Bhartiyans

Menu

तक्रार करणं खूप सोपं असतं... काम करणं अवघड ! नागालँडच्या या पोलीस कर्मचाऱ्याने काम केलं, तक्रार नाही!

Date : 12 Apr 2017

Total View : 650

नागालँडचे पोलीस कॉन्सटेबल नैनगुपे मरहू यांनी त्यांच्या गावातील कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेतला. ते रोज स्वत:च्या गाडीतून सार्वजनिक कचराकुंडीमधील कचऱ्याचे कंटेनर कचरा डेपोत जाऊन टाकतात. हे काम ते स्वखर्चाने करतात.


सारांश

देशाचे नागरीक म्हणून सरकारकडे तक्रार करणं खूप सोपं आहे; पण स्वत:ची कर्तव्ये पार पाडणं फार अवघड आहे. नागालँडमधील पोलीस कॉन्सटेबल नैनगुपे मरहू यांनी नागरीक म्हणूनही स्वत:चं कर्तव्य उत्तमरित्या पार पाडलं. त्यांनी गावातील कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेतला. ते रोज स्वत:च्या गाडीतून सार्वजनिक कचराकुंडीमधील कचऱ्याचे कंटेनर कचरा डेपोत जाऊन टाकतात. अशा दिवसभरात ते १४-१५ फेऱ्या स्वखर्चाने करतात.सविस्तर बातमी

सरकार हे करत नाही... सरकार ते करत नाही... आमच्याकडे पाणी नाही.. वीज नाही.. रस्ते नाही... वाहतूक व्यवस्था नाही... हे नाही आणि तेसुद्धा नाही! किती सोपं असतं न असं ओरडणं ! या जगात सगळ्यात सोपं असतं ते तक्रार करणं आणि सगळ्यात अवघड असतं ते त्याच तक्रारीचं निवारण करणं.

देशाचे नागरीक म्हणून सरकारकडे तक्रार करणं खूप सोपं आहे; पण तेच जबाबदार नागरिक म्हणून स्वत:ची कर्तव्ये पार पाडणं फार अवघड आहे.

नागालँडमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलिसांचे कर्तव्य बजावत असतानाच स्वत:चे नागरीक म्हणून असणारे कर्तव्य देखील अतिशय उत्तमरित्या पार पाडलं आहे. नागालँड पोलीसमध्ये कॉन्सटेबल असलेले नैनगुपे मरहू यांनी कचरा व्यवस्था लावण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. आज त्यांच्यामुळे गावातील कचऱ्याचे ढीग जमा होण्याची समस्या सुटली आहे, असं काय केलं बरं त्यांनी....?

नागालँडमधील फेक राज्यातील समुद्रसपाटीपासून साधारण २ हजार ११३ मीटर उंचीवर असलेलं पिक्चर्सक्यू फुतेस्रो हे थंड हवेचं ठिकाणी आपल्याला माहीत असेल. केवळ १३,००० लोकवस्ती असलेल्या या गावातील पोलीस कॉन्सटेबल नैनगुप्पे मरहू यांनी मात्र, एकट्या माणसाने जर ठरवलं तर तो काय करू शकतो, याचा आदर्शच निर्माण केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून पिक्चर्सक्यू फुतेस्रो या गावाला कचरा व्यवस्थापनाची समस्या भेडसावत होती. सार्वजनिक कचराकुंडी अक्षरश: तुडुंब भरायच्या. त्यातील कचरा खाली पडून कचऱ्याचे ढीग तयार होत. मात्र, तरीही स्थानिक प्रशासनाला जाग येत नव्हती. ‘स्वच्छ भारत अभियान’ येथे केवळ कागदावरच राबवले जात होते. नागरीकांनी याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली. त्यावर त्यांना ‘कचरा वाहून नेणाऱ्या गाडीचे टायर खराब झाले आहेत’, ‘गाडीची बॅटरी खराब आहे’, अशी ‘छापील’ उत्तरं मिळाली.

या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आणि ‘कालोस’ या नागरी प्रश्नांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष कुपेलही लोसोऊ असं सांगतात, की ‘आठवड्यातून केवळ एकदा किंवा दोनदा येथे पालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी यायची. मात्र, मागच्या महिन्यापासून तेसुद्धा बंद झालं. प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा साठू लागला. दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं. रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, प्रशासन अतिशय थंड होतं.’

अशी सगळी परिस्थिती असतानाच, एक दिवस अचानक एका वेगळ्याच ठिकाणाहून मदतकार्य सुरू झालं. हे ठिकाण होतं. पोलीस वसाहत आणि लोकांसाठी देवदुतासारखं धावून आलेल्या या जबाबदार नागरीकाचं नाव होतं नैनगुपे मरहू.

मरहू हे एक दिवस सकाळी आपली गाडी घेऊन घरातून बाहेर पडले. त्यांनी सार्वजनिक कचराकुंडीमधील कचऱ्याचे कंटेनर आपल्या गाडीत ठेवले आणि गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या कचरा डेपोकडे ते स्वत: गाडी चालवत घेऊन गेले. तिथे त्यांनी गाडीतील सगळा कचरा टाकला, अशा त्यांनी त्या एकाच दिवसात २१ फेऱ्या केल्या. यावरून आपल्याला विचार करता येईल, की कचरा किती मोठ्या प्रमाणात साचला असेल..!

यानंतर पुढेही त्यांनी हे काम सुरूच ठेवलं. त्यांच्या रोज अशा सुमारे १४ ते १५ फेऱ्या होत होत्या. विशेष म्हणजे, यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्च ते स्वत: करत होते. वेळ देत होते. ते म्हणतात, “ड्युटीवर जाताना मी रोज पहायचो की कचराकुंडी भरली आहे. कचरा खाली साचतोय. मी हे चित्र फार काळ सहन करू शकलो नाही. मी विचार केला, की आपणही ‘जनतेचे सेवक’ आहोत. मग, केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा आपण स्वत:च कामाला सुरुवात केली तर....? तत्काळ हा विचार मी कृतीत उतरवण्याचं ठरवलं आणि सकाळी ड्युटीवर जाण्याची आधी आणि संध्याकाळी ड्युटी संपल्यावर कचरा व्यवस्थापनाची नवी ‘ड्युटी’ मी करू लागलो.

मरहू यांच्या या कार्याचं कौतुक करताना कुपेलही लोसोऊ असं म्हणतात, की ‘मरहू यांनी केलेल्या या अत्यंत समाजोपयोगी आणि विधायक कार्यामुळे ते लोकांच्या मनात ‘हिरो’ झाले आहेत. आज स्वत: च्या खासगी कामासाठी देखील सराकारी वाहन वापरणारे शासकीय कर्मचारी, अधिकारी अनेक आहेत. मरहू यांनी मात्र, सामाजिक कार्यासाठी सरकारी वाहन वापरले नाही. ते स्वत:ची गाडी वापरतात आणि स्वत: पेट्रोलचा खर्च करतात. त्यांचे कार्य पाहून प्रभावित झालेल्या काही नागरिकांनी स्वत:हून त्यांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. मरहू यांच्यासारखे लोकच खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ भारत अभियाना’चे ‘स्वच्छतादूत’ आहेत.

गेल्या ७ वर्षांपासून पोलिसाची नोकरी करणारे २७ वर्षीय मरहू यांना २०,००० रुपये पगार आहे. या पगारात ते घर चालवतात आणि अशा पद्धतीने समाजसेवा देखील करतात. ते म्हणतात, “माझं माझ्या शहराप्रती असलेलं ‘कर्तव्य’ या भावनेतून मी हे काम करतो. केवळ लोक माझं कौतुक करतात म्हणून नाही, तर या कार्यातून मला, माझ्या पत्नीला आणि मुलांनासुद्धा समाधान व आनंद मिळतो, म्हणून मी हे काम करतो.”

नुकतेच मरहू यांना त्यांच्या कामाबद्दल येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तीनशे रुपयांचं बक्षीस देखील दिलं आहे.

मरहू यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलिसाला आणि तेवढ्याच सुजाण व जबाबदार नागरिकाला ‘टीम भारतीयन्स’चा कडक सेल्यूट...!
जय हिंद...!

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

द वायर