूळ चारत तिरंगा फडकावतो..! स्वत:चं ‘लक्ष्य’ साध्य करतो..!!

‘ती’सुद्धा अशीच आहे. ‘लक्ष्य’मधील ऋतिकसारखी, सुखवस्तू कुटुंबात वाढलेली, उच्चशिक्षित, नोकरी करणारी. मात्र, एका दिवस देशसेवेचा तिचा ‘जज्बा’ उफाळून आला. त्यातच तिने स्वत:च्या कुटुंबासोबत सैन्याचं संचलन पाहीलं आणि ठरवलं, की काहीही झालं तरी भारतीय हवाई दलात भरती व्हायचंच..! स्वत:च्या जिद्दीवर तिने ते स्वप्न पूर्ण देखील केलं. आज ‘ती’ भारतीय हवाई दलात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

‘ति’चं नाव आहे निधि दुबे. निधि मूळची नागपूरची. बारावीला उत्तम गुण मिळवून तिने ‘रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट’ या महाविद्यालयात प्रवेश मिळवला आणि ती इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनीअर झाली. पुण्यात हिंजेवडीमध्ये एका प्रसिद्ध कंपनीमध्ये तिला नोकरी देखील लागली. इंजिनीअर निधि कॉर्पोरेट क्षेत्रात छान नोकरी करत होती. सुखा-समाधानात जगत होती. हा काळ साधारण २०१४ चा होता. मात्र, निधीचं मन नोकरीत रमत नव्हतं. तिच्या मनात २०१२ साली आई- वडिलांसोबत पाहिलेली सैन्याची परेड घोळत होती. तिच्यातील देशभक्तीची उर्मी वारंवार उफाळून येत होती !

ऐशोआरामाचं जीवन जगण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करावं असं सारखं वाटत होतं. तिने भारतीय हवाई दलात नोकरी करायचं ठरवलं; पण हवाई दलात भरती होण्याची प्रक्रिया सोपी नव्हती. मग, नोकरी करतच तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील सुरू केला. २०१४ ला ती मुलाखतीपर्यंत पोहोचली; पण तिथे तिला अपयश आलं. तेव्हा खचून न जाता तिने पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला आणि २०१५ ला ती यशस्वी उमेदवारांच्या यादीत झळकली...!  

इंजिनीअर निधि दुबे भारतीय हवाई दलात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाली. तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर ती ‘लॉजिस्टिक्‍स ब्रॅंच-शॉर्ट सर्व्हिस कमिशन’मध्ये उच्च पदावर रुजू झाली.
अत्यंत कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, भारतातील केवळ चार महिलांची या पदासाठी निवड झाली होती. त्यांपैकी निधी एक आहे.

निधिचे वडील प्रद्युम्न दुबे हे ‘नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लॅंड यूज प्लॅनिंग’ मध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि तिची बहीण भारतीय लष्करात कॅप्टन आहे. या दोघांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असं निधि म्हणते.

निधिचा प्रवास आणि तिचं यश आपल्याला हेच सांगतं की, पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अट फक्त एकच आणि ती म्हणजे, तुमची मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी हवी. मग, यश आहेच तुमच्या आणि फक्त तुमच्याच हातात..!

 

*छायाचित्र – प्रातिनिधिक*

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

सकाळ