Bhartiyans

Menu

महिलांना ‘त्या’ दिवसात मोलाची साथ देणारी ‘साथी’ ! हे आहेत विघटनशील सॅनिटरी पॅड्स... बहुगुणी तरीही अल्पमोली !

Date : 19 Apr 2017

Total View : 1834

मासिक पाळीमध्ये स्त्रियांकडून वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्स हा वैद्यकीय कचरा आहे. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. यासाठीच अहमदाबादमधील ‘साथी’ या कंपनीने विघटनशील सॅनिटरी पॅड्स तयार केले आहेत.


सारांश

मासिक पाळीमध्ये स्त्रियांकडून वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्स हा वैद्यकीय कचरा आहे. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. मात्र, जिथे मासिक पाळी हा शब्द उच्चारताना देखील महिला लाजतात, घाबरतात तिथे प्रत्येक स्त्रीला हे माहीत असेल का? हाच विचार करून अमृता सैगल, ग्रेस केन आणि क्रिस्टीन कागेत्सू या नवोदित उद्योजिकांनी ‘साथी’ ही विघटनशील सॅनिटरी पॅड्स तयार करणारी कंपनी सुरू केली.सविस्तर बातमी

वैद्यकीय कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे या कचऱ्याचं विघटन कसं करायचं हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो.

मासिक पाळीमध्ये स्त्रियांकडून वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्स हा वैद्यकीय कचराच आहे. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. मात्र, जिथे मासिक पाळी हा शब्द उच्चारताना देखील महिला लाजतात, अनेक जणी तर घाबरतात तिथे प्रत्येक स्त्रीला हे सर्व माहीत असेल का?

यासाठी ज्यांचं विघटन शक्य आहे अशाच पद्धतीचे सॅनिटरी पॅड्स तयार केले आणि त्याचं महत्त्व महिलांना समजावून सांगितलं तर..?

तर, काम खूपचं सोपं होईल आणि महिला त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सजग होतील. शेवटी, वर्षाचे ३६५ दिवस अहोरात्र संपूर्ण घरादाराची काळजी करणारी ‘ती’ महिन्यातील ‘त्या’ चार दिवसांविषयी जागरूक हवीच ना!

अगदी असाच विचार करून ‘साथी’ या अहमदाबादमधील सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या स्टार्टअप कंपनीची सुरुवात झाली.

ही कंपनी ‘मेस्ट्यूटस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या शैक्षणिक संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या अमृता सैगल, ग्रेस केन आणि क्रिस्टीन कागेत्सू या तिघींनी सुरू केली. त्यांनी विघटनशील सॅनिटरी पॅड्स तयार करायचं ठरवलं. स्त्री सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण या विचाराने त्या झपाटून गेल्या होत्या. भावना आणि व्यवहाराची सांगड घालण्याच्या सुरेख प्रयत्नातून निर्मिती झाली ‘साथी’ या सॅनिटरी पॅड्सची!   

ज्यांचा उपयोग कंपोस्ट खतनिर्मितीसाठी देखील केला जाऊ शकतो अशा प्रकारचे पॅड्स त्यांना तयार करायचे होते. खूप अभ्यास केल्यावर त्यांनी केळीच्या झाडाच्या तंतूंपासून तयार होणाऱ्या बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सची निर्मिती करायचं ठरवलं. अचूक निरीक्षण, कल्पकता, सजग सामाजिक जाणीव आणि प्रचंड मेहनत यातून हा प्रकल्प उभा राहिला. 

सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावणं ग्रामीण भागातील महिलेसाठी खूपच अवघड असतं. मात्र, आता त्या त्यांनी वापरलेल्या पॅड्सची विल्हेवाट कंपोस्टद्वारे लावू शकतात. विशेष म्हणजे, भारतात १२ लाख एकर केळीचं पीक घेतलं जातं आणि नवीन पीक घेताना जुनी झाडे अक्षरशः उखडली जातात. हे या तिघींच्या चाणाक्ष बुद्धीने हेरलं. त्यांनी या केळीच्या झाडांच्या पल्पचा उपयोग करायचं ठरवलं आणि त्यातून ‘साथी’ हे पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्सची तयार झाले. शिवाय या पॅड्समुळे त्वचेला कुठलीही इजा होत नाही, हे विशेष! 

इतर पॅड्सपेक्षा स्वस्त दारात मिळणारे आणि वापरानंतर लवकरच कंपोस्ट होऊ शकणारे हे पॅड्स खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरत आहेत. तसंच, केळीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना यातून उत्पनाचा नवीन स्रोत मिळाला आहे. सॅनिटरी पॅड्सचं भारतातील संभाव्य मार्केट ५६ दशलक्ष आहे. हे लक्षात घेता ‘साथी’ लवकरच यशस्वी भरारी घेणार हे नक्की...!!!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इकोनॉमिक टाईम्स