Bhartiyans

Menu

दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या नवऱ्याला, ‘ति’ने बोटही न लावता लगावली आहे सणसणीत चपराक !

Date : 25 Apr 2017

Total View : 1251

सविता (नाव बदलेले आहे) तिची मुलगी आणि नवऱ्यासह राहत होती. नवरा-मुलगी-ती असा त्यांचा संसाराचा सुखी त्रिकोण व्हायला हवा होता. मात्र, ‘नवरा’ नावाच्या विषम-विक्षिप्त कोनामुळे ते शक्य होत नव्हतं.


सारांश

आजही कित्येक महिला नवऱ्याने केलेले अत्याचार मूकपणे सहन करत आहेत. मात्र, सविता या ‘रणरागिणी’ने हिंमत दाखवली… नवऱ्याला सोडण्याची आणि पदरी मुलगी असतानाही काम करून संसाराचा गाडा एकटीने ओढण्याची! सविताचा नवरा रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा आणि नंतर तमाशा करायचा. एका दिवस तिने मुलीसह निश्चयाने घर सोडलं आणि काम करून ती एकटी राहू लागली. तिने मुलीला चांगलं शिक्षणही दिलं.सविस्तर बातमी

‘कसाही असला तरी शेवटी तो ‘नवरा’ असतो.’ या पारंपरिक मानासिकेतत अडकून आजही कित्येक महिला नवऱ्याने केलेले अत्याचार, वाईट वागणूक मूकपणे सहन करत आहेत. केवळ चार भिंतीतील गोष्ट चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करत आहेत. मात्र, या ‘रणरागिणी’ने हिंमत दाखवली… नवऱ्याला सोडण्याची आणि पदरी मुलगी असतानाही काम करून संसाराचा गाडा एकटीने ओढण्याची!

सविता (नाव बदलेले आहे) तिची मुलगी आणि नवऱ्यासह राहत होती. खरं तर नवरा-मुलगी-ती असा त्यांचा संसाराचा सुखी त्रिकोण होण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र, या त्रिकोणातील ‘नवरा’ नावाच्या विषम आणि विक्षिप्त कोनामुळे ते शक्य होत नव्हतं.

सविताचा नवरा रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा. नंतर काहीतरी खुसपूट काढून सविताशी भांडायचा, तिला मारहाण करायचा, घरातील वस्तू इकडे-तिकडे फेकत आणि मोठ्याने ओरडत अक्षरशः तमाशा करायचा. हे रोजचंच झालं होतं. सविता आतल्या-आत कुढत, स्वत:च्या नशिबाला दोष देत सगळं सहन करायची. आधीच तिच्या नवऱ्याची कमाई कमी, त्यात दारूचं व्यसन; त्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती देखील दिवसेंदिवस खालावत होती. विचित्र स्वभावाचा नवरा तिला कामही करू देत नव्हता. एकूणच, इकडे आड, तिकडे विहीर अशा अवस्थेत ती आला दिवस ढकलत होती.

लग्न झाल्यावर हे प्रकार आज-उद्या थांबतील असं तिला वाटतं होतं. तिने नवऱ्याला खूप समजावण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, तो आपल्याच ‘धुंदीत’ होता. सविताला मुलगी झाल्यावर तर हे प्रकार थांबण्याऐवजी उलट वाढतच गेले. मुलगी झाल्यावर मुलीचा खर्च आणि एकूणच घरखर्च वाढतो आहे, याचं खापर तो नराधम साविताच्याच डोक्यावर फोडू लागला.

अशातच ‘तो’ निर्णायक दिवस सविताच्या आयुष्यात आला, ज्याने तिच्या आयुष्याला खूप मोठी आणि वेगळीच कलाटणी दिली. सविता सांगतात, “त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे दारू पिऊनच आला होता. घरात आल्याआल्याच त्याने आकांडतांडव सुरू केला. मारहाण, शिवीगाळ सुरू झाली. सविता जमेल तसा प्रतिकार करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यातच त्याने पलंगावर झोपलेल्या मुलीला जोरात खाली ढकललं आणि बडबड करतच तो झोपला.

“त्याने मुलीला हात लावला तेव्हाच मी घर सोडायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी तो घरातून बाहेर पडल्यावर लगेचच मी कपडे आणि आवश्यक सामान घेतलं आणि मुलीला घेऊन घर सोडलं. मी माझ्या बहिणीकडे गेली. सुरूवातीला तो मला शोधून काढेल का? याच भीतीत मी वावरत होते; पण काही दिवसानंतर मला जाणवलं की, आपण घरातून बाहेर पडून काहीतरी काम करायला हवं. घाबरून दुसऱ्याच्या जीवावर किती दिवस घरी बसणार?

मनाशी दृढ निश्चय करून मी बाहेर पडले. सुरुवातीला एका घरात घरकाम करू लागले. हळूहळू ओळख झाली आणि मला सहा घरांचं घरकाम मिळालं. मी पैसे साठवत होते. काही वर्षांनंतर मी आमच्यासाठी छोटी जागा देखील घेतली. या काळात मुलीने कधीही माझ्याकडे हट्ट-तक्रार केली नाही. ती मन लावून अभ्यास आणि मला कामात मदत करत होती. मला तिचं नेहमीच कौतुक आणि अभिमान वाटतो.”

आज २१व्या शतकात महिलांना संधींच आकाश उपलब्ध असताना, स्त्री-सक्षमीकरणासाठी असंख्य संस्था कार्यरत असताना देखील अनेक महिला ‘घरेलू हिंसा’ आणि अत्याचाराच्या शिकार बनत आहेत कारण एकच, त्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही ! मात्र, या निमित्ताने अशा सर्व ‘सोसणाऱ्या’ माता-भगिनींना सांगावसं वाटतं की, जोपर्यंत तुम्ही स्वत: तुमची मदत करत नाही, तोपर्यंत कोणीही तुमची मदत करणार नाही !

तेव्हा, तुमच्यावर आणि इतरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा. तुम्ही ‘तलवार’ आहात. म्यानात राहून ‘गंजू’ नका. तेजाने ‘तळपत’ रहा !


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया