Bhartiyans

Menu

डॉक्टर, सुविधा, यंत्रणा, औषधे... काहीही नसताना ‘या’ ‘रँचो’ने केली धावत्या रेल्वेत गर्भवतीची यशस्वी प्रसूती !

Date : 21 Apr 2017

Total View : 741

विपिन खडसे या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्याने अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये चित्रलेखा या २४ वर्षीय गर्भवतीची यशस्वी प्रसूती केली. त्यासाठी त्याने व्हॉटस ॲपवरून तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं.


सारांश

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये चित्रलेखा ही २४ वर्षीय गर्भवती तिच्या पतीसह प्रवास करत होती. गाडी वर्धा जंक्शनजवळ असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. दुर्दैवाने, प्रवाशांमध्ये कोणीही डॉक्टर नव्हतं. तेव्हा, विपिन खडसे या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्याने व्हॉटस ॲप ग्रुपवरून तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत तिची यशस्वी प्रसूती केली. चित्रलेखाने गाडीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला.सविस्तर बातमी

‘आल इज वेल’ म्हणणारा... ‘बाबा रणछोडदास’ बनून मित्रांना उलट-सुलट सल्ले देणारा आणि खोडकर पण प्रचंड बुद्धिमान असलेल्या ‘३ इडियटस’मधील ‘रँचो’ला आपण विसरूच शकत नाही..!

त्याच्या इतर खोड्या-किस्से कदाचित स्मरणाच्या पटावरून पुसट होऊ शकतात.
मात्र, लॅपटॉपद्वारे डॉक्टरांची मदत घेऊन त्याने एका अडलेल्या गर्भवतीची केलेली प्रसूती आणि एका जीवाला दिलेला जन्म, हा हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग कोणी विसरूच शकत नाही...!

हा चित्रपटातील काल्पनिक प्रसंग आहे, हे माहीत असून देखील पाहताना आपण ते पूर्णत: विसरून जातो, भारावून जातो आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. कारण, तो प्रसंगच तसा आहे. ‘प्रसूती म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म’ हे त्या प्रसंगाने शब्दश: खरं करून दाखवलं आहे !

असाच एक प्रसंग अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये घडला. इथे ‘रँचो’च्या भूमिकेत होता विपिन खडसे आणि लॅपटॉपच्या जागी होतं ‘व्हॉटस ॲप’...!

काय झालं असेल त्या गर्भवतीचं रेल्वेत..? फक्त विचाराने देखील अंगावर सरकन काटा येतो न? धावती रेल्वे... प्रशिक्षित डॉक्टर नाही... अत्याधुनिक सुविधा नाही... यंत्रणा नाही... औषधांचा साठा नाही.... होत्या त्या फक्त मन सुन्न करणाऱ्या एका गर्भवतीच्या कळा आणि वेदना....!

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये चित्रलेखा ही २४ वर्षीय गर्भवती तिच्या पतीसह प्रवास करत होती. ते अहमदाबादला गाडीत बसले आणि छत्तीसगडमधील रायपूर इथे त्यांना जायचं होतं. गाडी वर्धा जंक्शनजवळ होती. नागपूर साधारण ३० किलोमीटरवर अंतरावर होतं; तेव्हा अचानक चित्रलेखाला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती वेदनांनी विव्हळू लागली.

प्रवाशांनी घाबरून साखळी ओढली आणि टीसीला देखील कळवलं. टीसी आणि गार्ड यांनी प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का, अशी चौकशी करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत काही जाणकार स्त्रिया चित्रलेखाला धीर देत होत्या. प्रवाशांनी स्वत:हून चित्रलेखाचं कंपार्टमेंट रिकामं करून दिलं. प्रवासी महिलांनी पडदे लावून ‘प्रसूतीकक्ष’ तयार केला; प्राथमिक तयारी झाली, पण डॉक्टरच नव्हते..! प्रवाशांपैकी कोणीही डॉक्टर नव्हतं.

विपिन सांगतो, की ‘टीसी आणि गार्ड चौकशी करत होते. कोणीतरी अनुभवी डॉक्टर असतील, तर अधिक उत्तम, म्हणून मी काही बोललो नाही. मात्र, ते दुसऱ्यांदा चौकशी करायला आले; तेव्हा मी मदत करायची तयारी दाखवली.’

विशेष म्हणजे, विपिन हा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी आहे. तो पूर्णत: डॉक्टर झालेला नाही. मात्र, अभ्यास, महाविद्यालयातील प्रात्याक्षिके, आणि सहकार्याची भावना यातून त्याने चित्रलेखाला मदत करायचं ठरवलं. विपिनने पाहिलं तेव्हा चित्रलेखा अक्षरश: विव्हळत होती.

रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिला अशक्तपणा येत होता. त्यातच तिची प्रसूती अवघड ठरत होती. कारण, सामान्यत: बाळाचं डोकं सर्वप्रथम आईच्या शरीराच्या बाहेर येतं आणि नंतर संपूर्ण बाळ. मात्र, चित्रलेखाच्या बाबतीत बाळाचा खांदा सर्वात आधी बाहेर आला होता.

विपिनने प्रसंगावधान राखत, न घाबरता धैर्याने त्या स्थितीचा फोटो काढून तो त्याच्या वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांच्या व्हॉटस ॲप ग्रुपवर टाकला व तातडीची मदत मागितली. ज्येष्ठ प्रसूतीतज्ज्ञ डॉ. शिखा मालिक या लगेच उपलब्ध झाल्या आणि यांनी त्याला फोनवरून मार्गदर्शन केलं. रेल्वेत असलेली एक सुईण देखील मदतीसाठी धावून आली.

तोपर्यंत रेल्वे नागपूरला पोहोचली होती. नागपूर येताच रेल्वेच्या महिला डॉक्टरांनी परिस्थितीचा ताबा घेतला आणि तेवढ्यातच चित्रलेखाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नुकताच जन्मलेला, डोळे मिटून पडलेला, तो इवलासा, लालबुंद गोळा हातात घेताना जणू विपिनला डॉक्टरांना ‘देवदूत’ आणि ‘जीवनदाते’ का म्हणतात, ते खूप वेगळ्या अर्थाने कळालं असावं...!

विपिनने केवळ चित्रलेखाची प्रसूती केली नव्हती. तर, दोन जीवांना जन्म दिला होता. पहिला चित्रलेखाच्या बाळाला आणि दुसरा पुन्हा नव्याने स्वत: चित्रलेखाला...!!
 


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया