Bhartiyans

Menu

सर्पदंश झालेला माणूस कशाने मरतो माहितीये? विषाने? नाही ! अनेकदा तो मरतो भीतीने किंवा हलगर्जीपणाने !

Date : 11 May 2017

Total View : 367

हिमाचल प्रदेशचे डॉ. ओमेशकुमार भारती आणि त्यांच्या टीमने सर्पदंश झालेल्या रुग्णाला ज्या रुग्णवाहिकेतून नेलं जातं, त्या रुग्णवाहिकेसाठी अत्याधुनिक यंत्रणा तयार केली आहे. यामुळे तब्बल ४६९ रुग्णांचे प्राण वाचले आहेत.


सारांश

हिमाचल प्रदेशचे डॉ. ओमेशकुमार भारती यांनी सर्पदंश झालेल्या रुग्णाला ज्या रुग्णवाहिकेतून नेलं जातं, त्या रुग्णवाहिकेसाठी अत्याधुनिक यंत्रणा तयार केली आहे. १०८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली जाते. सर्पदंश झाल्यापासून रूग्णालयात पोहोचेपर्यंतच्या काळात ही रुग्णवाहिका जीवनदात्याची भूमिका बजावते. यामुळे तब्बल ४६९ रुग्णांचे प्राण वाचले आहेत. या संकल्पनेची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली आहे.सविस्तर बातमी

तुम्हाला माहितीये, सर्पदंश झालेली व्यक्ती वाचू शकते? हो, सर्पदंशावर तातडीने आणि योग्य ते वैद्यकीय उपचार केल्यास सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. दुर्दैवाने, सर्पदंश झाल्याची भीती, चुकीचे उपचार आणि अंधश्रद्धेतून आलेले तोडगे हे करण्याताच खूप वेळ जातो आणि अनेकदा त्यामुळेच रुग्ण दगावतो!

भारतात सापाच्या सुमारे ३०० विविध जाती आढळतात. यांपैकी ६२ जाती या विषारी आणि  निम-विषारी वर्गात मोडतात. चिंतेची बाब अशी, की दरवर्षी आपल्या देशात सर्पदंशाने मरण झालेल्यांची संख्या ही तब्बल ५०,००० आहे. यांपैकी अनेक जणांचे जीव वाचू शकतात. गरज आहे ती फक्त त्यांना वेळेत रूग्णालयात नेण्याची...!

हिमाचल प्रदेशचे डॉ. ओमेशकुमार भारती आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हीच मेख ओळखली. त्यांनी सर्पदंश झालेल्या रुग्णाला रूग्णालयात ज्या रुग्णवाहिकेतून नेलं जातं, त्या रुग्णवाहिकेसाठीच अशी यंत्रणा तयार केली, की ज्यामुळे रुग्णाला अधिक वेळ मिळेल आणि त्याचे प्राण वाचतील.

डॉ. भारती यांनी अभ्यास केला, की रुग्णाला तातडीने सर्पदंशविरोधी वैद्यकीय यंत्रणा असलेल्या रुग्णवाहिकेतून रूग्णालयात नेलं तर त्याचा किती फायदा होतो? आणि त्यांच्या लक्षात आलं, की यामुळे एक-दोन नाही तर एका विशिष्ट कालावधीत ४६९ रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

नागरिकांनी १०८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली जाते. सर्पदंश झाल्यापासून ते रूग्णालयात पोहोचेपर्यंतचा जो ‘गोल्डन पिरीएड’ आहे, त्या काळात ही रुग्णवाहिका जणू जीवनदात्याची भूमिका बजावते. या रुग्णवाहिकेत सर्पदंश झाल्यावर रुग्णाला देण्यासाठीची औषधे, इंजेक्शन आणि इतर उपचार यंत्रणा देखील असतात. त्यामुळे रुग्णावर प्राथमिक उपचार लगेचच सुरू होतात.

डॉ. भारती यांच्या ‘सर्पदंशविरोधी यंत्रणा असलेल्या रुग्णवाहिके’च्या संकल्पनेचा केवळ हिमाचल प्रदेशानेच नाही तर देशाच्या १५ राज्यांनी आणि २ केंद्रशासित प्रदेशांनी देखील गौरव केला असून लवकरच ही संकल्पना तिथेही राबवण्यात येणार आहे. भारतातील ज्या ग्रामीण भागात सापांचा वावर अधिक असून सर्पदंश होण्याचे प्रमाणही जास्त आहे, अशा ठिकाणी ही रुग्णवाहिका वरदान ठरते आहे.

एवढंच नाही, तर याच संकल्पनेची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील घेतली असून त्यांनी या संकल्पनेचा समावेश त्यांच्या ‘सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी’ या अहवालात केला आहे. त्यामुळे डॉ. भारती यांची ही संकल्पना आता विविध देशातही राबवली जाण्याची शक्यता आहे.

अतिशय थंड हवामान आणि घनदाट जंगल यामुळे हिमाचल प्रदेशात विविध प्रकारचे साप मोठ्या प्रमाणावर आढळतात. परिणामी, तिथे सर्पदंश होणं ही नित्याची बाब आहे. त्यामुळे अशा ठिकाणी डॉ. भारती यांच्या या रुग्णवाहिकेचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

मैत्रांनो, आपल्या देशात आजही काही ठिकाणी अंधश्रद्धेची मुळ खोलवर रुजली आहेत, आजही ग्रामीण भागातील लोकांचा डॉक्टरांपेक्षा भोंदू बाबांवर विश्वास आहे, आजही अनेक ठिकाणी सर्पदंशावरील सहज उपलब्ध होत नाहीत व विक्रेते देखील चढ्या भावात ही औषधे विकतात आणि आजही अनेक ठिकाणी केवळ हलगर्जीपणा किंवा चुकीच्या उपचारांमुळे सर्पदंश झालेल्या व्यक्ती दगावतात. अशा वातावरणात डॉ. भारती यांची ही अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असलेली रुग्णवाहिका आशेचा किरण ठरते आहे, हे नक्की..!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया