Bhartiyans

Menu

कोण म्हणतं प्रेम आंधळ असतं आणि सुंदर चेहरा पाहून होतं म्हणून? प्रेम ॲसिड हल्ल्यातील पीडितेवरही होऊच शकतं!

Date : 15 Sep 2017

Total View : 959

ॲसिड हल्ल्यामुळे विद्रुप झालेल्या चेहऱ्याची ललिथा बन्सी रविशंकर सिंह या धीरोदत्त तरुणाला तिच्या आवाजामुळे आवडली. तो तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्नसुद्धा केलं ! खरं प्रेम म्हणतात ते हेच!


सारांश

उत्तर प्रदेशमधील आझमगडची रहिवासी आणि सध्या मुंबईत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणारी ललिथा बन्सीची ओळख काही नराधमांमुळे ‘ॲसिड हल्ल्या’तील पीडित अशी झाली. मात्र, ‘आता नकोनकोशी दिसते कधीकधी, लपवीत आसवे मी हसते कधीकधी’ असं म्हणणारी ही ‘नकोशी’सुद्धा एका धीरोदत्त तरुणाला ‘हवीहवीशी’ वाटली! तो तिच्या प्रेमात पडला आणि त्याने ॲसिड हल्ल्यामुळे विद्रूप चेहरा झालेल्या या मुलीशी लग्नसुद्धा केलं !सविस्तर बातमी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझ्या एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या ‘कधीकधी..’ नावाच्या गझलेतील या ओळी मला ललिथा बन्सीचं आत्मवृत्तचं वाटतं. उत्तर प्रदेशमधील आझमगडची रहिवासी आणि सध्या मुंबईमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणारी ललिथा बन्सी ही तिची खरी ओळख.

मात्र, काही वर्षांपूर्वी समाजातील विकृत घटकांच्या, नराधमांच्या नीच कृत्यामुळे तिची आजची ओळख ही ‘ॲसिड हल्ल्या’तील पीडित अशी झाली आहे ! ॲसिड हल्ला झालेली कोणतीही मुलगी ‘आता नकोनकोशी दिसते कधीकधी’ असंच म्हणणार ना? पण, ही ‘नकोशी’सुद्धा एका धीरोदत्त तरुणाला ‘हवीहवीशी’ वाटली! नव्हे नव्हे बेहद्द आवडली ! तो तिच्या प्रेमात पडला आणि त्याने ॲसिड हल्ल्यामुळे विद्रूप चेहरा झालेल्या त्या मुलीशी लग्नसुद्धा केलं...!

हे सगळं कसं झालं, हे खरंच जाणून घेण्यासारखं आहे. टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ललिथाकडून तीन महिन्यांपूर्वी चुकून ‘रॉंग नंबर’ लागला. हाच नंबर आपल्या आयुष्यातील ‘करेक्ट नंबर’ आहे, याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती. तो नंबर होता मालाडमध्ये सीसीटीव्ही ऑपरेटर म्हणून काम करणारे रवीशंकर सिंह यांचा.

चुकीचा क्रमांक असल्याने ललिथा रवी यांच्याशी अतिशय मोजकं बोलली; मात्र, ते काही क्षणांचं बोलणं आणि ललिथाच्या आवाजातील माधुर्य यामुळे रवी अक्षरश: अस्वस्थ झाले. आवाजावरूनच ते ललिथाच्या प्रेमात पडले. न राहवून त्यांनी पुन्हा त्याच नंबरवर ललिथाला फोन केला आणि ते तिच्याशी थोडं बोलले. हळुहळू त्यांच्यात नियमित बोलणं होऊ लागलं. चांगली मैत्री झाली आणि एक दिवस आपल्या मनातली गोष्ट रवी यांनी ललिथाजवळ बोलून दाखवली. मनातलं प्रेम त्यांनी ललिथाजवळ व्यक्त केलं आणि लग्नाची मागणी देखील घातली.

कदाचित दुसरी एखादी मुलगी अशा क्षणी हुरळून गेली असती किंवा चिडली असती. यांपैकी काहीही न करता ललिथाने अतिशय शांतपणे संपूर्ण परिस्थिती काहीही न लपवता रविशंकर यांना सांगितली. परंतु, सगळं ऐकल्यावरही रवि आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

रवि म्हणतात, “केवळ सौंदर्याला भाळून प्रेमात पडणारे आणि प्रेमविवाह करणारे अनेक जण असतात. यांपैकी काहींचे नंतर घटस्फोट देखील होतात. माझं प्रेम केवळ ललिथाच्या चेहऱ्यावर नाही. ती अतिशय चांगली व्यक्ती आणि एक गोड मुलगी आहे. देव तिला नेहमी आनंदात ठेवो, हीच प्रार्थना!”

ललिथाच्या चेहऱ्यावर १७ विविध शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि या वर्षात अजून १२ होणार आहेत. असं असूनही आणि हे सगळं माहीत असूनही रवि यांनी तिच्याशी लग्न केलं. प्रेम, माणुसकी, सामाजिक भान, सच्चेपणा म्हणतात तो याला!

दादरमधील डीसिल्वा तंत्र महाविद्यालयात ललिथा आणि रविशंकर यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी काम करणाऱ्या ‘साहस फाऊंडेशन’ या संस्थेने लग्नाचं व्यवस्थापन सांभाळलं होतं. ललिथा स्वत: या संस्थेची सदस्य आहे. जेवणाच्या मेन्यूपासून ते नवदाम्पत्याच्या हानिमूनपर्यंतची सर्व तयारी ‘साहस’ने चोख केली होती. सुप्रसिद्ध डिजायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी ललिथा-रविला उंची वस्त्र भेट म्हणून दिले. समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या धुमधडाक्यात ललिथा-रवि विवाहाबद्ध झाले.

ॲसिड हल्ल्यानंतरही घरात बसून न राहता, बाहेर पडून नोकरी करण्याचा ललिथाचा निर्णय आणि एका ॲसिड हल्ल्यातील पीडितेशी लग्न करण्याचा रविशंकर यांचा निर्णय खरोखर थक्क करतात आणि जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.

आपल्या स्वप्नातली परी चेहऱ्याने कुरूप असली तरी मनाने खूप सुंदर आहे, हे रविशंकर यांचं प्रेम आणि त्यांचा निर्णय तरुणांनी आदर्श घ्यावा असाच आहे. रविशंकर यांच्या निर्णयाचं कौतुक करताना आणि यानिमित्ताने तरुणांना संदेश देताना कुसुमाग्रजांच्या शब्दात हेच सांगावसं वाटतं की,

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं !

------------------------------------------------------------------------------------------------------------------

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in hisMission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

द बेटर इंडिया