Bhartiyans

Menu

३०० भारतीय महिलांनी खोदल्या १-२ नाही तर १९० विहिरी

Date : 13 Sep 2017

Total View : 1012

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातील पूक्कोत्तूकावू गावात अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न रखडला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत ३०० महिलांनी हातात फावडं-कुदळ घेतलं आणि १९० लहान-मोठ्या विहिरी या गावात खोदल्या.


सारांश

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातील पूक्कोत्तूकावू या गावात अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न रखडला होता. पाणी साठवायची सोय नाही, भू-जलस्रोतांची कमतरता यामुळे गावाला पाणी टंचाईला सामोरं जावं लागायचं. यावर उपाय म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत ३०० महिलांनी हातात फावडं-कुदळ घेतलं आणि १९० लहान-मोठ्या विहिरी खोदल्या. यामुळे गावात पाणी आलं आणि महिलांना रोजगार मिळाला.सविस्तर बातमी

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यापासून ते ‘पानी तो पानी हैं, पानी जिंदगानी हैं...!’ पर्यंत पाण्याचं महत्त्व पटवून देणाऱ्या असंख्य घोषणा, म्हणी, सुविचार, वचनं आले; जल-जनजागृती करण्यासाठी पथनाट्यापासून ते चित्रपटापर्यंत विविध माध्यमांचा उपयोग केला गेला. सामाजिक संस्थांपासून केंद्र सरकारपर्यंत सर्व स्तरावर अनेक उपक्रम राबवले गेले. तरीही, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तो आहेच! असंख्य प्रयत्नातून पाणीप्रश्न कमी झाला; पण पूर्णत: नक्कीच सुटलेला नाही!

भारतात असे काही भाग आहेत जे कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. कुठे जमिनीत पाणीच लागत नाही, तर कुठे पाऊस खूप पडतो, पण पाणी मात्र सगळं वाहून जातं. कुठे निसर्गाचा लहरीपणा, तर कुठे प्रशासनाची उदासीनता, परिणामी आजही अनेक भागात पाणी नाहीच!

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातील पूक्कोत्तूकावू या गावात अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न रखडला होता. पाणी साठवायची सोय नाही, भू-जलस्रोतांची कमतरता यामुळे गावाला सतत पाणी टंचाईला सामोरं जावं लागायचं. मात्र, यावर उपाय ऐकला तर तुम्ही थक्क व्हाल आणि तो महिलांनी केला आहे म्हटल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही! मात्र, ते खरं आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत ३०० महिलांनी हातात फावडं-कुदळ घेतलं आणि १-२ नाही १९० लहान-मोठ्या विहिरी खोदल्या. यामुळे गावात पाणी आलं आणि महिलांना रोजगार मिळाला. तरुण मुलींपासून ते वयोवृद्ध स्त्रीपर्यंत महिलाशक्ती या कामी एकवटली आणि पाहता पाहता १९० विहिरी तयार झाल्या. कुदळ उचलण्याची ताकद नसलेल्या लहान मुली, वयोवृद्ध स्त्रिया बांबू किंवा टोकदार काठीने भूमातेला पाझर फोडण्याचा प्रयत्न करत या महान कार्यात आपला हातभार लावत होत्या.

नारीशक्तीने हातात कुदळ-फावडं घेतल्याचं पाहून धरणीमातेला देखील पाझर फुटला. तिच्या हृदयातून आपल्या ‘जीवना’च्या सहस्रावधी अमृतधारा वाहू लागल्या आणि गावाला नवसंजीवनी मिळाली. पूर्वी पाण्यासाठी केवळ काही विहिरी आणि लहान तलाव यावर अवलंबून असलेल्या गावात १९० विहिरी तयार झाल्या. पाणीप्रश्न जवळ जवळ मिटला. ३०० महिलांनी साधारण ९-१० महिन्यात गावाला ‘सुजलाम’ केलं.

अशाच पद्धतीने जर भारतातील प्रत्येक दुष्काळी भागात उपाययोजना राबवल्या गेल्या आणि एवढ्याच उत्साहाने जर स्थानिकांनी त्यात सहभाग घेतला, तर पाणीप्रश्न मिटेल आणि रोजगारनिर्मिती देखील होईल. ये हुई ना ‘आम के आम, गुठलीयोंके दाम’ वाली बात!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#Bharatiyans         

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in hisMission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया