Bhartiyans

Menu

पडद्यावरचा खोटाखोटा नाही, हा आहे खराखुरा ‘दबंग’ ! आयपीस शिवदीप लांडे देतात पगारातली ६० टक्के रक्कम सामाजिक कार्याला..

Date : 05 May 2017

Total View : 782

बिहारमधील पाटण्याचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे त्यांच्या पगारातील ६० ते ७० टक्के रक्कम ‘युवक संघटना’ या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेला देतात. या माध्यमातून गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम राबवले जातात.


सारांश

सरकारी नोकरी..सोयीसुविधा...चांगला पगार...मानसन्मान हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. हे स्वप्न आयपीएस शिवदीप लांडे यांनीही पाहीलं; पूर्ण देखील केलं. पण सुखाचे दिवस आल्यावर ते कष्टांना विसरले नाहीत. त्यांनी २००४ साली ‘युवक संघटना’ ही संस्था गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. लांडे त्यांच्या पगारातील ६० ते ७० टक्के रक्कम या संस्थेला देतात आणि त्या पैशातून विविध उपक्रम राबवले जातात.सविस्तर बातमी

उंचपुरा-धिप्पाड... आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेने चेहऱ्यावर आलेलं तेज... व्यायाम करून कमवलेली मजबूत बांध्याची शरीरयष्टी असा ‘तो’ जेव्हा ‘वर्दी’ घालून आणि डोळ्यांवर त्याचा आवडता काळा गॉगल लावून ‘स्टाईल’मध्ये येतो, तेव्हा गुंडांचा थरकाप उडतो... नागरिकांना आधार वाटतो आणि हो, अनेक तरुणींच्या काळजाचा ठोका देखील चुकतो !

तो पडद्यावर पोलिसाची भूमिका करणारा खोटाखोटा हिरो नाहीये; तो आहे खराखुरा, वास्तवातला, दुष्टांचे निर्दालन करणारा ‘दबंग’ आणि सज्जनांचे रक्षण करणारा ‘सिंघम’सुद्धा..! या खऱ्याखुऱ्या हिरोचं नाव आहे आयपीएस अधिकारी शिवदीप वामन लांडे !

बिहारमधील पाटणा येथे कार्यरत असलेले शिवदीप लांडे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. नागरिकांप्रती सदैव असलेली तत्परता, दक्षता, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता आणि समाजकंटकांविरोधात केलेल्या धडक कारवाया यामुळे ते पाटणावासियांचे आवडते पोलीस अधिकारी झाले आहेत. पाटणा शहर त्यांच्या बुद्धिमान आणि पोलादी नेतृत्वाखाली सुखाची झोप घेतं आहे.

आज आयपीएस अधिकारी झाल्याने सुखसुविधांनी परिपूर्ण जीवन जगत असलेले लांडे यांचा भूतकाळ मात्र हलाखीचा आहे. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. वडील शेती करायचे. लांडे यांची शाळा घरापासून चार किलोमीटर अंतरावर होती. रोज एवढं अंतर ते चालत जायचे. अशाही परिस्थितीत अभ्यास आणि प्रचंड मेहनत करून ते इलेक्ट्रिकल इंजिनीअर झाले. खरं तर, इंजिनीअर म्हणून नोकरी करून सुखासीन आयुष्य ते जगू शकत होते. मात्र, उरातली देशसेवेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. तिथे देखील सुरुवातीला भारतीय महसूल सेवे (आयआरएस)ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. कार्यालयात बसून काम करत, कोणताही धोका आणि धावपळ नसलेलं जीवन ते आरामात जगू शकले असते; पण... पण त्यांनी तेही नाकारलं आणि पुन्हा प्रयत्न करून ते आयपीएस अधिकारी झाले !

सरकारी नोकरी...सोयीसुविधा...चांगला पगार...मानसन्मान हे जवळपास प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. हे स्वप्न लांडे यांनीही पाहीलं, नव्हे नव्हे पूर्ण देखील केलं; पण ते त्यात अडकून पडले नाहीत. सुखाचे दिवस आल्यावर ते कष्टांना विसरले नाहीत. आपल्यासारख्याच अडचणी परिस्थिती नसलेल्या अनेकांना येत असतील, त्यांना आपण मदत करायला हवी; या भावनेतून आयआरएस झाल्यावर शिवदीप यांनी २००४ साली ‘युवक संघटना’ नावाची संस्था स्थापन केली.

गरीब विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस घेणं, मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं, गरीब मुलामुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचं आयोजन करणं, असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत केले जातात. महत्त्वाचं म्हणजे, लांडे त्यांच्या पगारातून ६० ते ७० टक्के रक्कम या संस्थेला देत असतात आणि त्या पैशातून विविध उपक्रम घेतले जातात. यासाठी लांडे यांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे !

पाटणा शहरातील प्रत्येकाला शिवदीप यांच्याविषयी आदर आणि कौतुक आहे. त्यांनी पाटणावासियांसाठी केलेल्या कार्यामुळेच आज त्यांना हा मानसन्मान मिळतो आहे. शहरातील तरूण मुली, महिला यांना शिवदीप यांचा आधार वाटतो. त्यांनी स्वत:चा मोबाईल नंबर महिलांना दिला असून कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे. ते वेळात वेळ काढून नागरिकांच्या मेसेजला उत्तर देत असतात आणि त्यांच्या समस्या सोडवत असतात. ‘तुम्हाला फोन करून त्रास देणाऱ्या व्यक्तींचे ‘कॉल्स’ माझ्या नंबरवर डायव्हर्ट करा’, असा कानमंत्र त्यांनी तरूण मुलींना दिला आहे. यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक आणि रोडरोमिओ यांना चांगलाच वचक बसला आहे.

पाटणाजवळील रोहतस येथे अवैध खाणकाम सुरू होतं. खाणमाफिया दिवसेंदिवस मस्तवाल होत होते. एक दिवस लांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी छापा टाकला. खाणमाफिया सावध झाल्याने त्यांनी प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली. गोळीबारहीसुरू झाला. माफियांनी तेथील लहान मुलं आणि स्त्रियांची ढाल केली आणि त्यांच्या आड लपून ते दगडफेक करू लागले. तेवढ्यात, लांडे यांनी प्रसंगावधान राखून तेथील जेसीबीचा ताबा घेतला. त्यांनी माफियांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि खाणकाम बंद पाडलं.

अशा अनेक कारवायांमुळे ते पाटणावासियांमध्ये इतके प्रसिद्ध झाले, की जेव्हा त्यांची बदली अरारीआ येथे केल्याचा आदेश सरकारकडून आला, तेव्हा नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं. बदली रद्द करण्याची मागणी केली आणि सरकारला त्यांची बदली रद्द करण्यास भाग पाडलं.

शिवदीप लांडे यांच्यासारखे जिगरबाज, प्रामाणिक आणि सदैव नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निर्माण झाले, तर या सुजलाम-सुफलाम भारतवर्षाकडे नजर वाकडी करून पाहण्याची हिंमत कोणाचीच होणार नाही !       

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

स्कूपव्हूप