Bhartiyans

Menu

या गावात ना वीज.. ना पाणी... ना वाहतुकीची साधने ! पण, खासगी शाळेलाही लाजवेल अशी सरकारी शाळा नक्की आहे.

Date : 13 Apr 2017

Total View : 706

जिथे वीज नाही, पाणीव्यवस्था नाही, वाहतुकीची साधने नाही. एवढंच काय, गावातील अनेकांनी रेल्वे देखील पाहिलेली नाही. तिथे खासगी शाळेलाही लाजवणारी सरकारी शाळा उभी करणारा अवलिया शिक्षक मदन यादव !


सारांश

बिहारमधील बडवंकाला या गावात आजही वीज-पाणी-रस्ते-वाहतुकीची साधने नाहीत. गावातील अनेकांनी रेल्वे देखील पाहिलेली नाही. अशा गावात खासगी शाळेलाही लाजवणारी सरकारी शाळा मदन यादव या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षकाने सुरू केली. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यांचं काम पाहून सरकारने ही प्राथमिक शाळा आता ११ वी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात.सविस्तर बातमी

भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७० वर्षे झाली. मात्र, आजही बिहारमध्ये एक गाव असं आहे, की जिथे वीज नाही, पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही, वाहतुकीची साधने नाहीत..... एवढंच काय, या गावातील अनेक लोकांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात रेल्वे देखील पाहिलेली नाही...!

अत्याधुनिक तर सोडाच पण मुलभूत सुविधांचा देखील अभाव असलेल्या या गावात एक सरकारी शाळा मात्र दिमाखात सुरू आहे. या शाळेतील विद्यार्थी अगदी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसारखं शिक्षण घेत आहेत. त्यांना सुंदर गणवेश आहे. वीज-पाणी-रस्ता नसलेल्या या गावात ही किमया कोणत्या जादुगाराने केली..?

परिवर्तन आणि विकासाचा ध्यास घेतलेला हा जादुगार एक सरकारी शिक्षक आहे.
या अनोख्या गावातील अनोख्या शिक्षकाची यशोगाथा तुम्ही स्वत:च वाचा !

शाळेचा आणि पर्यायाने गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केलेल्या या अवलिया शिक्षकाचं नाव आहे मदन यादव आणि त्याच्या गावाचं नाव आहे बडवंकाला.
बडवंकाला हे बिहारमधील अतिशय छोटंस गाव. समुद्रसपाटीपासून सुमारे दीड हजार फुट उंचीवर वसलेल्या या गावात मुलभूत सुविधांची वानवाच आहे.

मदन यादव आपल्या गावाविषयी सांगताना म्हणतात, “१९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून आजपर्यंत आमचं गाव आहे त्याच परिस्थितीत आहे. गावाचा कणभरही विकास झालेला नाही. ग्रामस्थ आजही १९४७ मध्ये असल्यासारखेच वावरतात. गावात वीज नाही. पाण्याची व्यवस्था नाही. रस्ते नाही. अलीकडेच वाहतुकीची काही साधने उपलब्ध झाली आहेत; नाही तर ग्रामस्थ एका गावातून दुसऱ्या गावातसुद्धा पायीच जायचे. पाणी आणायला आजसुद्धा काही किलोमीटर अंतर चालत जावं लागतं. गावातील अनेकांनी रेल्वे देखील पाहिलेली नाही.”

विशेष म्हणजे, अशाच परिस्थितीत, याच गावात मदन यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात जाऊ लागले. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर लगेचच त्यांना एका खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी लागली. तिथे त्यांनी ५ वर्षे काम देखील केलं.

मात्र, आपल्या गावातील बिकट शिक्षणव्यवस्था, विकासाचा अभाव, विद्यार्थ्यांचं अंधकारमय भविष्य हे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. शेवटी, स्वत:चं आरामदायी आयुष्य सोडून २००३ मध्ये ते पुन्हा आपल्या गावात परतले. विद्यार्थ्यांच्या अंधकारमय भविष्यावर प्रकाशाची ललाटरेखा लिहिण्याचा निर्धार करूनच...!

गावात परतल्यावर गावासाठी स्वत:ला झोकून द्यायचं असं मदन यांनी ठरवलं. त्यासाठी सर्वप्रथम ते गावातील सरकारी शाळेत गेले आणि तिथे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ते सांगतात, “शाळेची अवस्था अतिशय भयावह आणि वाईट होती. १९५३ साली सुरू झालेल्या या शाळेत आतापर्यंत फारच थोडे लोक गेले होते. मी स्वत: शाळेच्या दाराचं कुलूप उघडलं आणि कामाला सुरुवात केली.”

त्यानंतर यादव यांनी ग्रामस्थांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती पालकांना केली. शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयीसुविधा मिळाव्या यासाठी त्यांनी सरकारच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचं ठरवलं. मोफत शालेय पुस्तकं, गणवेश, माध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी मदन यांची धडपड सुरू झाली.

याचा परिणाम म्हणजे, आजुबाजुच्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी टंचाई असताना मदन यांच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी अजून एक युक्ती लढवली. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने टाय दिले. सरकारने दिलेल्या गणवेशात टाय नव्हते. मात्र, मदन यांच्या शाळेतील विद्यार्थी जेव्हा टाय लावून स्वच्छ, टापटीप गणवेशात शाळेत जाऊ लागले, तेव्हा साहजिकच इतर विद्यार्थ्यांना देखील आपणही या शाळेत जावं, असं वाटू लागलं आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली.   

मदन यांनी आपल्यासारख्याच इतर ५ शिक्षकांची मदत घेऊन शाळेत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करण्यास सुरुवात केली. विविध उपक्रमांमध्ये ते विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनासुद्धा सहभागी करून घेऊ लागले. विद्यार्थ्यांना तबला, पेटीवादन शिकवले जाऊ लागले. नाटक, चित्रकला अशा विविध कलांचे धडे मिळू लागले. मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलं गेलं.

मदन म्हणतात, की ‘सरकारी शाळांमध्ये काही शिकवलंच जात नाही, असा लोकांचा गैरसमज आहे. मात्र, आम्ही तो खोडून काढला. आमच्या शाळेची हजेरी रोज किमान ८५% असते. आम्ही विद्यार्थ्यांकडे संपूर्ण लक्ष देतो.”

मदन यांच्या यशाची सर्वात मोठी पावती म्हणजे, त्यांचं काम पाहून सरकारने ही प्राथमिक शाळा आता ११ वी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजूबाजूच्या गावातील मिळून सुमारे ५०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. त्यादृष्टीने जास्त शिक्षक आणि आणखी काही सुविधांची गरज आहे, अशी अपेक्षाही मदन यांनी व्यक्त केली आहे.

आज शाळेत सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. पिण्यासाठी आणि ५०० विद्यार्थ्यांचं माध्यान्ह भोजन करण्यासाठी पाणी आणणार कुठून..? सध्या ४ महिला कर्मचारी तिथे काम करतात. त्यांपैकी २ जेवण तयार करतात आणि २ पायपीट करून पाणी आणतात. त्यामुळे सरकारने या गावांकडे लक्ष देण्याची खरंच गरज आहे. मदन सांगतात, की ‘या गावात सरकारी अधिकारी, पर्यटक असं कोणीही येत नाही. कारण इथे काही सुविधाच नाही. गाव महामार्गाला जोडलं देखील गेलेलं नाही.’

अक्षरश: बिकट आणि वाईट परिस्थितीमध्ये मदन यांनी घेतलेली मेहनत मात्र सत्कारणी लागते आहे. या शाळेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी मोठ्या शहरात शिक्षणासाठी जात असून दोन जण तर नेव्हीमध्ये भरती झाले आहेत. मदन यांनी नुकतच संगणक आणि इंटरनेट कनेक्शन घेतलं असून ते त्याद्वारे विद्यार्थ्यांना सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

चक्रव्युह्यात अडकलेल्या अभिमन्यूसारखे मदन यादव एकाकी झुंज देतायेत. त्यांना यश मिळतं; पण कधीकधी नियती त्यांच्या पदरात अपयशाचं दानसुद्धा टाकते. परंतु, ध्येयासक्त यादव यांना अपयशाचा विचार करायला वेळच नाही. केवळ एकाच प्रश्नाने ते झपाटून गेले आहेत.

तोच प्रश्न आपल्यालाही अस्वस्थ करतो. ते विचारतात, की ‘एकीकडे देश प्रगतीचं शिखर गाठत असताना, या विद्यार्थ्यांना, या गावातील लोकांना किमान सुविधांनी परिपूर्ण असलेलं सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्याचा अधिकारसुद्धा नाही का....?’

बघा, विचार करा, कदाचित तुम्हाला काहीतरी उत्तर सापडेल..!

 

 

(फोटो सौजन्य : बेटर इंडिया)

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया