Bhartiyans

Menu

अवघ्या ३०० रुपये भांडवलातून ७०० कोटींचा इंटरनॅशनल ब्रॅंड उभा केला, या ध्येयवेड्या महिला उद्योजिकेने !

Date : 25 May 2017

Total View : 1216

१९७८ मध्ये एका महिलेने केकचा व्यवसाय अवघ्या ३०० रुपयांपासून सुरू केला. आज त्याचा ७०० कोटींची उलाढाल असलेला ‘क्रिमिका’ इंटरनॅशनल ब्रॅंड झाला आहे. या ध्येयवेड्या महिलेचं नाव आहे रजनी बेकेटोर.


सारांश

आज २०१७ मध्ये केकची गोडी सगळ्यांना लागलीये. मात्र, ४० वर्षांपूर्वी, जेव्हा ‘केक’ हा पदार्थ फारसा कोणाला माहीत नव्हता. तेव्हा, १९७८ मध्ये एका महिलेने केकचा व्यवसाय अवघ्या ३०० रुपयांपासून सुरू केला. आज त्याचा ७०० कोटींची उलाढाल असलेला ‘क्रिमिका’ हा इंटरनॅशनल ब्रॅंड तयार झाला आहे. हा झंझावाती प्रवास करणाऱ्या ध्येयवेड्या महिलेचं नाव आहे रजनी बेकेटोर.सविस्तर बातमी

हल्ली केक खाण्यासाठी ‘वाढदिवस’ हे निमित्त लागतंच असं नाही. वाढदिवस, एखादा आनंदसोहळा, मित्रांची छोटी पार्टी, गेट-टु-गेदर, यश-निवड-नियुक्ती-बढती यांसारख्या अनेक आनंदाच्या प्रसंगी आवडीने आणि हौशीने केक आणला जातो किंवा घरी केला जातो. भरपूर क्रीम असलेला...मस्त रंगीत आणि स्पंजी केक पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. त्यावर तुमचा फोटो लावला असेल किंवा नाव टाकलं असेल तर मजा विचारायलाच नको. आता तर लहान मुलांसाठी खास कार्टूनच्या आकाराचे सुंदर सजवलेले केकही मिळतात. आज २०१७ मध्ये प्रत्येक कार्यक्रमात केक असतोच. त्याची गोडी सगळ्यांना आता लागलीये.

मात्र, ४० वर्षांपूर्वीची स्थिती अशी नव्हती. तेव्हा ‘केक’ हा पदार्थ फारसा कोणाला माहीतही नव्हता. तेव्हा म्हणजे १९७८ मध्ये एका महिलेने केकचा व्यवसाय अवघ्या ३०० रुपयांपासून सुरू केला. आज त्याचा ७०० कोटींची उलाढाल असलेला ‘क्रिमिका’ हा इंटरनॅशनल ब्रॅंड तयार झाला आहे. कोण होती ही ध्येयवेडी महिला? ३०० रुपये ते ७०० कोटी हा प्रवास तिने कसा केला असेल? बघुया तरी!

या धाडसी आणि ध्येयवेड्या महिलेचं नाव आहे रजनी बेकटोर! रजनी यांनी १९७८ मध्ये स्वतःच्या केक बनवण्याच्या आवडीला व्यववसायाचे स्वरूप दिलं. कालांतराने त्यांचं कुटुंबही त्यांना मदत करू लागलं. ‘क्रिमिका’चं नाव काढताच आपल्या जिभेवर त्यांचे केक, आईस्क्रीम, बिस्किटं आणि इतर पदार्थांची चव तोंडात रेंगाळत रहाते. याचं श्रेय अर्थातच रजनी यांच्या मेहनतीला, कष्टाला आणि जिद्दीला जातं. 

रजनी यांचा जन्म पाकिस्तानातील कराचीमध्ये झाला. त्यांचं बालपण लाहोरला गेलं. वडील सरकारी नोकरीत असल्याने परिस्थिती चांगली होती. फाळणीनंतर मात्र ते दिल्लीला स्थायिक झाले. रजनी यांनी दिल्लीलाच आपलं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं. यथावकाश त्यांचं लग्न लुधियानाच्या धर्मवीरसिंह बेकेटोर यांच्याशी झालं. लग्नानंतरही रजनी यांनी पुढील शिक्षण पूर्ण केलं. रजनी यांना यथावकाश ३ मुलं झाली. आज मुलं त्यांचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहे. 

याच काळात त्यांनी घरकाम करून उरलेला वेळ जावा यासाठी पंजाब कृषि महाविद्यालयातून बेकरी उत्पादने बनवण्याचा एक छोटासा अभ्यासक्रम पूर्ण केला. रजनी यांना लोकांना खाऊ घालायला खूप आवडतं. म्हणून त्यांनी हा अभ्यासक्रम निवडला. त्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ चाखून पाहिलेले अनेक जण हाच सल्ला द्यायचे, की तुम्ही खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करा, खूप यशस्वी व्हाल.

यामुळे सहज हौस म्हणून रजनी यांनी विविध ठिकाणी आपले स्टॉल्स लावायला सुरवात केली. पहिलाच स्टॉल त्यांनी आईसक्रीमचा लावला आणि तोसुद्धा ‘क्वालिटी’ आईसक्रीमच्या शेजारी. खरं पाहता, ‘क्वालिटी’ तेव्हा प्रचंड प्रसिद्ध होतं. तरी देखील रजनी यांच्या आईसक्रीमची तुफान विक्री झाली. त्यांचा सगळा माल विकला गेला. रजनी यांच्या व्यवसायाची ती मुहूर्तमेढ होती.

अनेकदा ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वानुसार काम करताना रजनी यांना त्यांच्या नेहमीच्या शिस्तीला बाजूला ठेवावं लागायचं. एकदा एका आमदारची २००० पुडिंग्सची ऑर्डर त्यांना अतिशय नगण्य नफा घेऊन करून द्यावी लागली. अशा वेळी त्यांची चिडचीड व्हायची. परंतु, त्यांचे पती धर्मवीर त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे होते. त्यांनी रजनी यांना सल्ला दिला, की तुला जर उत्तम व्यवसाय करायचा असेल तर सर्व बाजुंनी विचार करत जा. स्वतःचे नियोजन कर, मिळणारा फायदा, आपले कष्ट, पैसा योग्य ठिकाणीच गुंतव. व्यवसाय हा केवळ मनाने आणि भावनेने होत नाही. त्यापेक्षा अधिक तो डोक्याने होतो.

रजनी यांना आपल्या यजमानांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी २० हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि आईसक्रीमचा व्यवसाय सुरू केला. त्या लग्न-समारंभ यांच्या ऑर्डर स्वीकारू लागल्या. यामुळे त्या काही रोजगारही उपलब्ध करू शकल्या. रजनी यांना शक्यतो सर्व कामे स्वतःलाच करायला आवडतात. सकाळी लवकर उठून त्या कामाला सुरवात करायची ती रात्री कितीही उशीर झाला तरी त्या काम पूर्ण करतातच; पण हे सगळं करताना घर-नवरा- मुलं याकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही.

१९८३ मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसायाची अधिकृत नोंदणी केली. ‘क्रीम’वरुन त्यांना ‘क्रिमिका’ हे नाव सुचलं. जी.टी. रोडवर रजनी यांनी एका छोट्या जागेत स्वत:च युनिट सुरू केलं. कालांतराने त्यांनी बिस्किटचं यूनिट फिल्लौरमध्ये सुरू केलं. एचडीएफसी बँकेने त्यांना यासाठी कर्ज दिलं होतं. यातूनच त्यांनी अद्ययावत यंत्रणा उभी केली. एका मोठ्या शेडमध्ये त्यांचा व्यवसाय सुरू केला. सर्व मशीन्स तिथेच लावण्यात आल्या होत्या. उत्पादन जसं वाढत होतं तसंच विक्री आणि व्यवस्थापनाकडेही लक्ष देणं गरजेचं होतं. रजनी यासह इतर सर्व बारीकसारीक बाबींमध्ये जातीने लक्ष घालत होत्या.

उत्पादन तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं दूध आणि इतर सर्व कच्च्या मालाच्या बाबतीत त्या सजग असतात. म्हणूनच गुणवत्ता हीच त्यांची ओळख झाली आणि क्रिमिकाची तुलना सुप्रसिद्ध ब्रॅंड ब्रिटानिया आणि पारलेशी होऊ लागली.

याच काळात रजनी यांना काही आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या मोठ्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्नही याच काळात झाला. मग त्यांनी त्याचा मूळ व्यवसाय बंद करून पूर्ण वेळ बेकरीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. क्रिमिकाची उलाढालही तोपर्यंत सुमारे ५ कोटी एवढी झाली होती. रजनी यांच्या दोन्ही मुलांनीही आता त्यांना या व्यवसायात मदत करायला सुरवात केली. त्यांचा धाकटा मुलगा अनूप सीएचे शिक्षण सोडून व्यवसायातच खरं आणि प्रात्याक्षिक शिक्षण आहे, असं म्हणत त्यांना मदत करू लागला.

भारतात मॅकडोनल्डसचं आगमन १९९५ झालं. हा रजनी यांच्यासाठी ‘टर्निंग पॉईन्ट’ ठरला. मॅकडोनल्डसला उत्कृष्ठ ‘बन’ स्थानिक बेकरी व्यावसायिकांकडून हवे होते. ‘क्रिमिका’ची निवड मॅकडॉनल्डसने केली होती. ती आठवण सांगताना, रजनी म्हणतात, “मॅकडॉनल्डसला हवी तशी गुणवत्ता साध्य करण्यासाठी आम्ही कितीतरी बन वाया घालवले. शेवटी, आम्ही ते साध्य केलंच.”

क्रिमिकाचं उत्तम काम पाहून मॅकडोनल्डसने अजून एक मोठी जबाबदारी क्रिमिकावर टाकली, ती म्हणजे ‘ब्रेडक्रम्स’ तयार करणं. यासाठी क्रिमिकाने ईबीआय फूड्स या यूकेस्थित कंपनीशी करार करून विदेशी नामांकनाप्रमाणे ब्रेडक्रम्स तयार केले. मॅकडोनल्डसच्या गुणवत्तेला उतरणं ही अतिशय अशक्य गोष्ट क्रिमिकाने शक्य करून दाखवली. त्यानंतर सॉसमध्येही क्रिमिकाने बाजी मारली आणि यूएसए मधील क्वेकर ओट्स या कंपनीबरोबर ५० टक्के भागिदारीत एक प्रकल्प सुरू केला. त्या माध्यमातून चिली सॉस, मस्टर्ड सॉस, टोमॅटो केचअप बनवण्यास सुरुवात केली. क्रिमिकाने शाकाहारी लोकांसाठी अंड न वापरता मेयोनीस तयार केले.

सतत उत्तम गुणवत्ता दिल्याने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांना ऑर्डर्स देऊ लागल्या. त्यांच्या फिल्लोर येथील कारखान्यात आयटीसी आणि कॅडबरीसाठीही बिस्किट तयार होऊ लागली. २००६ च्या सुमारास बेकटोर यांच्या व्यवसायाची उलाढाल मागील वर्षाच्या तुलनेत ३०% वाढली. अर्थातच, सुमारे १०० कोटींच्या आसपास. गोल्डन साचे या कंपनीनेही त्यांना १०% भागीदारी देऊ केली आणि त्याच्या उपयोग व्यवसायवाढीसाठी झाला.

रजनी यांचे सध्या संपूर्ण स्वयंचलित असे २ मोठे कारखाने आहेत. त्यातील एक ग्रेटर नोएडा आणि एक मुंबईमध्ये आहे. नवीन कारखाना हिमाचल प्रदेशातील उना या गावी आहे. या कारखान्याची उत्पादन क्षमता ५००० टन प्रतीमहिना एवढी आहे. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ७०० कोटींपेक्षा अधिक असून एकूण मनुष्यबळ ४००० पेक्षा अधिक आहे. आजही वयाच्या ७१ व्या वर्षीसुद्धा रजनी रोज दिवसातून एकदा तरी कंपनीत येतात.

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००५ मध्ये त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते. कलामांनी रजनी यांचा गौरव ‘आईसक्रीम लेडी’ अशा शब्दात केला. हा पुरस्कार मी कधीही विसरणार नाही, असं रजनी त्याविषयी सांगतात.

रजनी यांनी नवोदित महिला उद्योजकांना दिलेला सल्ला अतिशय मोलाचा आहे. त्या म्हणतात, “महिलांनी व्यवसाय जरूर करावा पण कुटुंबाला पुरेसा वेळ देऊनच. शक्यतो मुलं त्यांचं त्यांचं करू लागली, की व्यवसायाचा विचार करावा. कुटुंबातील लोकांचीच मदत घेऊन व्यवसाय वाढवावा. जर तुम्ही अन्नपदार्थांमध्ये काम करायचं ठरवलं असेल; तर गुणवत्तेत कधीही तडजोड करू नका.”

कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढून विजयाची पताका लावणाऱ्या रजनी या आधुनिक नारीशक्तीचा अविष्कार आहे, असंच म्हणायला हवं.


Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य