Bhartiyans

Menu

एक थेंबही पाणी वाया जाऊ न देण्यासाठी बंगळूरच्या दाम्पत्याने घरातच उभारला सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प !

Date : 01 Jun 2017

Total View : 751

बंगळूरच्या पर्यावरणप्रेमी दाम्पत्याने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प हा केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये नाही. तर, अगदी छोट्या स्वरूपात आणि कमी खर्चात देखील राबवता येतो, हे स्वत:च्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे.


सारांश

बंगळूरजवळील कोरमंगला इथे राहणाऱ्या सक्सेना या पर्यावरणप्रेमी दाम्पत्याने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प हा केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये किंवा मोठ्या नागरी वसाहतींमध्येच नाही, तर अगदी छोट्या स्वरूपात आणि कमी खर्चात देखील राबवता येतो, हे स्वत:च्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. साधारण २५ वर्षांपूर्वी बंगळूरला आलेल्या विनोदकुमार यांनी पत्नी आरतीसमवेत स्वत:चं घर पर्यावरणपूरक आणि हिरवंगार केलं आहे.सविस्तर बातमी

आपल्या घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचं आपण काय करतो? काहीच नाही ना?
रोज आपल्या घरातील न्हाणीघरातून, स्वयंपाकघरातून, शौचालयातून शेकडो लीटर पाणी ‘सांडपाण्या’च्या रूपाने बाहेर पडतं आणि वाया जातं. ‘सांडपाणी’ कसं वाचवणार ते वाया जाण्यासाठीच असतं, असाच आपला समज असतो.

मात्र, बंगळूरच्या एका पर्यावरणप्रेमी दाम्पत्याने आपल्यापैकी प्रत्येकाचाच समज हा ‘गैरसमज’ आहे, हे दाखवून दिलं. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प हा केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये किंवा मोठ्या नागरी वसाहतींमध्येच राबवता येतो, असं नाही. तर, अगदी छोट्या स्वरूपात आणि कमी खर्चात देखील हा प्रकल्प राबवता येतो, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे.

बंगळूरजवळील कोरमंगला इथे राहणाऱ्या सक्सेना दाम्पत्याने सांडपाणी पुनर्वापराचा प्रयोग आपल्या घरात यशस्वी केला आहे. आयात-निर्यात क्षेत्रात सल्लागार असलेले विनोदकुमार सक्सेना यांचा जन्म पुण्याचा. सुरुवातीची काही वर्षे पुण्यात घालवल्यावर साधारण २५ वर्षांपूर्वी ते बंगळूरला आले! विनोदकुमार यांनी पत्नी आरतीसमवेत स्वत:चे घर पर्यावरणपूरक आणि हिरवी शाल पांघरलेल्या डोंगरासारखं हिरवंगार केलं आहे.

विनोदकुमार सांगतात, “पाणीटंचाईची झळ अनेकदा बसल्याने मला पाणी बचतीची जाणीव होतीच. पाणी कोणकोणत्या प्रकारे वाचवता येईल, हा विचार सतत माझ्या मनात असायचा.” या विचारातूनच विनोद यांना सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची कल्पना सुचली. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कोणती यंत्रणा असावी, यासंदर्भात त्यांनी अनेक जलतज्ञांशी आणि सामाजिक संस्थाशी चर्चा देखील केली. मात्र, हे सर्व जण त्यांना खूप जास्त जागा व्यापणारे प्रकल्प आणि पद्धती सांगत होते. शिवाय, त्यातून शाश्वत मार्ग निघेल, अशी शक्यता देखील कमीच दिसत होती.

शेवटी, विनोद यांनी स्वत:च्या कल्पनांच्या आधारे प्रकल्प तयार करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी ‘प्लम्बिंग’ हा मार्ग निवडला. ते म्हणतात, “मी न्हाणीघर आणि स्वयंपाकघराचे पाण्याचे पाईप जोडून ते जमिनीखाली एका टाकीत सोडले. अनेक घरात न्हाणीघर, स्वयंपाकघर आणि शौचालय याचे पाईप शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. मात्र, मी मुद्दामहून न्हाणीघर-स्वयंपाकघराचा वेगळा आणि शौचालयाचा वेगळा पाईप, अशी रचना केली. कारण, शौचालयातून बाहेर पडणारे पाणी जास्त दूषित असते. त्याचा फारसा पुनर्वापर करता येत नाही. त्या तुलनेत न्हाणीघर आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडणारे पाणी (ग्रेवोटर) हे कमी दूषित असल्याने त्यावर प्रक्रिया करून ते वापरणे सोपे जाते.

ग्रेवोटरवर प्रक्रिया करण्यासाठी सक्सेना तुरटी व ब्लीचचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे पाण्यातील सूक्ष्मजंतू मरतात आणि दुर्गंधी देखील नाहीशी होते. परिणामी, जेव्हा प्रक्रिया केलेलं पाणी ते शौचालयात वापरतात तेव्हा ते वापरण्याजोगं असतं.

विशेष म्हणजे, ही सगळी यंत्रणा उभी करणारे विनोदकुमार यांना कोणत्याही यांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. ते म्हणतात, “मी इंजिनीअर नाहीत. मी माझ्या प्रकाल्पाचा आराखडा देखील काढून दाखवू शकत नाही. मी पाणीपुरवठा विभागाच्या इंजिनीअरला माझ्या कल्पना सांगितल्या आणि त्यानुसार मला यंत्रणा तयार करून दिली.”

सामान्य माणूस दिवसातून १० वेळा शौचालयाचा वापर करतो आणि सुमारे १०० लीटर पाणी वाया घालवतो. याच पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचं तंत्र सक्सेना यांनी विकसित केलं आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं सहज शक्य आहे. सक्सेना यांनी हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केल्यापासून त्यांना पाणीपट्टी देखील कमी भरावी लागते आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला अत्यंत कमी मेंटेनन्स आहे. विनोदकुमार यांना सुरूवातीला संपूर्ण प्लम्बिंग करण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला होता. मात्र, ही किंमत ते वाचवत असलेल्या अनमोल पाण्याच्या तुलनेत काहीच नाही.

सक्सेना कुटुंब केवळ पाणीच नाही तर ते विजेचीही बचत करतंये. ते सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करतायेत.

तिसरं महायुद्ध झालं तर पाण्यासाठी होईल, अशी परिस्थिती असताना विनोदकुमार व आरती सक्सेना यांना केवळ सजग नागरीकच नव्हे, जलदूतच नव्हे तर पाणी वाचवण्याची लढाई लढणारे शूर सैनिक म्हणायला हवं, हो ना !


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया