Bhartiyans

Menu

‘तो’ टॅक्सी ड्रायव्हर आहे... प्रवाशांना इच्छितस्थळी सोडतो. ‘तो’ शाळा-संस्थापक आहे... विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत नेतो !

Date : 17 May 2017

Total View : 860

वयाच्या सातव्या वर्षी, केवळ इयत्ता पहिली एवढंच शिक्षण झाल्यावर परिस्थितीअभावी शाळा सोडलेल्या पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या मुलाने स्वत:च्या दोन शाळा आणि अनाथाश्रम सुरू केला. या शाळेत विनामूल्य शिक्षण दिलं जातं.


सारांश

इयत्ता पहिलीला वर्गातून प्रथम आलेल्या सात वर्षांच्या गाझी जलालुद्दीनला त्याच्या वडिलांनी ‘आपल्याकडे पैसे नाहीत, तू शाळा सोड.’ असं सांगितलं तेव्हा गाझीची शाळा सुटली; पण शिक्षणाची उर्मी त्याच्या डोक्यातून गेली नाही. त्याच्या बालामनावर हा प्रसंग इतक्या वेगळ्या अर्थाने कोरला गेला की, पुढे याच अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलाने स्वत:च्या दोन शाळा आणि अनाथाश्रम सुरू केला. गाझीच्या शाळेत विनामूल्य शिक्षण दिलं जातं.सविस्तर बातमी

सात वर्षांचा इयत्ता पहिलीतील एक हुशार चिमुरडा आनंदाने आणि उत्साहाने नाचतच आपल्या वडिलांसमोर जातो आणि सांगतो, की ‘मी वर्गात पहिला आलो आहे.’ त्या मुलाच्या चेहऱ्यावरून अक्षरश: आनंद ओसंडून वाहत असतो. कोणताही बाप अशा वेळी काय करेल हो...? मुलाला कौतुकाने कडेवर घेईल, त्याचं कौतुक करेल, मुलाचा एखादा हट्ट पूर्ण करेल, त्याला खाऊ-खेळणीसुद्धा घेऊन देईल !

मात्र, पश्चिम बंगालमधील ‘या’ मुलाच्या नशिबात यांपैकी काहीही नव्हतं. त्याने आपण वर्गात पहिले आल्याची बातमी वडिलांना सांगितल्यावर, वडील शांतपणे आणि काहीसं हताशपणे म्हणाले, “तू आता शाळेत जाणं बंद कर. कारण, इयत्ता दुसरीची पुस्तकं विकत घेण्यासाठी आणि तुझ्या पुढील शिक्षणासाठी आपल्याकडे पैसे नाहीत.”

वर्गात पहिला येऊन देखील शाळा सोडावी लागलेल्या सात वर्षांच्या गाझी जलालुद्दीनच्या बालमनावर हा प्रसंग इतक्या वेगळ्या अर्थाने कोरला गेला की, पुढे याच अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलाने स्वत:च्या दोन शाळा आणि अनाथाश्रम सुरू केला. पाहुया, या अवलियाची अनोखी कहाणी!

गाझीची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील शेतकरी होते. पश्चिम बंगालमधील सुंदरबनजवळ असलेल्या थाकूरचाक या छोट्या गावात त्यांची फक्त पाव एकर शेती होती. त्या शेतीवर ते कसेबसे दिवस काढत होते. एक दिवस, परिस्थितीला कंटाळून ते कोलकातामध्ये काम शोधण्यासाठी आले; पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यांना कोणीही काम दिलं नाही.

याचा थेट परिणाम म्हणजे, गाझी हातात कटोरा घेऊन कोलकाताच्या रस्त्यांवर भीक मागू लागला. दिवसभर भीक मागून, मिळेल ते खाऊन तो आला दिवस ढकलायचा. अशी काही वर्षे गेली. त्यानंतर १२-१३ वर्षांचा झाल्यावर मात्र, गाझीने भीक मागणं सोडलं आणि तो माणसाने ओढून चालवावी लागणारी रिक्षा चालवू लागला. १९७७ मध्ये म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी गाझीने टॅक्सी चालवण्याचा परवाना मिळवला आणि तो कोलकातामधील टॅक्सी ड्रायव्हर झाला.

स्वत: धडपड करून मोठं होत असताना आपल्या गावातील तरुण मुलांनीसुद्धा मागे राहू नये, असं गाझीला सारखं वाटायचं. यासाठी त्याने सुंदरबनला ‘सुंदरबन ड्रायव्हिंग समिती’ सुरू केली. या माध्यमातून तो गावातील मुलांना टॅक्सी चालवायला शिकवू लागला. त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं हीच त्याची तळमळ होती.

गाझी आपल्या त्या उपक्रमाबद्दल सांगतात, की ‘मी सुरुवातीला १० मुलांना टॅक्सी चालवायला मोफत शिकवलं आणि कमावायला लागल्यावर त्यांनी महिना ५ रुपये देणगी समितीला द्यावी, असं त्यांना सांगितलं. तसंच जी मुलं माझ्याकडून टॅक्सी चालवायला शिकली, त्यांनी गावातील २ गरजू मुलांना टॅक्सी चालवायला शिकवायचं, असंही मी त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने ही साखळी सुरू झाली आणि आज सुंदरबनमधील ३०० तरुण कोलकातामध्ये टॅक्सी चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करतायेत.”

गाझी त्यांच्या प्रवाशांना देखील मुलांना मदत करण्याविषयी विचारतात. मुलांना पुस्तकं, कपडे देण्याची इच्छा आहे का? असंही ते विचारतात. अनेक प्रवासी सकारात्मक प्रतिसाद देतात. मग गाझी ही पुस्तकं, कपडे गावातील गरजू विद्यार्थ्यांना नेऊन देतात. गाझी १९९७ पर्यंत हा उपक्रम करत होते. मात्र, एक बोच त्यांच्या मनात कायम होती.

आपल्याला पैशाअभावी शाळा सोडावी लागली. त्यामुळे अशी शाळा सुरू करायची जिथे विद्यार्थी विनामूल्य शिक्षण घेऊ शकतील, असा विचार ते सतत करत. यासाठी गावातील काही लोकांना त्यांनी शाळेसाठी जागा देता का? असं विचारलं. त्यावर ग्रामस्थांनी मदत केली नाहीच; पण त्यांची चेष्टा आणि टिंगल मात्र भरपूर केली.

गाझी यामुळे निराश झाले नाही. त्यांनी स्वत:च्या दोन खोल्यांच्या घरातील एका खोलीत शाळा सुरू केली. गाझी स्वत: गावात फिरत. ते माईकवरून पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करत; पण कोणीही प्रतिसाद देत नव्हतं. गाझी म्हणतात, “ मी लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचो. त्यांना सांगायचो की, तुम्हाला लिहिता-वाचता येत नसल्याने औषध किती वेळा घ्यायचं, हे देखील विचारायला तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. तुमची अनेक कामं अडून राहतात.”

हळूहळू गावकऱ्यांचं मतपरिवर्तन होऊ लागलं आणि १९९८ मध्ये २२ विद्यार्थ्यांसह सुंदरबनमधील उत्तर थाकूरचाक या गावात ‘इस्माईल इस्राफिल फ्री प्रायमरी स्कूल’ ची सुरुवात गाझी यांनी केली. प्रवाशांनी दिलेल्या मदतनिधीतून आणि स्वत: काही पैसे साठवून दरवर्षी एक खोली बांधण्यास गाझी यांनी सुरुवात केली. २०१२ पर्यंत त्यांनी १२ वर्ग आणि २ प्रसाधनगृहे असलेली शाळेची टुमदार इमारत उभी केली. आज या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि माध्यान्ह भोजन दिलं जातं.

अशातच गाझीचे दोन प्रवासी त्याच्या मदतीला धावून आले. एकाने शिक्षकांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारली आणि एकाने विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनाची. त्यांच्या मदतीमुळे गाझीने मोठी जागा विकत घेतली आणि २००९ मध्ये ‘सुंदरबन शिक्षायतन मिशन’ची स्थापना झाली. ही नवीन शाळा जुन्या शाळेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. या प्रशस्त शाळेत २१ शिक्षक, ४ कर्मचारी आणि ४२५ विद्यार्थी आहेत.

गाझी इथेच थांबले नाहीत. त्यांच्या शाळेतील अनेक अनाथ मुलांसाठी त्यांनी अनाथाश्रम देखील सुरू केला. २०१६ मध्ये ‘सुंदरबन अनाथाश्रमा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. मदतनिधी आणि स्वत:च्या बचतीतून गाझींनी निवासव्यवस्था असलेला अनाथाश्रम सुरू केला. या अनाथाश्रमासाठी स्वत:ची जागा देणारे अरुण कुमार दुबे, दीपनकर घोष. अजितकुमार सहा, दीपा दत्त, बर्नाली पै यांची आपल्याला प्रचंड मदत झाल्याचे गाझी आवर्जून सांगतात.

केवळ एक वर्ष शाळेत गेलेला माणूस अनेक पिढ्यांना घडवणारी, काही दशके ठामपणे उभी राहणारी शाळा सुरू करतो आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देतो, तो केवळ एवढंच करत नाही, तर तो त्याच्या कृतीतून सांगत असतो-

माझ्या भविष्याची नाही, मला जराही काळजी

उमटेन या धरतीवरी अन चमकेन त्या गगनात मी !


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया