Bhartiyans

Menu

त्याचं काम ऐकून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल ! ४० वर्षांत ७७,४०० मृतदेह त्याने दफन केले आहेत. आला अंगावर काटा ?

Date : 30 May 2017

Total View : 905

गेल्या ४० वर्षात बंगळूरच्या महादेव यांनी ७७ हजार ४०० अनोळखी मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. या अनोख्या आणि धाडसी कामासाठी त्यांना ‘राज्योत्सव’ आणि ‘केम्पेगौडा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.


सारांश

अनोळखी मृतदेह आपण पाहू देखील शकणार नाही; पण ‘तो’ रोज किमान ९ अनोळखी मृतदेह पाहतो, नव्हे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतो. गेल्या ४० वर्षात बंगळूरच्या महादेव यांनी ७७ हजार ४०० अनोळखी मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. या अनोख्या आणि धाडसी कामासाठी त्यांना ‘राज्योत्सव’ आणि ‘केम्पेगौडा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. स्थानिक लोक तर त्यांना ‘कलियुगातील विश्वकर्मा’ असं आदराने आणि कौतुकाने म्हणतात.सविस्तर बातमी

मृत्यू! जीवनाचं अंतिम सत्य !
जन्माला येणारा प्रत्येक जीव मरणारच, ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु’ हे माहीत असलं आणि मनाशी ठाम असलं तरी मरण दिसू लागतं, ‘काळा’ची जाणीव होते, तेव्हा ‘मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..’ अशीच अवस्था प्रत्येकाची होते.

स्वत:चा सोडा इतरांचा मृत्यू डोळ्यांदेखत पाहणं किंवा मृतदेहाजवळ २ मिनिट बसणंसुद्धा अनेकांची शब्दश:

बोबडी वळवतं... ‘भीती’ कशाला म्हणतात, ते कळू लागतं...आपला जवळचा माणूस गेल्यावर त्याचं भेसूर रूप पाहणं असह्य होतं. विचार करा, जर ही अवस्था आपल्या जवळचा, ओळखीचा माणूस गेल्यावर त्याचा ‘मृतदेह’ पाहताना होत असेल, तर अनोळखी मृतदेह पाहू शकू आपण?

आपण पाहू देखील शकणार नाही; पण ‘तो’ रोज किमान ९ अनोळखी मृतदेह पाहतो, नव्हे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतो. गेल्या ४० वर्षात बंगळूरच्या महादेव यांनी ७७ हजार ४०० अनोळखी मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. या अनोख्या आणि धाडसी कामासाठी त्यांना ‘राज्योत्सव’ आणि ‘केम्पेगौडा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. स्थानिक लोक तर त्यांना ‘कलियुगातील विश्वकर्मा’ असं आदराने आणि कौतुकाने म्हणतात.

महादेव गेल्या ४० वर्षांपासून न चुकता हे काम करत आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा एका अनोळखी मृतदेहाचं दफन केलं होतं. त्याचा मोबदला म्हणून त्यांना फक्त अडीच रुपये मिळाले होते. आज एक मृतदेह दफन करण्याचे त्यांना केवळ ३५० रुपये मिळतात. त्यांपैकी जवळपास ३२५ रुपये तर मृतदेह दफन करण्यासाठी लागणारी आवश्यक साधने आणि प्रक्रियेवर खर्च होतात. याचाच अर्थ महादेव यांना एका मृतदेहामागे केवळ २५ रुपये मिळतात. काय हा दैवदुर्विलास!

महादेव यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर होते. ते सकाळीच रुग्णालयात पोहोचतात. तिथे त्यांच्या मित्रांसोबत चहा-नाश्ता करतात. तोपर्यंत कुठून कुठून मृतदेह रुग्णालयात आणण्यास सुरुवात झालेली असते. हे मृतदेह नंतर महादेव त्यांच्या स्वत:च्या गाडीत किंवा त्यांना प्रशासनाने दिलेल्या गाडीत टाकतात आणि त्यांना दफनभूमिकडे घेऊन जातात. या धावपळीत अनेकदा त्यांना खाण्या-पिण्याची देखील शुद्ध नसते. तेव्हा ‘चहाबाज’ महादेव एका दिवसात चक्क १७-१८ कप चहा पितात.

सगळं काम संपायला जवळपास संध्याकाळ होते. व्हिक्टोरिया रुग्णालयाच्या शांत आवारात मित्रांशी गप्पा मारण्यात ते संध्याकाळचा वेळ घालवतात. एवढं जोखमीचं आणि तणावाचं काम करत असूनही महादेव यांना कोणतही व्यसन नाही. मुलांच्या भवितव्याची स्वप्ने रंगवण्यात त्यांची रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच रुग्णालय... तेच अनोळखी मृतदेह... तीच दफनभूमी आणि तेवढेच हाती लागणारे २५ रुपये !

एक दीर्घ उसासा टाकतो आपण हे फक्त वाचून; पण असं जीवन प्रत्यक्ष जगणाऱ्या महादेव यांची अवस्था काय होत असेल? विचार करवत नाही! ते म्हणतात, “अनोळखी मृतदेहाला जात-धर्म-वर्ण असं काहीही नसतं. त्यांच्या जीवनयात्रेचा शेवट मी व्यवस्थित करतो, याचाच मला आनंद आणि समाधान आहे.”

नि:शब्द आणि सुन्न करणाऱ्या महादेव यांच्या कार्यासमोर थेट नतमस्तक व्हावं असंच आपल्याला वाटतं.
तेच आपण करावं!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in hisMission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स