Bhartiyans

Menu

रेल्वे स्थानकावर भटकणाऱ्या मुलांचंही आयुष्य असतंच हो, गरज आहे, त्यांच्याकडे ‘गुन्हेगार’ नाही तर माणूस म्हणून बघण्याची !

Date : 04 May 2017

Total View : 512

आपल्या कामाची ‘चौकट’ मोडून रेल्वे पोलिस दला (आरपीएफ)च्या उप-निरीक्षक रेखा मिश्रा या ‘कर्तव्या’वर असतानाच घरातून पळून आलेल्या मुलांना मदत करतायेत. ४३४ मुलांना मिश्रा यांनी स्वत: मदत केली आहे.


सारांश

आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत कित्येक लोक येतात. त्यातील अनेक यशस्वी होतात. मात्र, वाईट मार्गाला लागलेल्यांची संख्याही खूप आहे. दुर्दैवाने, यात लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे. घर सोडून आलेल्या या मुलांच्या आयुष्याची अनेकदा राखरांगोळी होते. रेल्वे पोलिस दला (आरपीएफ)च्या उप-निरीक्षक रेखा मिश्रा या अशा घरातून पळून आलेल्या मुलांना मदत करतायेत. ४३४ मुलांना मिश्रा यांनी स्वत: मदत केली आहे.सविस्तर बातमी

मुंबई... असंख्य प्रकारच्या माणसांना आपल्या पोटात सामावून घेणारी मायानगरी ! रस्त्यावरच्या माणसाला रातोरात ‘स्टार’ करणारी चंदेरीनगरी ! परगावातील आणि परराज्यातील असंख्य तरुणांना व्यवसाय-नोकरी मिळवून देणारी उद्योगनगरी !

आजही या मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी कित्येक लोक येतात. त्यातील अनेक यशस्वी होतात. मात्र, वाईट मार्गाला लागलेल्यांची संख्या देखील खूप आहे. दुर्दैवाने, यात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. कळत्या-नकळत्या वयात आई-वडिलांशी भांडून, संतापात घर सोडून आलेली मुलं, आपलं गाव सोडून कामासाठी आलेली अनाथ मुलं, मालिका-चित्रपटांमध्ये ‘हिरो’-‘हिरोईन’ होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेले मुलं-मुली या सगळ्यांनाच सूर गवासतो असं नाही. यांच्यापैकी काही यशस्वी होतात तर काहींच्या आयुष्याची राखरांगोळी होते!

पोलिसांचे दंडुके.... भीक मागणं... कीव-सहानुभूती यापलीकडे या मुलांच्या आयुष्यात काहीही उरत नाही. मात्र, एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने हे चित्र बदलवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कामाची ‘चौकट’ मोडून ही महिला पोलिस अशा मुलांना मदत करते आहे.

रेल्वे पोलिस दल(आरपीएफ)च्या उप-निरीक्षक रेखा मिश्रा या ‘कर्तव्या’वर असतानाच घरातून पळून आलेल्या अशा मुलांना मदत करतायेत.

गेल्या वर्षी रेल्वे पोलिसांनी अशा प्रकारच्या सुमारे १,१५० मुलांना पकडलं होतं. त्यांपैकी ४३४ मुलांना मिश्रा यांनी स्वत: मदत केली आहे. अलाहाबादच्या रेखा मिश्रा यांनी देशसेवेचे धडे आपल्या घरातच गिरवले. त्यांचे वडील निवृत्त सैनिक आहेत आणि दोघं भाऊसुद्धा भारतीय लष्करात आहेत. त्यामुळे देशसेवा त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. घर सोडून पळून आलेल्या मुलांना हाताळण्याच्या त्यांच्या कौशल्यासाठी मिश्रा प्रसिद्ध आहेत.

‘भांडण’ हे बहुतांश मुलांच्या घर सोडण्यामागचं कारण असतं. अशी मुलं घरची माहिती, पत्ता काहीही देत नाहीत. त्यामुळे या मुलांपैकी पुन्हा घरी जाणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. मिश्रा यांनी मदत केलेल्या ४३४ मुलांपैकी केवळ २८ मुलं पुन्हा घरी गेली आहेत. जी मुलं घराची माहिती देत नाही, ज्यांना कोणीच घ्यायला येत नाही, अशा मुलांची रवानगी नाईलाजाने बाल सुधारगृहात केली जाते.

या वर्षी पहिल्या तीन महिन्यातच रेखा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अशी १६२ मुले सापडली. त्यांची माहिती काढण्याचं काम सध्या सुरू आहे. नियमित काम सांभाळून हे सर्व करताना रेखा यांना दिवसाचे १२-१४ तास काम सहज करावं लागतं. मात्र, उत्साहाने आणि काळजीने त्या हे सर्व करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीची झोप कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून शांत लागण्यासाठी त्या हे करतात.

एक प्रसंग या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. गेल्या वर्षी चेन्नई एक्स्प्रेसमधून तीन शाळकरी मुलींना उतरताना मिश्रा यांनी पाहीलं. शाळेच्या गणवेशातच त्या मुली होत्या. मिश्रा यांना जरा संशय आला, म्हणून त्यांनी मुलींची चौकशी केली. त्या मुलींना मिश्रा यांची भाषाही कळत नव्हतं. त्या तामिळमध्ये बोलत होत्या. शेवटी, एका तामिळ समजणाऱ्या अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं. त्याने त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आलं, की त्या मुली चित्रपटात काम करण्यासाठी घरातून पळून आल्या होत्या.

मिश्रा यांनी मुलींना विश्वासात घेतलं. त्यांचं नाव-गाव, पत्ता ही माहिती खुबीने काढून घेतली. रात्रभर त्या स्वत: मुलींसोबत पोलिस ठाण्यातच बसून होत्या. त्यांनी मुलींची समजूत काढली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पाठवलं. अशी अनेक उदाहरणं मिश्रा यांच्या बाबतीत देता येतील.    

रेखा मिश्रा म्हणतात, “मुलं गुन्हेगार नसतात. त्यांना पोलिस कोठडीत डांबायचं नसतं, तसंच रेल्वे स्थानकावर एकटं सोडून ‘मोकळं’ पण व्हायचं नसतं. ते परिस्थितीला बळी पडलेले असतात. त्यांना विश्वास देऊन, समजून घेऊन कौशल्याने हाताळायचं असतं.”

दिशा हरवलेल्या, मार्ग चुकलेल्या माणसांना पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्याचं काम दुसरा माणूसच करू शकतो. रेखा मिश्रा यांनी हेच आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.     

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया