Bhartiyans

Menu

७-८ हजार रुपये पगार असलेल्या ड्रायव्हरने ३० लाखांच्या जागेवर सोडलं पाणी ! राजस्थानच्या एका ड्रायव्हरने ५ बिघे जमीन दिली शाळेच्या मैदानासाठी

Date : 18 Sep 2017

Total View : 637

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील मेजर अली या ३० वर्षीय जीप ड्रायव्हरने त्याच्या गावातील सरकारी शाळेला स्वत:ची ५ बिघे जमीन देऊन दातृत्वाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.


सारांश

हल्लीच्या मुलांचं खेळणं कमी झालं असलं, तरी काही ठिकाणी मैदानच नाही ही सत्य परिस्थिती आहे. राजस्थानच्या सिकार जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातील सरकारी शाळेलाही मैदान नव्हतं. मात्र, याच गावातील मेजर अली या ड्रायव्हरने त्याची ५ बिघे जमीन शाळेला देऊन हा प्रश्न सोडवला. महिन्याला ७-८ हजार रुपये कमावणाऱ्या अलीने ३० लाखाच्या जागेवर पाणी सोडल्याचं पाहून सर्वांनाच त्याचं आश्चर्य वाटत आहे.सविस्तर बातमी

‘मोबाईल, इंटरनेट, टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे क्रीडा संस्कृती हरवते आहे’, ‘हल्लीची मुलं मैदानावर खेळायला जातच नाही...’, ‘जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाईल, अरे मैदानावर जाऊन मनसोक्त खेळा, फुटू द्या हाताचे कोपर, गुडघे, तंत्रज्ञानाने पोरांचं लहानपण हरवलं,’ अशी वाक्य घराघरात ऐकू येत असतात. अनेक शाळकरी मुलांच्या पालकांची हीच तक्रार असते.

सत्य परिस्थिती मात्र काही ठिकाणी जरा वेगळी आहे. मुलं मोबाईल, इंटरनेटच्या आहारी गेल्याने त्यांचं खेळणं कमी झालं असलं तरी काही ठिकाणी खेळायला मैदानच नाही ही सत्य परिस्थिती आहे. जागेअभावी अनेक शहरातील शाळांना मैदानेच नाही. काही शाळांच्या मैदानांना ‘मैदान’ म्हणावं की घरासमोरची ओसरी असा प्रश्न पडतो. सिमेंटचं जंगल आपल्या हव्यासापोटी वाढवत जाणाऱ्या स्वार्थी मनुष्याला मैदानांचा विसरच पडला. मोठ्या शहरातील सार्वजनिक मैदानांचा उपयोग राजकीय नेत्यांच्या सभा, विविध प्रदर्शनं, आनंद मेळा अशा कार्यक्रमांसाठीच जास्त होतो. मग मुलांनी खेळायचं कुठे?

अगदी हाच प्रश्न राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातील सरकारी शाळेला पडला होता. या गावातील शाळेला मैदान नव्हतं. मात्र, याच गावातील मेजर अली या ३० वर्षीय जीप ड्रायव्हरने हा प्रश्न सोडवला. १४ बिघे जमिनीचा मालक असलेल्या अलीने त्याच्या जमिनीपैकी ५ बिघे जमीन शाळेला दिली. तुटपुंज्या कमाईतून आला दिवस ढकलणाऱ्या अलीच्या या दातृत्वामुळे सर्वांनीच तोंडात बोटे घातली आहेत.

या गावातील शाळेसमोर काही मुलभूत सुविधा आणि मैदानाचा प्रश्न होता. शाळेचे मुख्याध्यापक रेशम लाल अरोरा यांनी गावकऱ्यांना मदतीचं आवाहन केलं. शाळेची अडचण समजताच अली स्वत: हून पुढे आला आणि त्याने स्वत:ची जागा मैदानासाठी दिली. अलीमुळे या वर्षांपासून विद्यार्थ्यांना खेळायला मैदान मिळणार आहे.

जेमतेम बारावी झालेल्या अलीला शिक्षणाविषयी आधीपासूनच तळमळ होती. आपल्याला परिस्थितीमुळे शिकता आलं नसलं, तरी नव्या पिढीने खूप शिकावं असं अलीला नेहमीच वाटायचं. या प्रेरणेतूनच त्याने शाळेला जागा देण्याचा निर्णय घेतला. अली आणि त्याचे ५ भाऊ यांच्याकडे मिळून १४ बिघे जमीन होती. अलीने त्याच्या निर्णयासाठी भावांना तयार केलं आणि ५ बिघे जमीन त्यांनी मैदानासाठी दिली. आज याच जागेची किंमत तब्बल ३० लाख रुपये आहे.

आपल्या मनोगतात अली म्हणाला, “जीप ड्रायव्हर म्हणून काम करतो. महिन्याकाठी मोठ्या मुष्किलीने ७-८ हजार रुपये मिळतात. एवढ्याशा कमाईत घर चालवणं अत्यंत अवघड आहे. आम्ही कसंतरी भागवतो. मात्र, मुख्याध्यापकांनी शाळेची अडचण सांगितल्यावर मी क्षणाचाही विलंब न लावता जागा देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं मला खूप आधीपासूनच वाटत होतं.

अलीने दाखवलेल्या दातृत्वाबद्दल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडून अलीला गौरवण्यात आलं आहे. त्याचा अलीप्रमाणेच याच गावातील निवृत्त मुख्याध्यापक हिरालाल मेघवाल यांनी देखील सुमारे ४ बिघे जमीन शाळेच्या नवीन इमारतीसाठी दिली आहे. या इमारतीत पाचवी ते दहावीचे वर्ग भरणार आहेत.

महिन्याला ७-८ हजार रुपये कमवणारा अली ३० लाखांची जागा सहज शाळेसाठी देतो. या जमिनीवर तो शेती करू शकला असता, ती जागा भाड्याने देऊ शकला असता, नाहीच काही तर, विकून लक्षाधीश झाला असता; मात्र, आयुष्यात फक्त पैसाच महत्त्वाचा नसतो. जगण्याचं समाधान आणि उद्देश मिळायला हवं. ते मिळालंच नाही, तर आला दिवस ढकलण याला ‘जीवन’ म्हणता येत नाही. पुस्तकी शिक्षण कमी असलं तरी जगण्याची ही ‘समज’ अलीकडे होती, त्यामुळेच तो एवढा मोठा निर्णय घेऊ शकला!    

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in hisMission 2020.

 

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया