Bhartiyans

Menu

वेळ सांगून येत नाही, अपघात वर्दी देऊन होत नाही हेल्मेट पुणे, सुरक्षित पुणे !

Date : 12 May 2017

Total View : 724

गझलकार प्रदीप निफाडकर यांनी स्वत:ची मुलगी अपघाती जाण्याचं दु:ख अनुभवलं. हेल्मेट नसल्याने तिला जीव गमवावा लागला. असं दु:ख कोणाच्याच वाटेला येऊ नये यासाठी त्यांनी ‘हेल्मेट पुणे’ संस्था सुरू केली.


सारांश

‘हेल्मेटसक्ती’ या विषयाची गंभीरता ज्याने आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अपघाती मृत्युचं दु:ख सोसलं आहे, त्याच्यापेक्षा अधिक कोणाला असेल? पुण्यातील ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी स्वत:ची तरुण मुलगी अपघाती जाण्याचं दु:ख अनुभवलं; मोठ्या कष्टाने ते पचवलं. मात्र, तिथेच न थांबता कोणाच्याही आयुष्यात अशी अप्रिय घटना घडू नये यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल मांद्रुपकरांच्या साथीने ‘हेल्मेट पुणे’ नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली.सविस्तर बातमी

‘हेल्मेटसक्ती’.... प्रचंड गाजलेला, बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्याशी निगडित असलेला विषय ! हेल्मेटचं महत्त्व, त्याची उपयुक्तता पटवून देण्यासाठी सतत विविध कार्यक्रम होत असतात. नागरिकांनी हेल्मेट वापरावं यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. मध्यंतरी ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही’ अशी घोषणा देखील राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. एकूणच, हेल्मेट ही आपल्याच फायद्याची आणि जीवाला जपणारी वस्तू आहे, हे पटवून देण्यासाठी जनजागृतीपासून कारवाईपर्यंतचे मार्ग अवलंबावे लागत आहेत. यापेक्षा मोठा विरोधाभास आणि विनोद तो कोणता?

या विषयाची गंभीरता ज्याने आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अपघाती मृत्युचं दु:ख सोसलं आहे, त्याच्यापेक्षा अधिक कोणाला असेल बरं? पुण्यात राहणारे ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी हे दु:ख जवळून अनुभवलं. स्वत:ची तरुण मुलगी अपघाती जाण्याचं दु:ख निफाडकरांनी अनुभवलं; मोठ्या कष्टाने ते पचवलं. मात्र, ते तेवढ्यावरच थांबले नाहीत; तर सामाजिक कार्यकर्ते अनिल मांद्रुपकर यांच्या साथीने त्यांनी हेल्मेट जागृतीची मोहिम हाती घेतली.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातल्या एका सकाळी ती दु:खद घटना घडली. निफाडकर यांची मुलगी, कथक नृत्यांगना प्रांजली एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होती. तेव्हा राजाराम पुलाजवळ एका सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीने तिला उडवलं. प्रांजली रस्त्यावर फेकली गेली आणि तिचं डोकं एका टोकदार दगडावर आपटलं. ती गंभीर जखमी झाली. तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र, वेळ हातातून निघून गेली होती. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. आपल्या अवघ्या १८ महिन्यांच्या मुलाला मागे टाकून प्रांजली हे जग सोडून गेली. या सर्व अप्रिय घटनेचं कारण ठरलं हेल्मेट! ‘त्या’ दिवशी प्रांजलीने हेल्मेट घातलेलं नव्हतं.

काळाच्या या आघातातून प्रदीप निफाडकरांनी स्वत:ला सावरलं आणि पुन्हा कोणाच्याही आयुष्यात अशी घटना घडू नये म्हणून त्यांनी मांद्रुपकराच्या साथीने ‘हेल्मेट पुणे’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या माध्यमातून ते नागरिकांनी हेल्मेट वापरावं यासाठी जागृती करत आहेत.

‘हेल्मेट पुणे’ची स्थापना १ जानेवारी २०१७ला झाली. या संस्थेद्वारे मेळावे, प्रदर्शनं भरवली जातात. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन माहिती दिली जाते. सिग्नल्सवर पत्रकं वाटली जातात. लग्न-समारंभात जाऊन लोकांना, विशेषतः तरुणांना हेल्मेट वापरण्याचं महत्त्व पटवून दिलं जातं. शहरातील इतर सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना अपघातात गमावलं आहे, अशा लोकांची मदत या उपक्रमासाठी घेण्याचे प्रयत्न ही संस्था करते आहे.

या उपक्रमाविषयी निफाडकर सांगतात, ”शहर पोलिसांनी हेल्मेटसक्तीची मोहीम सुरू केली होती; पण त्यात फारसं यश आलं नाही. शिवाय शहरातील एकही सामाजिक संस्था यासाठी काम करत नसल्याचं लक्षात आलं. पुण्यातील वाढती रहदारी बघता हेल्मेट वापरणं अत्यावश्यक नव्हे अनिवार्य आहे. हेल्मेट न वापरल्याने होणाऱ्या अपघाती मृत्यूची संख्या बघता हेल्मेट वापरलंच पाहिजे आणि हेल्मेटमुळे केस गळतात हे गैरसमज आहेत.”

प्रांजलीच्या मृत्युनंतर सांत्वन करायला येणाऱ्या लोकांना निफाडकर सांगत होते, की ‘एक हेल्मेट तुमच्या जवळ राहणाऱ्या कोणत्याही एका स्त्री दुचाकीस्वाराला भेट द्या आणि तिच्यासोबतचा फोटो मला पाठवा. हीच प्रांजलीला खरी श्रद्धांजली ठरेल.’ याला म्हणतात सामाजिक भान!

या उपक्रमाविषयी मांद्रुपकर म्हणतात, “आम्ही आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा पोलिसांसाठी ही मोहीम हाती घेतलेली नाही; ‘हेल्मेट पुणे’ केवळ लोकांच्या सुरक्षेसाठी कार्य करते आहे. ‘स्मार्ट पुणे’ प्रमाणेच ‘हेल्मेट पुणे, सुरक्षित पुणे’ हे घोषवाक्य लोकप्रिय व्हायला हवं आणि ते कृतीतही उतरायला हवं, तरंच आपल्या प्रिय व्यक्तीला अपघातात गमावण्याचं दु:ख कोणाच्याही वाट्याला येणार नाही.”

‘हेल्मेट’ हे तुमच्या डोक्याचं कवच आहे. दुर्दैवाने, अपघात झालाच तर ते कवच तुमच्या डोक्याचं संरक्षण करतं. वेळ सांगून येत नसते आणि अपघात वर्दी देऊन होत नसतो. त्यामुळे याबाबतीत तरी विषाची परीक्षा आणि जीवाशी खेळ नको करायला ! कारण, डोळ्यांसमोरचं आपलं माणूस एकदा गेलं, की ते काही केल्या परत दिसत नाही. आपल्या माणसांच्या आणि स्वत:च्याही जिवाला जपणं हेच आपल्या हातात आहे आणि तेवढं आपण नक्कीच करू शकतो.   


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in hisMission 2020 .

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया