Bhartiyans

Menu

घराचा पाया खणताना सापडलेली ४३५ सोन्याची नाणी प्रामाणिकपणे पोलिसांना देणारी मजूर स्त्री आहे परिस्थितीने गरीब; पण मनाने गर्भश्रीमंत !

Date : 31 May 2017

Total View : 914

बंगळूरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बनासमुद्रा या गावात लक्षम्मा या गरीब पण प्रामाणिक मजूर स्त्रीने तिला सापडलेली ४३५ सोन्याची नाणी पोलिसांच्या हवाली केली. तिच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.


सारांश

बंगळूरजवळच्या मंड्या जिल्ह्यातील बनासमुद्रा या गावात घर बांधण्याचं काम करणाऱ्या लक्षम्मा यांना घराचा पाया खणताना काहीतरी चमकदार दिसलं. ती सोन्याची नाणी होती. १६ तोळे वजनाची आणि साडेचार लाखांहून अधिक किंमतीची तब्बल ४३५ नाणी त्यांना सापडली. ही नाणी लक्षम्मा यांना बिनबोभाट स्वत: कडे ठेवता आली असती; पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी सर्व नाणी प्रामाणिकपणे पोलिसांच्या हवाली केली.सविस्तर बातमी

रिक्षावाल्याने प्रवाशाचं पाकिट प्रामाणिकपणे परत केलं.... टॅक्सी ड्रायव्हरने, दुकानदाराने किंवा सोनाराने काही लाखांचे दागिने परत करून प्रामाणिकपणाची चुणूक दाखविली, अशा अनेक बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. अशा घटनाही समाजात घडत असतात.

अशीच एक घटना बंगळूरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बनासमुद्रा या गावात घडली. काही गरीब पण प्रामाणिक मजुरांनी त्यांना घर बांधताना सापडलेलं धन पोलिसांच्या हवाली केलं. विशेष म्हणजे, हे धन काही हजार रुपये किंवा १-२ लाखांचे दागिने नव्हते. या मजुरांना सापडली होती चक्क सोन्याची नाणी! ती सुद्धा ५-१० नाही तर तब्बल ४३५ ! बसला ना धक्का ऐकून? असाच धक्का त्या मजुरांनाही नाणी पाहून बसला होता; पण त्यांनी प्रामाणिकपणे ते धन पोलिसांना परत करून दाखवून दिलं, की ते गरीब असले तरी बेईमान आणि अप्रामाणिक नाहीत.

बंगळूरजवळच्या मंड्या जिल्ह्यातील बनासमुद्रा या गावात नेहमीसारखीच त्या दिवशीसुद्धा कामावर जाणाऱ्या मजुरांची वर्दळ होती. इतर मजुरांप्रमाणेच लक्षम्मा यासुद्धा कामावर जात होत्या. त्या गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मजूर आहेत. रोजसारखं कामावर आल्यावर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घराचा पाया खणायला सुरुवात केली. थोडं खणून झालं आणि लक्षम्मा यांना चमकदार काहीतरी दिसलं.

सुरूवातीला ते चमचमते मणी आहेत का? असंच सगळ्यांना वाटलं. थोडं अजून खणल्यावर ते मोठ्या संख्येने सापडले. लक्ष्ममा आणि इतर मजुरांनी मिळून साफ केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, ते मणी नाहीत, सोन्याची नाणी आहेत.

सोन्याची नाणी सापडल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना सोनाराकडे जाऊन तपासण्यापासून विविध प्रकारचे सल्ले दिले. मात्र, लक्षम्मा व त्यांच्या परिवाराने कोणाचंही न ऐकता या घटनेची माहिती जवळच्या हरिपूर पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीधर घटनास्थळी पोहोचताच क्षणी या मजुरांनी सापडलेली नाणी त्यांच्या हवाली केली.  

मंड्याचे साहाय्यक आयुक्त अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या नाण्यांचं वजन १६० ग्रॅम (१६ तोळे) आहे. प्रत्येक नाण्यावरील नक्षी वेगळी असून ती नाणी पुरातन असल्याचं लक्षात येतं. ती नाणी पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली आहे. लक्षम्मासारख्या गरीब स्त्रीने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटत असल्याचंही ते म्हणाले.

तर, तेथील आमदार पी.एम.नरेंद्र स्वामी म्हणतात, “एका गरिबाने सोन्याची नाणी परत करणं ही घटना या राज्यात प्रामाणिकपणा आणि सचोटी अजून शिल्लक आहे, हेच सिद्ध करते. नाणी सापडल्यावर ती स्वत:कडे न ठेवता किंवा त्याचा दुरुपयोग न करता नागरिकांनी सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्याचा निर्णय घेतला, याचं कौतुक वाटतं.”

आज १ तोळा सोनं विकत घेतानाही ज्यांना कष्ट पडतात अशा लक्षम्मासारख्या मजूर स्त्रीला सहज सापडलेलं सुमारे साडेचार लाखांहून अधिक किंमतीचं १६ तोळे सोनं बिनबोभाट स्वत: कडे ठेवता आलं असतं; पण तिने तसं केलं नाही. कारण, तिला माहीत होतं, कितीही महागडे असले तरी त्या दागिन्यांना निश्चित मूल्य आहे. तिचा प्रामाणिकपणा मात्र ‘अनमोल’ आहे..!!

       


                                     

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया