Bhartiyans

Menu

स्त्री म्हणजे फक्त कोमल-नाजूक-सुकुमार-अबला ? छे ! स्त्री म्हणजे कणखर-अभेद्य-कठोर-सबला !

Date : 19 Jun 2017

Total View : 960

समाजाच्या विशिष्ट चौकटी आणि समज-गैरसमजांना मोडून काढीत, प्रचंड कष्ट आणि मेहनत करून महाराष्ट्राची अश्विनी वासकर झाली आहे भारतातील पहिली महिला शरीरसौष्ठव स्पर्धक!


सारांश

अश्विनी वासकर! ३-४ वर्षांपूर्वी हे नाव भारतात काय महाराष्ट्रातही कोणाला माहीत नव्हतं. एखाद्या सामान्य स्त्रीसारखं आयुष्य अश्विनी जगत होती. नोकरी आणि दैनंदिन घरकाम यामुळे तिलाही स्वत:च्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ मिळतच नव्हता. परिणामी, तिचं वजन हळूहळू वाढू लागलं. ही गोष्ट लक्षात आल्यावर लगेचच अश्विनीने व्यायाम करण्यास सुरुवात केली आणि हाच तिचा ‘भारतातील पहिली महिला शरीरसौष्ठव स्पर्धक’ होण्याचा हुंकार ठरला.सविस्तर बातमी

‘शरीरसौष्ठव स्पर्धा’ म्हटली की डोळ्यांसमोर काय येतं? प्रचंड मेहनत, व्यायाम आणि कष्ट करून शरीर कमावलेले बलदंड पहिलवान.... त्यांच्या शरीरातला प्रत्येक स्नायू, प्रत्येक धमणी फुगून वर आलेली असते.... ते सादरीकरण करतात तेव्हा त्यांच्या तेल लावलेल्या पिळदार शरीरातली एखादी नस फुगून ताडकन तुटेल की काय या विचारानेच पाहणाऱ्याची छाती दडपते !

हे वाचून तुमच्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आतापर्यंत प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर पाहिलेल्या पुरुषांच्या ‘शरीरसौष्ठव स्पर्धा’ आल्या असतील; मात्र ‘शरीरसौष्ठव स्पर्धा’ आणि तीही महिलांची.....? हे अशक्य नसलं तरी थोडं नवीन आणि अपरिचित नक्कीच आहे. परदेशात अशा स्पर्धा होतात; पण भारतात, त्यातही महाराष्ट्रात अशा स्पर्धा होणं हा विचार अजूनही जनमानसात पुरता रुजलेला नाही.

समाजाच्या या चौकटी आणि समज-गैरसमजांना मोडून काढीत महाराष्ट्राची एक कन्या झाली भारतातील पहिली महिला शरीरसौष्ठव स्पर्धक! पाहुया तिची संघर्षमय यशोगाथा!

अश्विनी वासकर! ३-४ वर्षांपूर्वी हे नाव भारतात काय महाराष्ट्रातही कोणाला माहीत नव्हतं. माहीत असण्याचं काही कारणही नव्हतं. एखाद्या सामान्य स्त्रीसारखं आयुष्य अश्विनी सुखासमाधानात जगत होती. नोकरी आणि दैनंदिन घरकाम यामुळे तिलाही स्वत:च्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ उरतच नव्हता. परिणामी, तिचं वजन हळूहळू वाढू लागलं आणि ती स्थूल होऊ लागली. ही गोष्ट लक्षात आल्यावर लगेचच अश्विनीने व्यायाम करण्यास सुरुवात केली. ती जिममध्ये जाऊ लागली आणि हाच तिचा ‘भारतातील पहिली महिला शरीरसौष्ठव स्पर्धक’ होण्याचा हुंकार ठरला.     

कोकणातील रायगडची मूळ रहिवासी असलेल्या अश्विनीने मत्स्योद्योग तंत्रज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर २००९ मध्ये ती मुंबईत आली. त्यानंतर सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ फिशरीज टेक्नोलॉजी या संस्थेत वरिष्ठ सहसंशोधक म्हणून ती काम करू लागली. मात्र, याच काळात सतत एका जागी बसून काम केल्याने अश्विनीचं वजन वाढू लागलं. वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा निर्णय तिने घेतला.

अश्विनी म्हणते, “जिममध्ये मी औत्सुक्याने मुद्दाम जड वजनं उचलायची आणि डायटही कटाक्षाने पाळायची. त्यामुळे माझं वाढतं वजन कमी झालंच शिवाय माझं शरीर पिळदारही होऊ लागलं.” दरम्यान, २०१३ मध्ये अश्विनी एकदा सहज पुरुषांची शरीरसौष्ठव स्पर्धा पाहण्यास गेली आणि तो तिच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. याच स्पर्धेत महिलांच्या पहिल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेची घोषणा करण्यात आली आणि आपण या स्पर्धेत भाग का घेऊ नये? असा विचार तिच्या डोक्यात सुरू झाला.

हाच विचार घेऊन ती तिच्या गावी परतली आणि तिने सरळ गावातील हनुमान व्यायामशाळा गाठली. राजेश अंगद हे तिथे प्रशिक्षक होते. त्यांनी अश्विनीची आवड ओळखून तिला पुण्यामध्ये होणाऱ्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेविषयी सांगितलं. अश्विनी सहभागी होणार असल्यास तिला प्रशिक्षण देण्याचीही तयारी दाखवली. अश्विनीची तर या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र, आई-वडील परवानगी देतील का, याबद्दल ती साशंक होती.

घाबरत घाबरतच तिने वडिलांना विचारलं. त्यावर ‘उद्या काय ते सांगतो’, असं वडील म्हणाले. दुसऱ्या दिवशी वडिलांचा निर्णय ऐकून अश्विनी थक्कच झाली. कारण, ‘शरीरसौष्ठव’ स्पर्धा असल्याने वडील नाहीच म्हणतील, असं तिला वाटत होतं. मात्र, त्यांनी चक्क होकार दिला!

अश्विनीचे वडील तिला म्हणाले, “शरीरसौष्ठव स्पर्धेत मुलींनी सहभागी होणं यात काही गैर नाही. या क्रीडाप्रकाराची तशी आवश्यकता आणि गरजच असल्याने शरीरप्रदर्शन करावंच लागेल. सर्व स्पर्धकांना ते करणं भाग आहे.” वडिलांच्या एवढ्या व्यापक दृष्टीकोनामुळे अश्विनीचं बळ शतपटीने वाढलं आणि ती जोमाने कामाला लागली.

डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तिने सहभाग घेतला. ही तिची पहिलीच स्पर्धा असल्याने तिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. मात्र, तिने हार मानली नाही. विविध स्पर्धांमध्ये ती भाग घेतच होती. दुर्दैव, असं की सात आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभागी होऊनही अश्विनीला कोणाचच प्रायोजकत्व मिळालं नाही. एका स्पर्धेच्या आधी तर खुराकीसाठी पैसे नाही, म्हणून तिला स्वत:ची सोन्याची चेनही मोडावी लागली.

एवढं सगळं होऊनही, अश्विनी निराश-हताश-उदास झाली नाही. ती थांबली नाही. शरीरसौष्ठव क्षेत्रातही महिलांना चांगले दिवस येतील या विचारावर ती ठाम आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्नही करते आहे. “या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना प्रशिक्षण द्यायला मला नेहमीच आवडतं”, असं अश्विनी म्हणते.

प्रवाहाविरुद्ध निर्णय घेणं हे अवघड असतंच. मात्र, त्याहीपेक्षा अवघड असतं ते त्याच निर्णयावर ठाम राहून विरुद्ध दिशेच्या प्रवाहाला आपल्या बाजूने वळवणं. अश्विनीला ते जमलं आहे नव्हे नव्हे महत्प्रयासाने तिने ते साधलं आहे !


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य