Bhartiyans

Menu

फोटोची फ्रेम डोळ्यांत नाही; मनात तयार होत असते ! ती ‘क्लिक’ करण्यासाठी डोळे असलेच पाहिजेत, असं नाही.

Date : 09 May 2017

Total View : 1553

मुंबईच्या भावेश पटेल या अंध फोटोग्राफरने अभिनेत्री कतरीना कैफचं एका जाहिरातीसाठी फोटोशूट करून डोळे असणाऱ्या सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घातलं आहे. आज तो सुप्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून काम करतो आहे.


सारांश

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही ‘बेसिक’ गोष्टी असणं गरजेचं असतं. धावपटू होण्यासाठी सुदृढ पाय असायला हवे. मुष्टियोद्धा होण्यासाठी मजबूत हात असायला हवे. अगदी तसंच फोटोग्राफर होण्यासाठी दृष्टि असायला हावी. आपली ही भाबडी समजूत मुंबईच्या दृष्टिहीन भावेश पटेलने खोटी ठरवली आहे. भावेश या अंध फोटोग्राफरने अभिनेत्री कतरीना कैफचं एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं. आज तो यशस्वी फोटोग्राफर म्हणून काम करतो आहे.सविस्तर बातमी

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही मुलभूत, ‘बेसिक’ गोष्टी असणं गरजेचं असतं. जसं की, धावपटू होण्यासाठी तुमच्या पायांत ताकद असायला हवी; अधिकच स्पष्ट सांगायचं तर तुम्हाला सुदृढ पाय असायला हवे. मुष्टियोद्धा होण्यासाठी मजबूत हात असायला हवे. अगदी तसंच तुम्हाला फोटोग्राफर व्हायचं असेल, तर तुमच्याकडे असायली हवी दृष्टि! फोटोग्राफरची नजर विकसित करता येईल; पण त्यासाठी मुळात दृष्टि असायला हवी ना!

आपली ही ‘भाबडी समजूत मुंबईच्या भावेश पटेलने खोटी ठरवली आहे. भावेश या अंध फोटोग्राफरने सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफचं एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं. आज तो यशस्वी फोटोग्राफर म्हणून काम करतो आहे.

चलो, फिर आज मिलते हैं इस ‘नजरियों’ को, बदल देनेवाली ‘नजर’ रखनेवाले बंदेको !  

मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला भावेश पटेल हा मूळचा मुंबईचाच. आज यशस्वी फोटोग्राफर, असं नाव-लौकिक कमावलेला भावेश जन्मतःच दृष्टिदोष घेऊन जन्माला आला. त्याची फोटोग्राफी पाहिल्यावर हे कोणाला सांगूनही पटणार नाही. दृष्टिदोष असल्याने येणाऱ्या असंख्य अडचणींवर त्याने जिद्दीने मात केली. प्रयत्नाने आणि कष्टाने प्रत्येक समस्येतून तो मार्ग काढत गेला आणि याचा परिणाम म्हणजेच भावेशचं आजचं बोलकं आणि अनेकांना प्रेरणा देणारं यश!

आपल्या प्रवासाविषयी भावेश सांगतो, “मी शाळेत असताना एखादा ‘क्षण’ कॅमेऱ्यात कैद करणं किंवा त्याची फ्रेम मनात तयार करणं या संकल्पनांची माहिती नसताना देखील नकळत त्यांचे संस्कार माझ्या मनावर होत होते. माझा भाऊ मला बागेत घेऊन जायचा आणि तेथील दृश्याचं वर्णन करायचा. त्याने केलेल्या वर्णनानुसार मी चित्र काढावं, असा त्याचा आग्रह असायचा. त्याने मला चित्रकलेचं साहित्य देखील आणून दिलं होतं, तेही माझा विरोध न जुमानता. पुढे झेवियर महाविद्यालयात गेल्यावर मी पार्थो सरांना भेटलो आणि नकळतच त्यांच्याशी कायमचा जोडला गेलो. अंध मुलांना फोटोग्राफी शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार वर्षांपूर्वी झेवियरमध्येच झालेल्या एका कार्यशाळेतही माझा सहभाग होता.”

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक संधी, एक क्षण, एक टप्पा नक्की असा येतो, की तो त्या माणसाचं आयुष्य उजळवून टाकतो. आयुष्याला कलाटणी देतो. गरज असते ती फक्त तो क्षण, ती संधी ओळखून त्या संधीचं सोनं करण्याची. भावेशच्या आयुष्यात हा क्षण २०१४ ला आला आणि या हाडाच्या फोटोग्राफरने तो क्षण आपल्या कष्टाच्या आणि कल्पकतेच्या कॅमेऱ्यात कैद करून ‘चिरंजीव’ केला.

एका मोठ्या जाहिरातीसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफचं फोटो शूट करण्याची संधी भावेशला मिळाली आणि त्याने प्रचंड आत्मविश्वासाने, मेहनतीने अप्रतिम काम करून त्या संधीचं सोनं केलं. यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

भावेश त्याच्या अनुभवाबद्दल सांगतो, की फोटो शूट सुरु होण्याआधी कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो; पण काम सुरू झालं आणि मी अगदी सहज ‘क्लिक’ करत गेलो. विशिष्ट फ्रेममध्येच फोटो काढायचं बंधन नसल्याने मी मुक्तपणे काम करत होतो. यंत्रांचे आवाज आणि कतरिनाने परिधान केलेल्या कपड्यांच्या सळसळीवरून अंदाज घेत मी तिच्या हालचाली टिपत गेलो आणि काही सुंदर फोटो तयार झाले.’

मुंबईतील एका सॉंफ्टवेअर कंपनीत काम करणारा भावेश पुढे सांगतो, की मला फोटोग्राफी आवडते. हे मला आव्हान वाटतं. कारण मुळात ज्या क्षेत्राची पहिली गरज, नव्हे अटच दृष्टि असेल, ते काम एखादा दृष्टिहीन माणूस करू शकेल, असं कोणालाच वाटत नाही. कतरिना कैफच्या जाहिरातीचे दिग्दर्शक सुनील सिप्पी यांनी दिलेली दाद मला आतापर्यंत मिळालेली सर्वात मोठी दाद आहे. ते म्हणाले होते, ‘तू काढलेले फोटो हे कोणत्याही डोळस फोटोग्राफरपेक्षा खूप जास्त सुंदर आहेत.’

आज यशस्वी फोटोग्राफर म्हणून वावरताना या क्षेत्रातील ताज्या दमाच्या तरूणांना भावेश सल्ला देतो, की मी फोटोग्राफीकडे एक कला म्हणून बघतो आणि ती कला मी अजून आत्मसात करतो आहे. मी शिकतो आहे. व्यावसायिकदृष्ट्या या क्षेत्रात खूप स्तर आहेत. फोटोग्राफी ही संकल्पनाच मुळातच खूप मोठी आहे. खरं दृश्य आणि आरशातील प्रतिबिंब यातील फरक जगाला दाखवण, हेच खऱ्या फोटोग्राफरचं काम आहे. अंध फोटोग्राफरबद्दल बोलायचं तर, त्यांना सहानुभूती दाखवण्यापेक्षा त्यांची सहवेदना लोकांनी समजून घ्यावी. त्यामुळे त्यांना ते करताहेत त्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची कला अधिक फुलेल.’

‘ब्लाईंड विथ कॅमेरा असोसिएशन’चे भौमिक यांनी अंध फोटोग्राफर्ससाठी सुरू केलेल्या या संस्थेमुळे भावेशसारख्या अनेक अंध मुलांना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. भावेश त्यांच्याविषयी सांगतो, “याचं श्रेय भौमिक यांना जातं. त्यांनी व्यवसायाला आवड बनवलं. जगात खूप अंध लोक आहेत, जे पुढे येऊन नवे प्रयोग करायला घाबरतात. अशा सर्वांनी पुढे यावं, आपल्या मनात येणाऱ्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी ते प्रोत्साहन देत असतात.”  

भावेशचं काम अफाट आणि अचाट आहे. सकारात्मक विचार आणि ऊर्जेने तो अक्षरशः भारलेला आहे. त्याचे विचार नेहमीच इतरांना प्रेरणा देतात. तो म्हणतो, “एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे की वाईट, ती तुम्हाला जमते की नाही, हे कळण्यासाठी आधी ती करून पाहायला हवी ना? जर माझ्यासारखा दृष्टिहीन फोटो काढू शकतो तर दृष्टी असणारा माणूस त्याला हवं ते काम नक्कीच अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. ‘अंधत्व’ ही जरी माझ्यातली उणीव असली तरी ती फक्त माझ्यासाठी आहे. माझ्याकडे बघणाऱ्यांसाठी मात्र ती प्रेरणा आहे.”

आपल्यातली उणीव ही इतरांसाठी प्रेरणा ठरते आहे. सकारात्मक ‘दृष्टी’ आणि एका वेगळ्या अर्थाने ‘डोळस’ असलेला भावेश आज अनेकांसाठी दीपस्तंभ ठरतो आहे.


Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

गौरी भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बे साईड जर्नल