Bhartiyans

Menu

‘ती’सुद्धा महिलाच आहे; पण रडत-कुढत न बसता तिने घरं सोडलं, तिच्यामुळे अनेक स्त्रियांना समाजात ‘मानाचं’ स्थान मिळालं..!

Date : 20 Apr 2017

Total View : 495

दलित स्त्रियांनी मुख्य प्रवाहाशी जोडलं जावं यासाठी केरळमधील सुधा वर्गीस घर सोडून बिहारला आली. केरळ ते बिहार, अर्थातच सुधा वर्गीस ते ‘पद्मश्री सुधा दीदी’ हा तिचा प्रवास झंझावाती आहे.


सारांश

दलित स्त्रियांनी मुख्य प्रवाहात यावं यासाठी केरळमधील सुधा वर्गीस घर सोडून बिहारला आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने समाजकार्य करण्यास सिद्ध झाली. आज त्या नारी गुंजन’ या दलित महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ‘पद्मश्री सुधा दीदी’ झाल्या आहेत. नारी गुंजनमध्ये ५० विविध उपक्रम राबविले जात असून सुमारे १५०० हून अधिक स्त्रिया या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत.सविस्तर बातमी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा अतिशय द्रष्टा आणि उपयुक्त मंत्र दिला होता. बहुजनांनी केवळ शिक्षण नसल्यामुळे मागे राहू नये, त्यांनाही शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि त्यांनी सदैव प्रगतीपथावर राहवे, अशी त्यांची तळमळ होती...!
डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वातील हीच तळमळ आणि प्रेरणा घेऊन पद्मश्री ‘सिस्टर सुधा’ या बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील जमसौतमध्ये दलित स्त्रियांसाठी काम करत आहेत.   

दलित स्त्रियांनी मुख्य प्रवाहाशी जोडलं जावं यासाठी झटणाऱ्या ‘सिस्टर सुधा’ यांचं खरं नाव सुधा वर्गीस. त्या ‘सिस्टर सुधा’ किंवा ‘दीदी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. दीदींची जन्मभूमी केरळमधील कोट्टायम. मात्र, बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील जमसौत ही त्यांनी आपली कर्मभूमी केली. सध्या त्या ‘नारी गुंजन’ या दलित महिलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.  

‘नारी गुंजन’चे महत्वाचे काम म्हणजे दलित स्त्रियांना शिक्षित करणं, त्यांना व्यवसायभिमुख शिक्षण देणं, आरोग्य सेवा पुरवणं, कायदेशीर सल्ला देणं आणि आयुष्य उभारणीसाठी मदत करणं. नारी गुंजनमध्ये ५० विविध उपक्रम राबविले जात असून सुमारे १५०० हून अधिक स्त्रिया या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. अर्थात, ‘नारी गुंजन’ने ही झेप एका दिवसात घेतली नाही. त्यामागे सुधा वर्गीस नावाची अखंड तपश्चर्या होती.

वर्गीस यांचा जन्म १९४९ मध्ये केरळमधील कोट्टायम येथे झाला आणि वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजे १९६५ मध्ये बिहारमधील दलितांसाठी आणि गरिबांसाठी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी घर सोडलं. पाटणा येथील नोटरे डॅम अकादमीमध्ये त्या गेल्या. तिथेच त्यांनी स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं आणि हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व देखील मिळवलं. त्यानंतर त्यांना एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी देखील लागली.

मात्र, त्यांच्यातील ‘कार्यकर्ता’ नोकरीच्या चौकटीत आणि साचेबद्ध आयुष्यात रमण शक्यच नव्हतं. तसंच झालं, दलितांसाठी कार्य करण्याची त्यांच्यातील उर्मी वारंवार उफाळून येत होती. शेवटी, १९८६ मध्ये नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ दलित महिलांवरील अत्याचारांविरोधात काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी १९८९ मध्ये वकिलीचं देखील शिक्षण घेतलं. 

त्यांनी युनिसेफकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि युनिसेफने देखील त्यांना ५० विकासकेंद्रे उभारण्यासाठी काही हजार डॉलर्सची मदत केली. मात्र, याची सुरुवात अतिशय लहान आणि कोंदट जागेतील शाळेत झाली होती. काही मुलींना तर त्यांनी स्वतःच्या घरातही आश्रय दिला होता. या मुलींना सुधा दीदी प्राथमिक शिक्षणासोबतच शिवणकाम आणि भरतकामाचे देखील धडे देत होत्या.

यानंतर त्यांनी मुलींसाठी ५ केंद्रे सुरू केली. या केंद्रांमध्ये मुलींना स्वच्छता, पौष्टिक आहार, पैसे बचतीचे मार्ग यावर प्रशिक्षण दिलं जायचं. ‘नारी गुंजन’ केवळ महिलांच्या गरजा भागवत नाही, तर त्यांना आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि इतर विषयांचे भान व प्रशिक्षण देऊन सक्षम आणि सजग करते.

दीदी म्हणतात, “आपल्याला बोलता येतं हेच विसरायला लावणार्‍या समाजाचा एक कोपरा म्हणजे स्त्री ! आणि दलित स्त्री म्हणजे आपण बोलूच शकत नाही, याची खंतही न बाळगता केवळ झिजत राहणं. स्त्रियांसाठी बदल म्हणजे वडिलांचे घर सोडून नवर्‍याच्या घरी जाणं, एवढाच. बाकी वागणूक तीच आणि तशीच!”

हे चित्र बदलण्यासाठी सरकारी मदत व खासगी निधीच्या आधारे २००५ मध्ये त्यांनी ‘प्रेरणा’ केंद्र उभं केलं. शेतमजुरी ते उत्तम शिक्षण हा बदल ‘प्रेरणा’ने अनेक मुलींच्या जीवनात केला. प्राथमिक शिक्षणांतर या मुली तेथील सरकारी शाळेत जात असत; पण दीदींना सरकारी शाळेतील अनास्था पाहवत नव्हती. शेवटी, दीदींनी काही प्रमाणात निधि जमवला स्वतःची शाळा सुरू केली. काही पदवीधर मुलींना त्यांनी या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी दिली.

याची दाखला घेत तत्कालीन नितीशकुमार सरकारने दीदींना विनंती केली आणि गया येथे ‘प्रेरणा-२’ सुरू झालं. गुजरातमध्ये २०११ साली झालेल्या स्पर्धेत ‘प्रेरणा’तील मुलींनी तब्बल ५ सुवर्ण, ५ चांदी आणि १४ कांस्यपदके पटकावली. एवढंच नाही, तर जपानमधील आशियन ज्युनिअर कराटे स्पर्धेत सहभागी होत तिथेही ७ पदके मिळवली.

सुधा वर्गीस सांगतात, “गेल्या ५ दशकात मला जिवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या; तसे काही क्षण देखील आले. मात्र, आयुष्य हे देवाचीच देणगी असल्याने मला काहीही झालं नाही. मी माझे काम सुरूच ठेवले.” त्यांचा नौबतपूर या गावातील अनुभव त्या सांगतात, की २०१३ मध्ये या गावातील दलितांनी गावात राहूच नये, म्हणून त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. महत्त्वाचं म्हणजे, पोलिसांनी त्या गावाला भेटही दिली नव्हती. शेवटी आम्ही तो प्रश्न धसास लावला. सुधा दिदींना असे अनेक अनुभव आले. एकदा गावातील काही उच्च वर्णीयांनी दलितांच्या लहान मुलांना देवळाजवळ खेळतात म्हणून मारहाण केली. दीदींनी या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन प्रश्न सोडवला.  

२०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ‘स्वातंत्र्य दिनी’ गावात झेंडा वंदनासाठी आले असताना त्यांनी दीदींच्या प्रयत्नांची दखल घेऊन गावातील विधवांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी इंदिरा आवास अंतर्गत गृह योजना जाहीर केली. आज सिस्टर सुधा यांना बिहारमध्ये कार्य करत २१ वर्षांहून अधिक काळ लोटला. बिहार मधील बिहात, दानापुर, पुनपून, फुलवारी आणि नौबतपुर येथे दीदींची शैक्षणिक केंद्रे आहेत.

सुधा वर्गीस यांच्या कार्याची दखल वेळोवेळी घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. बिहार सन्मान पुरस्कार, बिहार अस्मिता पुरस्कार यासोबतच २००६ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

तसा विचार केला, तर कुठे केरळ आणि कुठे बिहार. एक संपूर्ण साक्षर आणि दुसऱ्याची साक्षरतेची सुरुवात. अशात एक स्त्री वयाच्या १६ व्या वर्षी २५०० किमीचा प्रवास करून येते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने समाजकार्य करण्यास प्रेरित होते, यावरून दासबोधातील एक ओवी आठवते, की-

दुसऱ्याच्या दुःखें दुःखवावें | परसंतोषें सुखी व्हावें |

प्राणीमात्रास  मेळऊन  घ्यावें | बऱ्या  शब्दें ||

बहुतांचे अन्याये  क्ष्मावे | बहुतांचे कार्यभाग करावे | 

आपल्यापरीस व्हावे | पारखे जन ||

 

सुधा वर्गीस यांचा प्रवास अगदी असाच आहे..! 


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

डी एन ए इंडिया