Bhartiyans

Menu

ही ‘सखी’ झोपडपट्टीतल्या मुलींची सखी झाली, त्यांना नवा विश्वास देणारी जिवाभावाची मैत्रीण झाली !

Date : 01 May 2017

Total View : 450

मुलुंडच्या झोपडपट्टीतील आरती नाईकने 'सखी फाऊंडेशन'च्या माध्यामातून गेल्या आठ वर्षात जे कार्य केलं आहे ते पाहून ‘सखी’ शब्दाचा अर्थ ती वेगळ्या अर्थाने सार्थ करते आहे, असं नक्कीच वाटतं.


सारांश

मुलुंडच्या झोपडपट्टीतील आरती नाईकने 'सखी फाऊंडेशन'च्या माध्यामातून गेल्या आठ वर्षात केलेलं कार्य पाहून ‘सखी’ शब्दाचा अर्थ ती सार्थ करते आहे, असं नक्कीच वाटतं. दहावीत नापास झालेल्या आरतीने हार न मानता तीन वर्षे नकली दागिने तयार करून पैसे जमवले आणि पुन्हा शिक्षण घेतलं. ती मुक्त विद्यापिठातून पदवीधर झाली. आज तिच्या 'सखी फाऊंडेशन'मुळे अनेक मुलींना शिक्षणाचं आकाश नव्याने खुलं झालं आहे.सविस्तर बातमी

‘सखी’.... किती गोड शब्द आहे ना हा..! जिच्याशी कोणत्याही विषयावर बोलता येतं, जिच्यासमोर मनाचा एखादा गुपित कप्पाही अगदी सहज उलगडून दाखवता येतो, कोणत्याही परिस्थितीत जी मदतीला धावून येते, आपल्या चुकाही जी सहज पोटात घेऊ शकते आणि आपली चूक असेल तर अधिकाराने कानही धरू शकते अशी ती ‘सखी’ ! जिच्याशी जीवाभावाचं सख्यं आहे ती सखी !

सखी म्हणजे मैत्रीण. जवळच्या आणि जीवाभावाच्या मैत्रीणीचा सगळ्यांनाच आधार वाटत असतो. मुलुंडच्या झोपडपट्टीत राहणारी आरती नाईक ही ‘सखी’ या शब्दाचा एवढा सगळा अर्थ प्रत्यक्षात खरा करून दाखवते आहे. ती ‘सखी’च्या माध्यमातून ‘सखी’ला वेगळा अर्थ देते आहे ! काय म्हणता? कळालं नाही? मग मुंबईच्या आरती नाईकची आणि तिच्या ‘सखी’ची ही अनोखी कहाणी वाचाच !

मुलुंडच्या झोपडपट्टीतील आरती नाईकने 'सखी फाऊंडेशन'च्या माध्यामातून गेल्या आठ वर्षात केलेलं कार्य पाहून ‘सखी’ शब्दाचा अर्थ ती ‘सार्थ’ करते आहे, असं नक्कीच वाटतं.

घरची हलाखीची परिस्थिती, मार्गदर्शनाचा अभाव आणि सुमारे दर्जाचे शिक्षण यामुळे आरती दहावीत नापास झाली. पुढे परिस्थितीअभावी तिला शिक्षण सोडावं लागलं. शालेय शिक्षणाचं दार आरतीसाठी बंद झालं असलं तरी तिच्या आकांक्षांचं आकाश मात्र तिला खुणावत होतंच. तिथली दारं तिच्यासाठी सदैव उघडीच होती.

आरतीने घरबसल्या महिलांचे लहानलहान नकली दागिने बनवण्यास सुरुवात केली. त्याचे तिला दिवसाला ९ रुपये मिळायचे. एवढ्या तुटपुंज्या कमाईतून ती घरच्यांना मदतही करायची आणि बचतसुद्धा करायची. अशी तिने तीन वर्षे काढली आणि नंतर बचतीच्या पैशातून पुन्हा शाळेत प्रवेश मिळवला. जिद्दीने ती दहावी उत्तीर्ण झालीच, शिवाय पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून 'समाजशास्त्र' विषयाची पदवी घेऊन पदवीधार झाली. 

या काळात आरतीच्या डोक्यात एक विचार सतत सुरू असायचा, की तिला शिकण्यासाठी ज्या अग्निदिव्यातून जावं लागलं तशाच संकटांतून झोपडपट्टीतील अनेक मुलींनाही जावं लागतं. परिस्थितीमुळे अनेकांचं शिक्षण थांबतं. त्यांच्यासाठी काहीतरी करावं या जाणिवेतून २००८ मध्ये तिने 'सखी फाऊंडेशन'ची स्थापना केली. झोपडपट्टीतील मुलींचं शिक्षण अधिक सुकर आणि सहज व्हावं या उद्देशाने ‘सखी’चं काम सुरू आहे.

'स्त्रियांना सक्षम करायचं असेल तर तिच्याशी तुमचा संपर्क ती तुम्हाला स्वयंपाकघरापर्यंत नेईल इतका जिव्हाळ्याचा हवा.' हा राष्ट्रसेविका समितीच्या आद्य संचालिका लक्ष्मीबाई केळकरांचा विचार आरतीने आचरणात आणला. झोपडपट्टीतल्या घरोघरी जाऊन स्त्रियांना शिक्षण, रोजगार आणि या माध्यमातून त्यांचं सक्षमीकरण किती गरजेचं आहे, हे आरती समजावून सांगू लागली.

सुरुवातीला केवळ सहा मुलींना सोबत घेऊन तिने 'सखी'चा अभ्यासवर्ग सुरु केला. नंतर तिच्या अभ्यासवर्गाची महती पसरत गेली आणि २३ मुली या उपक्रमात सहभागी झाल्या. या अभ्यासवर्गात आरती भाषाभ्यासावर भर देते आहे. महाविद्यालयीन आणि एकूणच उच्च शिक्षणासाठी तुमची मूळ भाषा पक्की असायला हवी, हा अनुभव तिला स्वत:ला आला. यामुळेच तिने त्या मुलींना गरजेच्या प्रमुख भाषा शिकवायला सुरुवात केली.

कॉर्पोरेट क्षेत्रात हमखास वापरलं जाणारं 'आऊट सोर्सिंग’चं तंत्र आरतीनेही तिच्या कामात वापरलं. त्यामुळे आजुबाजूच्या सुशिक्षित महिलांपैकी अनेकजणी तिला मदत करू लागल्या. झोपडपट्टीतल्या मुलींना शिकवू लागल्या. आरती एवढ्यावरच थांबली नाही, तर या मुलींच्या आयांना रोजगार मिळावा, यासाठी देखील तिचे प्रयत्न सुरू आहेत. सलग पाच वर्षे असं काम केल्यावर आरतीची मेहनत फळाला आली आणि २०१३ मध्ये 'सखी'ला इंटरनॅशनल ग्रॅन्टकडून जागेसाठी मदत मिळाली.

आरतीचा आशावाद खरोखरच कौतुकास्पद आहे. ती म्हणते, 'माझ्या झोपडपट्टीत जरी मी एकटीच असले तरी येथूनच तयार होणाऱ्या मुली हे स्त्रीशिक्षणाचं कार्य पुढे अनेक ठिकाणी करतील आणि वाढवतील असा मला विश्वास वाटतो.’ आरती तिचं काम जबरदस्त इच्छाशक्तीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने करते आहे. तिचं कार्य आणि ध्येयासक्ती पाहून सुरेश भटांच्या ओळी आठवतात, की-

असे दिले शब्द शृंखलांनी, असे दिले त्वेष दुखितांनी

दुभंग मी झाले, तरी अभंग माझे इमान होते.

म्हणू नका आसवांत माझे, केव्हाच स्वप्न सोडून गेले,

उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते!

श्रुती आगाशे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

स्वयं-मुलाखत