Bhartiyans

Menu

‘ती’ आग आहे.. ती ‘ज्वाला’ आहे ! ‘ती’ जाळून भस्मसातही करू शकते अन प्रकाशमानही करू शकते !

Date : 14 Jul 2017

Total View : 873

गुवाहाटी येथे एका किशोरवयीन मुलीचा ३० मुलांनी भररस्त्यात विनयभंग केला आणि तिच्यावर भररस्त्यात बलात्कारही केला. या घटनेने पेटून उठलेल्या डॉ. दिव्या गुप्ता यांनी ‘ज्वाला फॉर जस्टिस’ ही महिलां साठीची संस्था सुरू केली.


सारांश

आसाममधील गुवाहाटी येथे २०१२ मध्ये एका किशोरवयीन मुलीचा ३० मुलांनी भररस्त्यात विनयभंग आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणाने पुढे चांगलाच पेट घेतला. याच घटनेने डॉ. दिव्या गुप्ता प्रचंड अस्वस्थ झाल्या. संताप, चीड, काहीतरी बेधडक करण्याची उर्मी, समाजसेवा अशा भावना त्यांच्या मनात एकाच वेळी दाटून आल्या आणि यातूनच ‘ज्वाला फॉर जस्टिस’ (जेएफजे) या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा जन्म झाला.सविस्तर बातमी

समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होतच असतो. काही घटनांचा परिणाम थेट जाणवतो, तर काहींचा जाणवत नाही. काहींचा आपण होऊ देतो, तर काहींचा होऊ देत नाही. अनेक घटनांनी आपलं मन हेलावतं, खूप काहीतरी करावसं वाटतं; पण ‘वेळच नाही’... ‘आपण काय करू शकतो?’... ‘यासाठी पैसा हवा’... ‘कोणाची सोबत नाही’... ‘असं केलं तर लोक काय म्हणतील?’ अशी असंख्य कारणं आपण देत असतो.

मध्य प्रदेशमधील इंदौरच्या डॉ. दिव्या गुप्ता मात्र या अशाच एका घटनेने मुळापासून हादरल्या.

तसं पाहीलं तर त्या घटनेशी त्यांचा थेट किंवा वैयक्तिक संबंध अजिबातच नव्हता. मात्र, त्यांच्या संवेदनशील मनाला ती घटना भिडली आणि त्या ‘ज्वाले’सारख्या पेटून उठल्या आणि यातूनच डॉ. दिव्या यांचा ‘समाजसेविका दिव्या’ या दिशेने प्रवास सुरू झाला.

ज्या घटनेने डॉ. दिव्या यांच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं, ती घटना खरोखर अंगावर काटा आणणारी आणि मनात प्रचंड चीड निर्माण करणारीच होती.

आसाममधील गुवाहाटी येथील २०१२ सालची घटना. एका किशोरवयीन मुलीचा एका बारबाहेर ३० मुलांच्या टोळक्याने विनयभंग केला. तिचा शारीरिक छळ केला आणि हे सगळं भररस्त्यात, खुले आम सुरू होतं. या प्रकरणाने पुढे चांगलाच पेट घेतला. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले, चर्चा झाल्या, समाजाच्या विविध स्तरातून हळहळ आणि संताप व्यक्त केला गेला.

याच घटनेने डॉ. दिव्या गुप्ता प्रचंड अस्वस्थ झाल्या. संताप, चीड, काहीतरी बेधडक व थेट करण्याची उर्मी, समाजसेवा अशा असंख्य भावना त्यांच्या मनात एकाच वेळी दाटून आल्या आणि यातूनच त्यांच्या ‘ज्वाला फॉर जस्टिस’ (जेएफजे) या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा जन्म झाला. इंदौरमधील ही संस्था अन्याय, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी काम करते. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात लढा देते.  

पीडित महिलांचं समुपदेशन करणं, त्यांना शिक्षण, नोकरीच्या संधी देण्यापासून ते महिलांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यापर्यंतचे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. ‘ज्वाला’च्या स्व-संरक्षण वर्गाचा आतापर्यंत १५०० हून अधिक मुली व महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र, केवळ एवढ्यावरच डॉ. गुप्ता समाधान मानत नाही. त्या म्हणतात, “केवळ एवढं करणं पुरेसं ठरणार नाही. जर चिरंतन आणि थेट बदल घडवायचा असेल, तर अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायला हवं.”

या विचारातूनच डॉ. गुप्ता यांनी ‘ज्वाला’मधून हस्तकलेचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वर्तमानपत्र आणि जुने कपडे यापासून पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण या महिलांना दिलं जाऊ लागलं. याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे, केवळ पैसे नसल्याने नवऱ्याकडून होणारा अन्याय सहन करणाऱ्या महिलांना आर्थिक सुरक्षा मिळाली. त्यांच्या हाताशी चार पैसे आले.

‘ज्वाला’मुळे ज्यांचं आयुष्य बदललं त्या रमिला (नाव बदलेले आहे) त्यांचा अनुभव सांगताना म्हणतात, “माझा नवरा दारू पिऊन मला मारहाण करायचा. मी खूप सहन केलं. एक दिवस परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पोलिसांकडे तक्रार करायला गेली. मात्र, पोलिसांनी मलाच समजावून घरी परत पाठवलं. त्यानंतर मला ज्वालाबद्दल कळालं. मी इथे येऊन माझी कहाणी सांगितली. ‘ज्वाला’ने मला आश्रय दिला. माझ्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याच्या कर्मामुळे त्याला तुरुंगवास देखील झाला. ‘ज्वाला’मुळे मला न्याय मिळाला.” ‘ज्वाला’ने अशा असंख्य स्त्रियांना स्वावलंबी केलं आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

पुरूषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि मानसिकता हे या सर्व प्रकारांचे मूळ आहे. ती मानसिकता बदलल्यावरच स्त्रियांच्या बाबतीत काही सकारात्मक बदल होऊ शकतात, असं डॉ. गुप्ता यांना वाटतं. त्यासाठी त्या चर्चासत्र, व्याख्याने या माध्यमातून जनजागृती करत असतात.

डॉ. गुप्ता यांनी पीडित महिलांना दिलेला संदेश खरोखरच अत्यंत मार्मिक आणि प्रेरणादायी आहे. त्या म्हणतात, “ज्या क्षणी तुम्ही आम्हाला स्पर्श करता त्या क्षणी आम्ही ‘ज्वाळा’ होऊन तुम्हाला नवचैतन्याने प्रज्वलित करतो.”


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020 .

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया