Bhartiyans

Menu

तिच्या १०३ वर्षांच्या आयुष्यात देवाने तिला मूल दिलं नाही; तिने मात्र शेकडो पिढ्यांना आणि कोट्यवधी मुलांना पुरेल असं ‘अक्षय’ धन निर्माण केलं !

Date : 14 Sep 2017

Total View : 2427

बंगळूर जिल्ह्यातील हुलिकल नावाच्या छोट्या खेड्यातील थिम्मक्का या १०३ वर्षीय महिलेने ३८४ वटवृक्षांची लागवड केली आहे. स्थानिक लोक त्यांना ‘सालूमरदा’ म्हणतात. कन्नडमधील या शब्दाचा अर्थ होतो, ‘झाडांची रांग’ !


सारांश

लग्नाला २५ वर्षे झाली तरी मूलबाळ होत नाही. म्हणून बंगळूर जिल्ह्यातील हुलिकल या खेड्यातील थिम्मक्का आणि त्यांचे पती बेकल चिक्कय्या यांनी ठरवलं की वृक्षारोपण करायचं ! झाडांना मुलांसारखं वाढवायचं! आणि पाहता पाहता थिम्मक्का यांनी ४ किलोमीटरच्या परिसरात ३८४ वटवृक्षांची लागवड केली आहे. आज थिम्मक्का यांचं वय आहे अवघं १०३ वर्ष! या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.सविस्तर बातमी

काही विषयांना प्रस्तावनेची गरज नसते आणि काही व्यक्तींना परिचयाची आवश्यकता नसते. त्यांचं कार्यचं एवढं महान आणि अफाट असतं, की त्या कार्याची साधी ओळखसुद्धा अक्षरश: अंगावर येते.

आता हेच बघा ना, बंगळूर जिल्ह्यातील सालूमरदा थिम्मक्का या १०३ वर्षांच्या वृक्षप्रेमी महिलेने आजवर वडाची ३८४ झाडे लावली आहेत. आलं की नाही अंगावर...?

वय वर्षे १०३ आणि १,२ नाही तर ३८४ वटवृक्षांची लागवड हा हिशेब खरंच आकलना पलीकडचा आहे. मात्र, हे सत्य आहे! वस्तुस्थिती आहे! बंगळूर जिल्ह्यातील हुलिकल नावाच्या छोट्या खेड्यात जन्मलेल्या थिम्मक्का यांनी त्यांच्या आजवरच्या १०३ वर्षांच्या आयुष्यात वडाच्या ३८४ झाडांची लागवड केली आहे.

विशेष म्हणजे, थिम्मक्का यांनी पर्यावरणशास्त्रातून कोणतीही पदवी घेतलेली नाही, पर्यावरणावरची पुस्तके वाचून त्या प्रेरित झालेल्या नाहीत, कोणत्याही पर्यावरणवादी चळवळीच्या त्या कार्यकर्त्या नाहीत. तर, स्वयंप्रेरणेने त्यांनी हे कार्य सुरू केलं!

अजूनही त्या कार्यरत आहेत!

कवियत्री शांताबाई शेळके म्हणतात,

‘त्या तिथे एक झाड आहे,

त्याचे माझे नाते.   

वाऱ्याची एक झुळूक येते,

अन दोघांवरूनही जाते...!’

अगदी याच पद्धतीने थिम्मक्का या एका अशिक्षित आणि मजूर स्त्रीने स्वत:चं नातं वडाच्या झाडाशी जोडलं.

वाईटातून चांगलं कसं घडतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थिम्मक्का यांचं जीवन होय. लहान वयातच थिम्मक्का यांचा विवाह बेकल चिक्कय्या यांच्याशी झाला. मात्र, लग्नाला २५ वर्षे झाली तर मूलबाळ होत नव्हतं. थिम्मक्का यांच्या मनात ही बोच कायम होती. त्यांनी आपल्या पतीशी या विषयावर चर्चा केली आणि ठरवलं की वृक्षारोपण करायचं ! झाडांना मुलांसारखं वाढवायचं! त्यांना जीव लावायचा, जपायचं!

निसर्गाने हाडामासांचं एक अपत्य थिम्मक्का यांच्या पदरात दिलं नसेल. परंतु, पुढे अनेक पिढ्यांना प्राणवायू देणारे, मानवाला जगवणारे, सावली देणारे ३८४ सुपुत्र त्याने थिम्मक्का यांच्या नशिबात दिले. त्यांनी लावलेल्या वटवृक्षांमुळे त्या वटवृक्षासारख्याच दीर्घायू झाल्या आणि त्यांच्या कार्याने अजरामरसुद्धा..!

वटवृक्ष लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर थिम्मक्का यांनी पतीसह वडाची रोपे जमवण्यास सुरुवात केली. त्यांच्या गावाबाहेर असलेल्या मोकळ्या ४ किलोमीटरच्या परिसरात पहिल्या वर्षी त्यांनी १० रोपे लावली. दुसऱ्या वर्षी १५, तर तिसऱ्या वर्षी २० रोपे लावली. ही रोपे जगवण्यासाठी हे दाम्पत्य स्वत: पाणी वाहून न्यायचे. रोपांच्या वाढीत काटेरी झुडपे किंवा तण याचा अडथळा होऊ नये यासाठी त्यांची वेळोवेळी छाटणी करायचे.

अशी काळजी थिम्मक्का आणि त्यांचे पती यांनी काही वर्षे न चुकता घेतली. हळूहळू रोपांची संख्या ते वाढवत होते. १९९१ साली थिम्मक्का यांचे पती बेकल चिक्कय्या हे त्यांना सोडून देवाघरी गेले. तरीही, त्यांच्या आठवणींना सोबत घेऊन थिम्मक्का त्यांचे कार्य तेवढ्याच निष्ठेने करत होत्या.

आज त्यांच्या या कार्याचाच वटवृक्ष झाला आहे. थिम्मक्का यांचे गाव हुलिकल ते शेजारचे गाव कुदूर यामधील ५ किलोमीटरचा रस्ता संपूर्ण वटवृक्षमय झाला आहे.

या पाच किलोमीटरच्या अंतरात ३८४ वटवृक्ष आहेत. प्रवाशांना या रस्त्याने प्रवास करताना कधीही उन्हाचा त्रास होत नाही. थिम्मक्का यांचं हे अफाट आणि अचाट काम पाहून स्थानिक लोकांनी त्यांना ‘सालूमरदा’ ही पदवी दिली आहे. कन्नड भाषेतील या शब्दाचा अर्थ होतो, ‘झाडांची रांग’..!

स्थानिक लोक सोडले तर राष्ट्रीय नागरिक पुरस्कार मिळेपर्यंत थिम्मक्का यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. मात्र, १९८६ मध्ये थिम्मक्का यांना ‘राष्ट्रीय नागरिक पुरस्कार’ पुरस्कार मिळाला आणि ‘थिम्मक्का’ नावाच्या झंझावाताची देशाला ओळख झाली. त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे. थिम्मक्का यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले.

मात्र, त्यांची एक खंत आहे. त्या म्हणतात, “मला आश्चर्य वाटतं, लोक मला भरमसाठ पुरस्कार देतात; पण एखाद्या सामाजिक कार्याला मदतनिधी द्यायला कोणीच पुढे येत नाही. मला मोठं रुग्णालय सुरू करायचं आहे. या कार्यात मदत करायला कोणीही रस दाखवत नाही. माझ्यापरीने मी प्रयत्न करतेच आहे आणि करत राहणार आहे.” थिम्मक्का यांच्यासारख्या महान आणि स्वत:च्या कार्यातून काही पिढ्यांसाठी अक्षय धन पेरून जाणाऱ्या समाजसेविकेला निधीची मदत मिळू नये, हे दुर्दैव आहे!                

थिम्मक्का यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ आज दिसतं आहे. स्वत:च्या घामाचं पाणी आणि कष्टांचं खत घालून त्यांनी त्यांचं अवकाश हिरव्या रंगाने भरून टाकलं. थोर विचारवंत वॉरन बफेट असं म्हणाला होता की, ‘कोणीतरी खूप आधी झाडे लावली म्हणून आज त्या झाडांच्या सावलीत दुसरं कोणीतरी निवांत बसू शकतंय.’

आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांचं काय होईल?

हा एकच विचार करून त्यांच्यासाठी बक्कळ पण नाशवंत पैसा उभे करणारे लोक एकीकडे आहेत आणि पदरात मुलगा नसतानाही, शेकडो वर्षे अनेक पिढ्यांना पुरेल असा अक्षय धनसाठा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्माण करणाऱ्या थिम्मक्का दुसरीकडे आहेत.

आता सांगा खरं सुशिक्षित कोणं?

-------------------------------------------------------------------------------------------------------

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

युवर स्टोरी